निवडक मनाचे श्लोक

मनोगत

महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते ते उगाच नव्हे. महाराष्ट्र भूमीवर संतांची मांदियाळी व्यापून राहिली आहे. या संतांनी भक्तिमार्गाचा सदैव जयघोष केला. महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभर सन्मार्गाचा भक्तीचा मोक्षाचा मार्ग जन सामान्यांना दाखविला. त्यासाठी त्यांनी प्रचंड ग्रंथ निर्मिती केली. अशा संतांमध्ये संत रामदासांचे नाव अग्रगण्यांमध्ये गणले जाते. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि संत रामदास या संत श्रेष्ठांचे स्थान सर्वात वरचे. रामदासांनी खूप ग्रंथ रचना केली. त्यांनी केवळ भक्तीमार्गाचेच मार्गदर्शन केले नाही; तर जीवनाच्या हर एक पैलूवर प्रकाश टाकला आहे. जीवनामध्ये चांगले काय नी वाईट काय, याचे एवढ्या बारकाव्याने क्वचितच कुणा दुसऱ्या संताने मार्गदर्शन केले असेल.

संत रामदासांची ‘ मनाचे श्लोक ’ ही अशीच सर्वाना मार्गदर्शन करणारी लहानशी पण फार मौल्यवान निर्मिती. बहुदा ही अल्पबुद्धी किंवा तरुण विद्ध्यार्थी नजरेसमोर ठेवूनच लिहिली असावी. संपूर्ण दासबोधाचे अध्ययन व आकलन सर्वाना शक्य होणार नही हेही त्यांनी ध्यानात घेतले असावे. दासबोधातील महत्वाचा संदेश सर्वोपर्यंत पोहोचावा. तरुणांना तो मुखोद्गत करता यावा असा हेतू धरूनच जाणीवपूर्वक साररूपी ‘ मनाच्या श्लोकांची ’ निर्मिती केली असावी. अर्थात यातही समर्थांनी भाक्तीमार्गच मुख्य मानला आहे. सगुण उपासना हेच सामान्यांचे जीवन वर्तन व मानसिकता सुधारण्याचे साधन आहे, हे समर्थ ओळखून होते. ‘राम’ हा समर्थांचा आधेश होता. म्हणून जे गीतेमध्ये श्रीकृष्ण ‘माझ्यावर’ सोपव असे अर्जुनाला सांगतात, तेच समर्थ ‘श्रीराम चरणी’ अर्पण करा असे सांगतात. श्रीराम बलशाली योद्धा होता. नीतिवान होता. सत्यवचनी, एकवचनी, एकपत्नी होता. पिता-माता, गुरु यांचा अत्यादर करणारा होता. अत्यंत न्याय पिया राजा होता. हे सारे गुण कुणाही मानवाला आदर्श ठरावेत असेच आहेत. स्वतः समर्थ बलोपासक असल्याने बळाला विवेकाची बैठक असणे आवश्यक असल्याचेही ते जाणतात. त्यामुळे त्यांना श्रीरामांचीच आपले आदर्श म्हणून निवड करणे क्रमप्राप्त होते.

या मनाच्या श्लोकांतील काही निवडक श्लोकांवर सामान्य जीवनावर आधारीत चर्चात्मक निरुपण करण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न आहे. या श्लोकात जीवन विषयक संदेश समर्थ देतात. आपले विहित कर्म भगवंताच्या चरणी वाहून निष्काम भावनेने ते करत राहा. हा श्रीमद भगवद गीतेतील संदेशच समर्थ आपल्या शब्दात मांडतात. त्याचाच शोध घेण्याचा हा अल्पसा प्रयत्न ! वाचक तो स्वीकारतील असा आशावाद मनाशी बाळगूनच हे धाडस करीत आहे. पाप, पुण्य, मोक्ष, पुनर्जन्म, स्वर्गप्राप्ती अशा धार्मिक श्रद्धा किंवा अध्यात्मिक चर्चा यापेक्षा आजच्या व्यावहारिक जीवनाशी या निवडक श्लोकांची कशी सांगड घालता येईल, याचा माझ्या दृष्टीकोनातून हा अल्पमती प्रयत्न आहे. विशेषतः विद्यार्थी तरुण आणि सर्वसाधारण माणसाला त्यात दिलासा मिळेल असा विश्वास आहे. ही माझी साहित्यिक निर्मिती नाहीयाची मला पूर्ण जाणीव आहे. परंतु माझ्या या विचारांना कुठे नोंदून ठेवावे या एवढ्याच प्रामाणिक भावनेतून लिहून काढले आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी अशी विनंती आहे.

या श्लोकांतील पाठभेद छापील पुस्तकांवरून जसेच्या तसे घेतले आहेत. गुरुवर्य प्रा. के. वि. बेलसरे यांच्या सार्थ मनाचे श्लोक’ या ग्रंथाच्या प्रस्थावानेत श्री शंकराचार्य म्हणतात, “सर्व श्लोकांची भाषा देखील सुलभ असल्यामुळे ते म्हणणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याच्या मनावर झटकन परिणाम करतात. बहुतेक श्लोकांमध्ये रचनेच्या दृष्टीने दोष नाहीत. पण काही श्लोकांमध्ये छंदोभंग, र्हस्वांचे दीर्घ, दीर्घाचे र्हस्व, अशुद्ध शब्द इत्यादी दोष दृष्टीस पडतात. विषय प्रतिपादन करताना श्री. समर्थांची स्फूर्तीइतकी अनिवार होते की, ती व्याकरणदृष्ट्या शुद्ध शब्दांसाठी अडून बसत नाही. शिवाय त्यांची लोककल्याणाची तळमळ इतकी तीव्र आहे की, ती तिच्यांतून उसळणारी भाषा मोठी प्रासादिक मोठी तेजस्वी खणखणीत आणि अर्थाने भरून वाहणारी असते. प्रत्येक श्लोकात एक किंवा अनेक विचार गुंफल्यामुळे ते म्हणताना त्यातील दोषांकडे क्वचितच लक्ष जाते.” हे वाचकांच्या लक्षात यावे म्हणून हे या स्पष्टीकरणाची गरज भासली.