संतप्रसाद

अविवेकाची काजळी

मी अविवेकाची काजळी | फेडूनि विवेकदीप उजळी |

तै योगिया पाहे दिवाळी | निरंतर ||

संत ज्ञानेश्वर एकीकडे आपले गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपाप्रसादामुळेच आपण ज्ञानेश्वरी लिहिण्याचे धाडस करू शकलो असे विनम्रपणे वारंवार उच्चारतात; तर दुसरीकडे आपण आपल्या आत्मविश्वासाचे महासागर आहोत याचाही शब्द्शब्दांतून प्रत्यय देतात. ज्या आत्मविश्वासाने ते ‘माझा मराठीचा बोल अमृताशीही पैजा जिंकेल ! असे सांगतात त्याच आत्मविश्वासाने ते ही ओवीही सांगतात. समाजातील अयोग्य रूढी अज्ञानाच्या अंधकार आणि कर्मकांडात बुडालेला धर्म यामुळे समाज अधोगतीला जात आहे. बलवंत विवेकशून्य झाले आहेत. सारासार विचारांचा विसर समाजाला पडला आहे. ते म्हणतात “या ज्ञानेश्वरीच्या रूपाने मी असा ज्ञानाचा विवेकाचा, सारासार विचारांचा दीप लावीन, की ज्यामुळे अज्ञानाचा अंधकार दूर होईल. समाजमनावर बसलेली कर्मकांडाची आणि चुकीच्या रुढींची जळमटे या विवेकाच्या प्रकाशाने फेकून देईन. हा समाज शहाणपणाच्या मार्गावर जाण्यासाठी प्रकाश दावीन या प्रकाशाचा आनंद साधकाच्या मनात ज्ञानाच्या महासुखाची, लक्षदीपांची दिवाळीच साजरी करील. हा ज्ञानदीप साधासुधा नाही. याला रोजच्या तेलवातीची आवश्यकता नाही. हा एकदा प्रज्वलीत झालेला ज्ञानदीप वर्षानुवर्षे, निरंतर, अखंडपणे समाजाला मार्गदर्शन करीत राहील. असे अलौकिक सामर्थ्य या गीतोपदेशात आहे.” ते आपण सर्व समाजापुढे एखाद्या अलौकिक भांडाराप्रमाणे खुले करीत आहोत, असा दृढ आत्मविश्वास ज्ञानदेवांच्या ढायी असल्याचे या ओवीतून स्पष्ट होते.