जे का रंजले गांजले | त्यासी म्हणे जो आपुले |
तोचि साधु ओळखावा | देव तेथेची जाणावा |
तुकाराम महाराजांनी समाजातील अपप्रवृत्तीचा केवळ निषेध केला नाही तर त्यावर नेहमीच कोरडे ओढले. स्वतःला मोठे म्हणून मिळविणाऱ्यांच्या मनी अहंकाराचा वास असेल तर तसले मोठेपण काय कामाचे? समाजामध्ये श्रीमंती आणि गरिबी हजारो वर्षांपासून चालत आली आहे. गरिबांच्या नशिबी केवळ अवहेलना, उपासमार आणि कष्ट लिहून ठेवलेले असतात. त्यांच्या श्रमाच्या बळावर श्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्यांचा दिमाख असतो. पण त्या श्रमिकांना, गरिबांना किंवा उपेक्षितांनाही भावना असतात याचा मात्र श्रेष्ठांना, विसर पडतो. हा अहंकार धन-संपत्तीचा असेल, तुकारामांना हे गर्विष्ठ, अहंकारी श्रेष्ठत्व मान्य नाही. ते म्हणतात, “जे दु:खी कष्टी आहेत. त्यांचे दु:ख जो जाणून घेईल, त्यांना आपुलकीने जवळ करील तोच खरा साधु.” ‘साधु’ हा शब्द त्यांनी श्रेष्ठ या अर्थाने वापरला आहे. त्याकाळी बुवा-महाराज, महंत समाजाला फसवत होतेच. अशा बुवाबाजीवर तर तुकारामांनी अतिशय कठोरपणे टीका केली आहे.
ते ज्या वारकरी पंथांचे सेवेकरी होते, तिथे कोणी मोठा नसतो, लहान नसतो, सारे सारखेच. सारे देवाचे अंश. म्हणून एकमेकांनी एकमेकांना पाया पडण्याची प्रथा त्यांच्यात आहे. जो उच्चनीचतेचा भाव न ठेवता सर्वांना जवळ करील, दुसऱ्याची दु:खे आपली म्हणेल, त्यांना प्रेम देईल तोच खरा संत. तोच देव मानावा असे मोठ्या धाडसाने तुकाराम सांगतात. देव केवळ मंदिरातील दगडाच्या मूर्तीत नसून तो जित्या जागत्या मानवाच्या ठिकाणी, त्यांच्या हृदयी वास करतो हेच त्यांना सांगायचे आहे.
अशा सज्जनांचे मन कसे असते? तर महाराज पुढे म्हणतात, “ जसा लोण्याचा गोळा आतून बाहेरून मृदू-अतिशय कोमल असतो. तसेच अशा साधुपुरुषांचे अंतरंग असते” त्यांनी क्रोधावर विजय मिळविलेला असतो. जसे किंचितशा धगीनेदेखील लोणी वितळू लागते तसे दुसऱ्यांना वेदनांनी सज्जनांचे मन विरघळून जाते. ज्यांना कुणाचा आधार नाही, त्यांना हे संत-सज्जन हृदयाशी धरतात. एकनाथ महाराजांनी गरम वाळूच्या धगीने कळवळणारे अंत्यजाचे पोर पटकन उचलून छातीशी धरले. साने गुरुजींनी बोर्डिंगातल्या मुलांना स्वतःच्या हातानी खाऊ-पिऊ घातले. हे खरे साधुपुरुष.
तुकाराम पुढे म्हणतात, “आपण आपल्या पुत्र-लेकींना प्रेम, आपुलकी दाखवतो, आपल्या आप्तांसाठी जी काही माया दाखवतो; त्यांची चिंता वाहातो; त्यांच्या हरकामात मदत करायला आपण तत्पर असतो; तसे प्रेम वा आपुलकी आपल्या नोकर-चाकारांविषयी दाखवतो का?” तसे दाखविणे हे खरे सज्जनपणाचे लक्षण आहे. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ या प्रार्थनेत हेच सांगितले आहे नाही का? जगी जे दीन-पददलित आहेत; त्यांना आधार द्यावा असे साने गुरुजींनी म्हटले आहे, ते याच अर्थाने. या जगात जे दु:खी आहेत; दीन आहेत; जाती-पातीच्या भिंतींनी त्यांना नीच-तुच्छ ठरविले आहे; अशांना आनंद द्यावा. आपले म्हणावे, हृदयाशी धरावे असेच तुकारामांना सांगायचे आहे. यासाठी कुठल्याही मंदिरात जाऊन ईश्वर शोधण्याची गरज नाही. ईश्वराची मूर्ती अशा सज्जनांच्या रूपाने समाजातच वावरत असते. देव तेथेची जाणावा असे तुकाराम म्हणतात ते याच अर्थाने ते आपण ध्यानी घ्यावयाचे आहे.