गणाधीश जो ईश सर्वो गुणांचा
मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा
नमू शारदा मूळ चत्वार वाचा
गमू पंथ आनंत या राघवाचा ......१
समर्थ रामदास हे रामाचे परमभक्त व
स्वतःला रामाचे दास असेच म्हणवून घेत असले तरी ते केवळ भक्तीमार्गी किंवा एकांगी
विचार करणारे नव्हते. भक्तिमार्गातून समाजाचे प्रबोधन व्रताच त्यांनी घेतले होते. त्या
काळात यवनांच्या आक्रमणाने भयभीत झालेला आणि गोंधळून गेलेला भारतीय समाज हतबल
झालेला होता. या समाजाला जागृत करण्यासाठी भारतभर तीर्थाटन करून त्यांनी हनुमंताची
शेकडो मंदिरे स्थापन केली. समाजाच्या सर्व गुणदोषांवर प्रकाश टाकणारा ‘दासबोध’ हा
ग्रंथ समर्थांनी लिहिला. त्याचेच सार थोडक्यात सांगणारे ‘मनाचे श्लोक’ लिहून
समर्थांनी सामान्य जन व विद्यार्थी यांचा मार्ग अधिक सोपा केला. समर्थ
क्रियाशीलतेचे पुरस्कर्ते होते. हे या श्लोकांतून वारंवार अनुभवास येते. मानवी
मनावरची मरगळ दूर करण्यासाठीच हे मनाचे श्लोक त्यांनी लिहिले. मनाला उद्देशून
केलेला हा उपदेश म्हणजे प्रत्येक मानवाच्या अंतर्मनाला जागृत करणारा संदेशच आहे. त्यासाठी
श्रीरामांसारखा आदर्श समर्थांच्या डोळ्यासमोर आहे. जीवनात माणसाने कसे वागावे
याबद्दल मार्गदर्शनाची पेरणी भक्तिमार्ग सांगता सांगता समर्थ अचूकपणे करतात. सामान्य
जन भक्तिमार्गातून सांगितलेले लवकर व श्रद्धेने स्वीकारतात हे मानसशास्त्रीय लक्षण
(तत्व) समर्थ जाणून होते हेच यातून स्पष्ट होते.
समर्थ रामदास जरी श्रीराम भक्त
असले तरी ते एकेश्वरी उपासक नव्हते. म्हणूनच हिंदू प्रथेप्रमाणे मनाच्या
श्लोकांचाही प्रारंभ ते गणेश वंदनेने करतात. अर्थात ही वंदना एखाद्या कार्याच्या
प्रारंभी पुरोहित ‘सर्व कार्येशु सर्वथा’ अशी कार्य पूर्णत्वास जावो म्हणून करतो
तशी नाही. ते म्हणतात “हा ईश्वर सर्व गुणांचा ईश्वर म्हणजे ज्ञानाची देवता आहे. हे
दैवत विद्या, कला-कौशल्य, बुद्धिमत्ता यांचे प्रतिक. मानव सर्वगुणसंपन्न व्हावा
म्हणून ह्याची उपासना हवी. पण पुढे ते म्हणतात
‘मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा’. जे डोळ्याला दिसते ते सगुण. परंतु जे आहे पण दिसत
नाही, हाती लागत नाही जे अव्यक्त आहे ते निर्गुण. असे परमेश्वराच्या स्वरूपाविषयी
बोलले जाते. ज्ञानाचेही तसेच आहे. जे कळले, समजले, लिहिले, वाचले गेले ते सगुण
ज्ञान. पण ज्ञानाचा जसजसा शोध घेऊ जावे तो, तो त्याचा आवाका, खोली व व्याप्ती
वाढतच जाते. ज्ञानाचे स्वरूप असे निर्गुणच आहे. ज्ञान घेण्याचा प्रारंभ ही
निर्गुणाची शोध घेण्याची सुरवातच नव्हे काय कुणी कितीही श्रेष्ठ ज्ञानी असला तरी
या विश्वातील सर्व ज्ञानशाखेतील सारे ज्ञान आपणास प्राप्त झाले आहे, असे म्हणू
शकेल काय?
ज्ञान निर्गुण आहे, अमूर्त आहे; म्हणून ज्ञान घेणे कोणी थांबवाते का? ज्ञानी
किंवा ज्ञानाचा उपासकांनी जे ज्ञात आहे; पुस्तकात आहे; ग्रंथात आहे, त्या सगुण
ज्ञानाची उपासना करणे हे आद्य कर्तव्य आहे. त्यातूनच नवनव्या विचारांची, कल्पनांची
अंत:प्रेरणा होत राहील. नवनवे शोध लागतील; ज्ञानाची नवी दालने उघडत जातील. ती
आधीच्या ज्ञानाच्या दृष्टीने पूर्णत अमूर्त, अकल्पित, अशक्यप्राय वाटणारी म्हणजेच
निर्गुणाच असतील. या अमूर्ताचा म्हणजे निर्गुणाचा शोध घेणारे प्रज्ञावंत असतात. पण
त्यासाठी मुळारंभ हा महत्वाचा नाही का? समर्थांचे अध्यात्म हे केवळ भक्तीवादी
नाही. त्यांनी श्रद्धा ही बुद्धिनिष्ठता व विज्ञाननिष्ठता यावर आधारलेली आहे. त्यासाठी
प्रयत्न परिश्रम व कृतीशीलतेची जोड त्यांना हवी आहे. अगदी प्राणीसदृश
आदिमानवापासून आजवर अमूर्त ज्ञानाची जी उपासना चालू आहे ती जगाच्या अंतापर्यंत
चालूच राहणार आहे. तिला अंत अथवा शेवट नाही. ही निर्गुनाचीच उपासना म्हणायची नाही
तर काय म्हणायचे?
ही निर्गुनाची उपासना रानावनात ध्यान लावून होणार नाही. हेही समर्थ स्पष्टपणे
सांगतात. यासाठी हवी शारदेची उपासना. म्हणजेच ज्ञानार्जन. अधिक काही जाणून घ्यायचे
असेल ते ज्ञानाच्या मार्गाने मिळवावे लागेल. ज्ञान हे मुर्तापासून अमूर्ताकडे ज्ञातापासून
अज्ञाताकडे नेणारे असते हे जगमान्य झाले आहे. ज्ञानाची उपासना म्हणजे एक प्रकारे
निर्गुनाचीच उपासना आहे. हे ज्ञानार्जन म्हणजेच शारदेची सरस्वतीची उपासना आहे. ती
‘चत्वार वाचा’ अशी आहे. ही अध्यात्मिक व्याख्या आहे. ‘परा, पश्यन्ति, मध्यमा आणि
वैखरी’ या त्या चार वाचा अथवा वाणी आहेत. ‘वैखरी’ ही सर्वात कनिष्ठ म्हणजे सामान्य
माणसे बोलतात ती बोली भाषा. तर ‘परा’ म्हणजे सर्वश्रेष्ठ वेदांची भाषा वेदवाणी
किंवा देववाणी. अभ्यासाच्याही अशाच पायऱ्या असतात नाही का? मुळाक्षरांपासून भाषेची
ओळख त्याआधारे सोपे, सोपे ज्ञान मिळवीत जावे लागते. ही ज्ञानाची पहिली पायरी. प्राथमिक
ज्ञानाच्या पायावर माध्यमिक ज्ञान. मग त्यापुढे अधिक विस्ताराचे महाविद्यालयीन
ज्ञान; अशा चढत्या पायरीने श्रेष्ठ ज्ञानाचे शिखर गाठावे लागते. तज्ज्ञ शास्रज्ञ वैज्ञानिक
ही ज्ञानाची अत्युच्च पायरी जी प्रतिभावंतांच शक्य होते.ही ज्ञानाची अंतिम पायरी
किंवा शारदेची उपासना केवळ अभ्यास कर, कर करून प्राप्त होणार नाही. त्याला साथ हवी
अढळ श्रद्धेची निष्ठेची आणि अंतिम ध्येय गाठण्याच्या आंतरिक ओढीची. अशातूनच नवे
नवे शोध लावणारे शास्रज्ञ, तंत्रज्ञ, विचारवंत, प्रतिभावान कलावंत निर्माण होतात.
विज्ञानाचे मोठ मोठे शोध तत्वज्ञानाची साहित्यातील अत्युच्च कोटीतील निर्मिती
कलेतील प्रतिभेचा स्वर्गीय अविष्कार ही सामन्यांच्या दृष्टीने ‘परातत्वाचा स्पर्श
झालेली रुपेच’ असतात. कारण त्यामागे असते त्या, त्या श्रेष्ठाची साधना, निष्ठा,
सर्जकता आणि आपल्या ध्येयावरची अचल श्रद्धा. सामान्य जनांपुढे अशा विभूती हिमालायाहूनही
मोठ्या भासतात. हा आहे शारदेच्या उपासनेचा महिमा.
समर्थ यासाठी आपण राघवाचा
म्हणजे श्रीरामचा पंथ सदैव स्वीकारू असे म्हणतात. ‘मनाचे श्लोक’ लिहिण्यामागे समाजाचा
उद्धार हे समर्थांचे महत्वाचे ध्येय असल्याने समाजापुढे सगुण आदर्शच ठेवावयास हवा
याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. यासाठी श्रीरामाचे चरित्र हाच आदर्श त्यांच्यापुढे
आहे. श्रीरामांमध्ये सारे श्रेष्ठ मानवी गुण सामावलेले होते. स्वतः राजा असूनही योग्यासारखे
जीवन जगणारा तो महान कर्मयोगी होता. म्हणून आपला उद्धार करायचा असेल तर सर्वगुण-संपन्न
असा श्रीगणेशाला वंदन करून शारदेची उपासना करावयास हवी. आणि याकरिता श्रीरामांचा आदर्श
जीवनभर बाळगायला हवा असेच या वंदनेतून समर्थ सुचवितात. गीतेने सांगितलेला ‘उद्धरेदात्मनात्मानम’
हा मानवाने आपला उद्धार आपणच करावयाचा सन्मार्ग रामदासांनी मनाच्या श्लोकातून अधिक
सोपा व स्पष्ट करून सांगितला आहे.