संतप्रसाद

दुरिताचे तिमिर जावो

दुरिताचे तिमिर जावो | विश्व स्वधर्म सूर्ये पाहो |

जो जो जे वांछील तो ते लाहो | प्राणीजात ||

ज्ञानेश्वरीच्या अखेरीस ज्ञानदेवांनी आपल्या अक्षरयज्ञाचा प्रसाद मागताना केलेली ही अलौकिक प्रार्थना आहे. या प्रार्थनेत ज्ञानदेव स्वतःसाठी किंवा आपल्या आप्तजनांसाठी काहीही मागत नाहीत. तर ते विश्वाच्या कल्याणाची इच्छा प्रकट करतात. अशी प्रार्थना कुठल्याही धर्मात, पंथात वा देशात नसेल. कुठल्याही संतांनी एवढी विश्वव्यापक प्रार्थना केली नसेल. विसाव्या शतकाच्या मध्यान्न्नात पूज्य विनोबाजींनी ‘जय जगत’ चा नारा दिला तो याच प्रार्थनेतून प्रेरणा घेऊन असावा. आज एकविसाव्या शतकात ज्याची जगाला आत्यंतिक गरज भासू लागली आहे, ते ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात मागणे मागितले. हे याचे विशेष आहे.

ते म्हणतात, “दुरिताचा म्हणजे अज्ञानाचा अंधार नाहीसा होवो.” हे अज्ञान केवळ लिहिण्या-वाचण्याचे नव्हे. तर प्रत्येकाच्या मनातील भ्रामक समजूतीचे अज्ञान, तोच अंधार. उच्च-नीच भाव, श्रेष्ठ-कनिष्ठ भेदाभेद, जात-पात, प्राणी-पक्षी यांच्याविषयीची घृणा, लोभ, मत्सर, द्वेष असे कितीतरी प्रकारचे अज्ञानरूपी अंधार आपल्या मनामनातून वास करीत असतात. तो अंधार संपला की, सारे एकाच पातळीवर येतील. सगळे एकमेकांविषयीचा दुरावा विसरतील. म्हणजेच समाजातील द्वैत नाहीसे होईल. मग सारे अहंकार गळून पडतील. हे अज्ञान तमोगुण वाढविते. त्यामुळे प्रमाद, मोह, अविवेक वाढत जातो. त्यातच जीव अडकत जातो. त्याची ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिय भोग, विषयवासना, व विकाराच्या आधीन होतात. यासाठी मनुष्य निषिद्ध कर्मांनी, म्हणजे कुठल्याही मार्गांनी समृद्धी, कीर्ती, विलास मिळविण्याचा प्रयत्न करतो.  यालाच ज्ञानदेव दुरित म्हणतात. अशा या दुरिताचा, पापाचा तिमिर-अंधार नाहिसा झाला पाहिजे. मीपणाचा अहंकार लोपला पाहिजे. प्राणी आणि माणसामाणसातील द्वैत सरून भ्रष्ट आचरण थांबले पाहिजे. असे ही प्रार्थना सांगते.

दुरिताचे तिमिर जाऊन स्वधर्माचा प्रकाश पसरला पाहिजे असे ज्ञानदेवांना वाटते. विश्वातील पापाचा तिमिर-अंधार संपला पाहिजे म्हणजे काय झाले पाहिजे? स्वधर्माच्या प्रकाशात ज्ञान, शांती, शील, करुणा सापडतात. इथे धर्म हा रूढ अर्थाने घ्यावयाचा नसून स्वधर्म म्हणजे प्रत्येकाच्या जीवन-जगण्याचा मार्ग असा घ्यावयाचा आहे. त्यामुळेच हे तत्व जगातील कुठल्याही व्यक्तीसाठी लागू होऊ शकते. स्वधर्म हा पापाची जाणीव नाहीशी कल्याणाशी निगडीत आहे. कृती आणि चिंतन ही स्वधर्माची अंगे आहेत. कर्तव्याला चिंतनाची जोड मिळाली तर पाप-कर्मे घडणार नाहीत.

“जो, जे वांछील, तो ते लाहो | प्राणीजात ||” या जगात ज्याला जशी इच्छा असेल, ते त्याला लाभो. ही भावना सर्व सद्भावनांचा अत्त्युच्च कळस आहे. या मागण्यात सारे विश्व ज्ञानदेवांनी सामावून टाकले आहे. हे मागणे केवळ मानवापुरते मर्यादित राहात नाही तर ते विश्वातील सर्व सजीव आणि निर्जीव सृष्टीसाठी मागणे आहे. सर्व प्राणीमात्रांविषयीचा असा जिव्हाळा कुठेही नसेल. तुम्हाला हेच, अमुकच मिळेल असे ते म्हणत नाहीत. मनातल्या पापवासना नाहिशा झाल्यावर ज्या सदिच्छा उरतात त्यांना वांछा म्हणतात. दुरिताचा तिमिर नाहिसा झाल्यावर उरतील त्या केवळ सदिछाच. अशा सदिच्छा या साऱ्यांच्या कल्याणाच्याच असणार. त्यामुळे काय होणार, हे न सांगता ज्ञानदेव, ‘जो जे वांछील, असे म्हणून काय मागायचे ते आपणावरच सोपवितात.”

हे दुरित दूर होण्यासाठी ज्ञानदेवांनी वाईट, दुष्ट किंवा अनिष्ट प्रवृत्तीच्या लोकांचे निर्दालन व्हावे अशी अपेक्षा वा मागणी केलेली नाही. देवांचे वेगवेगळे अवतार अशा दुष्टाच्या संहारासाठी झाले असे पुराण सांगते. परंतु त्यामुळे समाजातीलदुष्ट प्रवृत्तीची विषवल्ली काही दूर झाली नाही. ज्ञानदेवांचा मानवाच्या विवेकबुद्धीवर विश्वास आहे. माणसे मुळात वाईट नसतात. परंतु अनिष्ट विचार, प्रवृत्ती आणि परिस्थिती त्यांना वाईट कृत्ये करायला भाग पाडतात. ते प्रवाहपतीत असतात. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, ही दुष्ट प्रवृत्तीची विषवल्लीच जगातून नाहिशी होवो. जे खल-प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांची खल-प्रवृत्तीच नाहिशी झाली तर सारेच सत्प्रवृत्त होतील. तेवढ्यावर ज्ञानदेव थांबत नाहीत, तर त्या सर्वांना सत्कर्माची आवड-रति निर्माण होवो असे व्यापक मागणे मागतात. सत्कर्माच्या प्रेमामुळे प्राण्या-प्राण्यात अद्वैत म्हणजे एकतानता निर्माण होईल असा त्यांना विश्वास वाटतो. त्यामुळे एकमेकांबद्दल प्रेम भावना जागी व्हावी असे त्यांना वाटते.

जगातील वाईटपणाच नाहिसा झाला तर सारे सज्जनच राहतील. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी होईल. ईश्वराचे भक्त म्हणजे सद्विचारी, श्रद्धाळू आणि प्रेमभावनेने भारलेले असतील अशी त्यांची अपेक्षा आहे. अशांना ते संत म्हणून संबोधतात. अशा संतसज्जनाचा सहवास सदा घडेल. हे संतजन म्हणजे अमृतचे चालते बोलते सागरच आहेत. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारा चिंतामणी दगडाच्या स्वरुपात असतो. पण हे संतजन म्हणजे जिते जागते चिंतामणी असून ते आपल्या साऱ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतील अशी ज्ञानदेवांची श्रद्धा आहे. असे चिंतामणी जर समाजात वावरू लागले तर मानवजातीचे कल्याण व्हायला, उद्धार व्हायला कितीसा अवधी लागेल? साऱ्या मानवजातीच्या उद्धाराचे स्वप्न पाहणारे ज्ञानदेव, हे विश्वचि माझे घर’, याच भावनेने विश्वात्मक देवाकडे प्रार्थना करीत आहेत. ज्या समाजाकडून अनंत यातना सोसूनही, त्या समाजातील साऱ्या अनिष्ट प्रवृत्तीचा लोप होऊन या विश्वाचा उद्धार होण्यासाठी वाटणारी ज्ञानदेवांची तळमळ खरोखरीच अलौकिक आहे. सर्वांना स्वधर्माची जाणीव होऊन सत्कर्माविषयी आस्था निर्माण होवो; त्यांच्याकडून कर्तव्याचे पालन होवो; सगळ्या विश्वाचा उद्धार होऊन सारं विश्व मंगलमय होवो; अशी सर्वसमावेशक प्रार्थना करून ज्ञानदेवांनी जगाला वेगळीच दृष्टी दिली आहे. हे जगावरील त्यांचे ऋण कधी न फिटणारे आहे.