मना वासना दुष्ट कामा नये
रे
मना सर्वथा पापबुद्धी नको
रे
मना धर्मता नीती सोडू नको
हो
मना अंतरी सार विचार राहो......४.
मनाचे श्लोक हे मानस उद्देशून उपदेश म्हणजे मार्गदर्शन करतात. ‘हे मना’
म्हणजेच ‘हे मानवा’ तू असं कर, तसं कर असे समर्थ वारंवार बजावीत असतात. तेही सहज
सोप्या भाषेत. ते म्हणतात, “हे मना तू दुष्ट वासना ठेऊ नकोस.” ही दुष्ट वासना
अहंकारातून जन्माला येते. आपल्या श्रेष्ठत्वाचा मद चढतो. मग आपल्यापुढे कोणी जाऊ
नये. दुसर्या कुणास महत्व् प्राप्त होऊ नये. असे वाटू लागते त्यासाठी दुसर्याचे
अहित कसे होईल या दुष्ट विचारांचे वादळ मनात थैमान घालू लागते. ती व्यक्ती कोणतीही
गोष्ट करताना अविचारी, परपीडादायक, हानीकारक, अशा कोणत्याही थराला जाऊ शकते.
विशेषतः बलवंतांना इतराबद्दल हीनतेची भावना वाटू लागते. गरीब, कनिष्ठ व्यक्ती आणि
स्त्रीयांबद्दल केवळ भोगवस्तू किंवा आपल्या सेवेसाठी असलेले प्राणीमात्र आहेत अशा
भावनेतून अहंकाराची धुंदी चढते. अशी पापबुद्धी मनात ठसली म्हणजे स्वार्थ विवेकावर
मात करतो. त्याने माणसाची अधोगतीच होणार! म्हणून हे मना, संयमी हो!
माणसाचे हनन करणारी गोष्ट म्हणजे ‘पापबुद्धी’. दुष्ट वासनेची ही दुसरी बाजुच.
ती तर अजिबात नको. मानवी मनाच्या असमाधानी वृत्तीतून लोभ, हाव,द्वेष असे पापबुद्धी
विचार जन्माला येतात. आपल्याकडे आहे त्यात समाधान न मानता इतरांकडे आपल्यापेक्षा
काही अधिक का आहे या न्युनगंडातून अशी विचारचक्रे सुरु होतात. कुणाकडे आपल्यापेक्षा
अधिक मोठा फ्ल्याट, किंमती टी. व्ही. सारख्या वस्तू, दागिने, मोठ्या उत्पन्नाची नोकरी,
व्यवसाय आहे, असे काही पाहिले की, आपल्याशी त्याची तुलना करून त्या व्यक्तीचा
आपणास हेवा वाटू लागतो.
दुष्ट वासना, पापबुद्धी यांची परिणीती अनितीतच होणार. वाईट विचारांचा परिणाम
माणसाच्या वर्तनावर होतो. हे सहज सरळ मार्गाने प्राप्त होणार नाही असे लक्षात
आल्यावर ती व्यक्ती आपणास हवे ते मिळविण्यासाठी कुमार्गांचा आधार घेते. भ्रष्ट्राचाराचा
जन्म अशा प्रवृत्तीतूनच होतो. एकदा केलेले कुकर्म निभावून नेले किंवा पचनी पडले
की, तसे पुन्हा करण्याची इच्छा होते. छोटीशी चिरीमिरी घेऊन काम करणाऱ्या
कर्मचाऱ्याला आपणास अधिक मिळत जावे असे वाटू लागते. हळू, हळू असे भ्रष्टाचारी
वर्तन त्या व्यक्तीच्या अंगवळणी पडते. ही वासनेतून निर्माण झालेली पापबुद्धी
त्याला अधिकाधिक धन मिळवण्यास अथवा कुकर्म करावयास भाग पाडते. मग त्याचे राहणीमान
बदलू लागते. मग नियम, कायदे चुकवून अथवा धाब्यावर बसवून किंवा जनलाजेची पर्वा न
करता ती व्यक्ती कोणत्याही थराला जाऊन आपला स्वार्थ साधू लागते. एकदा का माणूस नीतिभ्रष्ट
झाला की त्याला धर्म नीती समाज याची लाज, चाड, शरम वाटेनाशी होते. चुकीच्या
मार्गाने आलेल्या धनाचा, वैभवाचा अथवा सत्तेचा मद चढतो. इतरांना तो तुच्छ माणू
लागतो. मात्र केव्हा तरी या धुंदीचा फुगा फुटून फजिती झाल्याशिवाय राहत नाही. मग
मात्र समाजात होणारी त्याची छी- थू त्याचे बेगडी मोठेपण थांबवू शकत नाही.
म्हणून समर्थ म्हणतात ‘हे
मना, अधर्माने वा अनीतीने वागू नकोस”. इथे धर्म हा लौकिक अर्थाने घ्यावयाचा नाही.
मानवी समाज वर्तनाचा, सद्भावाने वागण्याचा तो मार्ग आहे. हा नीतिधर्म आहे. मानवाने
कसे वागावे हे सांगणारा माणुसकीचा मानवधर्म आहे. नीतीमत्तेचे दुसरे नाव माणुसकी
असे सांगता येईल मग तो कोणत्याही धर्माचा पंथाचा वा समाजाचा असो. जर अंतर्यामी
माणुसकीचा झरा नसेल तर तो कोणत्याही पंथाचा असो पशूसारखा हिन वृत्तीने वागणाराच
असेल. साऱ्या भूतमात्रातील परस्पर संबंध प्रेमाचे सौदार्ह्याचे असावेत हाच खरा
धर्माचा विवेकपूर्ण अर्थ आपण घ्यायला हवा. समर्थ म्हणतात ‘हा सारासार विचार कधी
सोडू नको’. व्यक्ती कोणत्याही पदावर असो.... राज्यकर्ता असो, कर्मचारी, शिक्षक,
पिता असो की कामगार-शेतकरी असो ज्याने त्याने आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडणे
हाच ज्याचा त्याचा धर्म आहे. आपले कर्त्यव्य पार पडताना नितीधर्माचा विसर पडू देऊ
नये, ह्याचेच स्मरण समर्थांना करून द्यावयाचे आहे.