पुण्य पर उपकार पाप ते परपीडा
आणिक नाही जोडा दुजा यासी
हा तुकाराम महाराजांचा अभंग पाप पुण्याची वेगळीच व्याख्या करणारा आहे. संत स्वतः हरी चिंतनात दंग असले तरी हा भक्तीमार्ग सर्वांना शक्य नाही याची त्यांना जाणीव होती. आणि म्हणूनच तुकारामांनी सामान्य जीवनात ईश्वरभक्ती कशी सामावली आहे, याचे मर्म या अभंगातून उलगडून दाखविले आहे. गुजराती संत नरसी मेहताचा ‘वैष्णव जन तो तेने कहिये जो पीड पराई जाणे रे’, हा अभंग वरील अभंगाचा जणू गुजराती अवतार आहे. याचा अर्थ सारेच संत ईश्वरभक्तीच्या मार्गातून समाजसुधारणेची कास धरतात. पण त्यातही संत तुकारामांची भाषा आणि विचारसरणी अधिक स्पष्ट आणि रोखठोक अशी आहे.
तुकाराम म्हणतात, पर उपकार-दुसऱ्यावर उपकार हेच खरे पुण्य आहे. उपकार म्हणजे दुसऱ्यावर उपकाराचे ओझे लादणे नव्हे. तर इतरांना मदत करणे, सहाय्यभूत होणे, सहकाराचा हात पुढे करणे हे ईश्वरभक्ती इतकेच पुण्यकर्म आहे. एखादा अंध रस्ता ओलांडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभा असतो. पण त्याच्या आजूबाजूने जाणारे पथिक मला काय त्याचे अशा भावनेने त्याच्या बाजूने निघून जातात. तोच, एखादे बालक मात्र त्याचा हात पकडून त्याला रस्ता पार करून देते. शिवाय आपण काही विशेष केले अशी भावनाही त्याच्या मनात येत नाही. तुकाराम यालाच पुण्य म्हणतात. आपल्या दारचा कचरा शेजाऱ्याच्या दारी टाकणे, रस्त्यात पचकन थुंकणे, परीक्षांचे दिवस आहेत हे माहित असूनही आपल्या घरचा टी.वी. किंवा रेडीओ मुद्दाम मोठ्याने लावून इतरांना होणाऱ्या त्रासाबद्दल ही माणसे मात्र पूर्ण बेफिकीर असतात. तुकाराम यालाच पाप म्हणतात. आज ऐहिक सुखाच्या, चैनीच्या, चंगळवादी जाळ्यात माणसे इतकी गुरफटली आहेत की, ती स्वतःखेरीज इतरांना विचार करायलाही तयार नसतात. सामाजिक अधोगती हेच खरे पाप आहे, याची जाणीव सर्वांनी ठेवावी हाच या संताचा महत्वाचा संदेश आहे.
त्यासाठी आचरणाचा मार्गही ते स्पष्ट करून सांगतात. ते म्हणतात, ‘सत्य तोची धर्म’ आहे. खरे बोला, खरे वागा, सत्याची कास धरा. म्हणजे आपोआप चांगले तेच घडेल. थोड्या थोड्या स्वार्थासाठी असत्य बोलावेच लागते अशी आपण समजूत करून घेतलेली असते. मग छोट्या असत्यातून मोठे कुकर्म केले जाते. आणि नाईलाजाने ते आपण स्वीकारत जातो. सत्य अंगिकारायला धैर्य लागते. ते ईश्वरकार्य आहे म्हणून आपण स्वीकारले पाहिजे. अन्यथा पदोपदी आपणास खोटे बोलावे लागेल. निदान आपल्या विवेकबुद्धीला स्मरून सत्याकडे जाण्याचा आपण प्रयत्न करू तोच आपला खरा धर्म ठरेल.
तुकाराम पुढे म्हणतात, “मुखी नामाचे स्मरण असू द्यावे.” याचा अर्थ मुखातून देवाचे नाव घेण्याचे ठरविले की, चांगले विचारच बोलावेसे वाटतील. तर मग निंदा, अपशब्द, गर्विष्ठ भाषा यांना जागाच राहणार नाही. जर तशी भाषा आपल्या मुखातून आली म्हणजे आपली अधोगतीच झाली असे समजायला हवे. यासाठी हवा सज्जनांचा संग. संत सज्जन यांच्या संगतीत आपण राहिलो, तर आपल्या कानावर सतत चांगले, पवित्र विचारच पडतील. त्यामुळे आपल्या तोंडून अपशब्द बाहेर पडायला धजावणार नाहीत. असे हे वाईट वागणे, बोलणे म्हणजेच नरक. त्यासाठी मृत्युनंतर नरकात जाण्याची वात पहायला नको. तुकाराम म्हणतात, यात अहित काय आणि हित काय हे स्पष्ट आहे. मग त्यातील काय स्वीकारायचे हे ज्याचे त्याचे त्याने ठरवायचे आहे. कारण प्रत्येकाला स्वतःची बुद्धी आहेच. मग बरे-वाईट कळण्याइतका सारासार विचार ज्याचा त्यानेच करायला नको का? आंब्याचे कलम लावले की, काही वर्षांनी का होईना त्याला आम्रफलेच येणार. त्यातही त्या रोपाची नीट निगराणी करत राहिले तरच चांगले फळ हाती येईल. तसेच आपल्या जीवनाचे आहे. ते स्वच्छ, निर्मळ राखले तर त्याचे चांगले फळ आपणास मिळाल्याशिवाय कसे राहील? तेच पुण्य. चांगले बोलणे, सद्वर्तन, हेच पुण्यकर्म. त्याच्या फलप्राप्तीसाठी पुनर्जन्म घेण्याची आवश्यकता भासणार नाही. याच जन्मी त्याचा पडताळा आल्याशिवाय राहणार नाही. दुसऱ्याच्या दु:खात सहभागी होणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय आपल्या मनात बाळगावे हेच योग्य नाही का?