संतप्रसाद

बोले तैसा चाले

बोले तैसा चाले | त्याची वंदिन पाऊले|

या अभंगाच्या सुरुवातीलाच तुकाराम महाराज कुणाचा अनुनय करायचा कुणाचे शिष्यत्व पत्करावे हे पहिल्या तीन शब्दातच स्पष्ट करतात. “प्रवचन करणे सोपे पण ते प्रत्यक्षात उतरविणे कठिण” अशा अर्थाची इंग्रजी म्हण आहे. समाजात समानता यावी समाजवाद यावा असे सांगणारे नेते स्वतः मात्र वैभवात ऐशआरामात राहतात. पदोपदी नोकर-चाकरांचा कनिष्ठांचा अपमान करतात. सर्वाभूती परमेश्वर आहे? सर्व धर्म सारखेच आहेत? नावे वेगवेगळी असली  तरी ईश्वर एकच आहे. असे सांगणारे धार्मिक नेते साधुमहंत शिवाशिवी भेदाभेद पाळतात. धर्मावरून आपापल्या अनुनयांना भडकविणारी भाषणे ठोकून प्रसंगी जातीय दंगलीही घडवून आणतात. यांचे प्रवचनांतील उपदेश एक आणि प्रत्यक्षात वर्तन मात्र पूर्णतः वेगळेच. तुकाराम म्हणतात, “यांना साधु कसे म्हणावे”?

भारतातल्या गरीब जनतेचे प्रतिनिधत्व करताना महात्मा गांधींनी स्वदेशीचे व्रत सांगितले. यासाठी त्यांनी स्वतःचा विदेशी पद्धतीचा पेहेराव व राहणी टाकली. अगदी इंग्लंडच्या राणीलाही ते ढोपरापर्यंत पंचा नेसूनच गेले. अखेरपर्यंत सुत-कताईचे व्रत त्यांनी सोडले नाही. आयुष्यभर खादीचीच वस्त्रे वापरली. जनतेने त्यांना राष्ट्रपिता म्हणून संबोधले. पण त्यांनी कोणतेही पद स्वीकारले नाही. म्हणून ते साऱ्या जगाला वंदनीय असे महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले. महर्षी कर्वे, महात्मा फुले, डा. बाबासाहेब आंबेडकर, बाबा आमटे यांनी समाजातील अज्ञान, अनिष्ट प्रथा यांच्या विरोधात अनेक कष्ट, व त्रास सोसून अतिशय मोलाचे कार्य केले. समाजाने त्यांना वंदनीय मानले ते उगीच नव्हे. तुकाराम म्हणतात, “अशा देव माणसांचा मी चाकर होईन. त्यांची मनोभावे सेवा करीन. त्यांचे अंगण झाडीन.” अशी एक म्हण आहे की, शहाण्याचे व्हावे चाकर, पण मूर्खाचे होऊ नये मालक. जे आपण बोलतो तेच करत राहण्याची शहाणीव ज्यांच्याकडे आहे, त्याचे आपण सेवक झालो. त्यांची छोटीमोठी कामे केली, तर त्यांचा सहवास सतत घडेल. सुसंगती घडेल. त्यामुळे आपल्या आयुष्याचे भले होईल. हा त्याचा मथितार्थ आहे. आपल्यावर सुसंस्कार घडण्यासाठी मोरोपंतांनी म्हटल्याप्रमाणे, ‘सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो’ ची गरज आहे. ती मिळवण्यासाठी सज्जनांची सेवा करण्याची नम्रता आपल्याकडे असावी, असेच तुकारामांना म्हणावयाचे आहे.

जे बोलतात ते न करणारे, समाजात पदोपदी भेटतात. निवडणुका आल्या की, राजकीय नेत्यांचे पीक येते. मग त्यांच्या आश्वासनांची बरसात होऊ लागते. बिचारा समाज भोळ्या आशेने त्या आश्वासनांच्या पावसात भिजण्याची स्वप्ने पाहू लागतो. पण एकदा का निवडणूक संपली  की सारे पावसाळ्यातल्या छत्र्यांसारखे उगवलेले सारे उमेदवार कुठल्याकुठे लुप्त होतात ते कळतही नाही. समाजाच्या अडचणींशी वा विकासाशी त्यांना देणे-घेणे नसते. सत्तेच्या शिडीने आपले उखळ कसे पांढरे करता येईल एवढाच त्यांचा ध्यास असतो. निवडणुकीपूर्वी बसने अथवा रेल्वेने प्रवास करणारे नगरसेवक किंवा आमदार वर्षा-दोनवर्षाच्या काळातच स्वतःच्या बंगल्यात राहायला जातात. दाराशी चार-दोन गाड्याही दिमतीला उभ्या राहतात. गावाला मोठमोठ्या जमिनी खरेदी करतात. याउलट एस.एम.जोशी, ग.प्र.प्रधान यांच्यासारखे प्रामाणिक आणि निष्ठावंत नेते, यांनी राष्ट्रीय पातळीवर अनेक मोठमोठाली पदे काय पण त्यांनी शासकीय वाहनाचा कधीही आपल्या वैयक्तिक कामासाठी उपयोग केला नाही. राजकीय सामर्थ्यासाठी तथाकथीत नेते कुठल्याही खालच्या थराला जातात. कसलीही सवंग विधाने करतात. पण ज्यांनी समाजाचे प्रबोधन करायचे, ते धार्मिक नेतेही आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी अतिशय चुकीच्या मार्गांचे अवलंबन करून, समाजाच्या भावना भडकविण्यात भूषण मानतात. कुंभमेळ्यासारख्या पवित्र ठिकाणी पहिले स्नान कोणी करायचे यापासून अनेक मानापानाच्या कारणांवरून तिथे साधु-महंतांमध्ये आणि त्यांच्या अनुनयांमध्ये होणारे वाद लाठ्या-काठ्यांपासून शस्त्रे-तरवारी हाती घेऊन हाणामाऱ्या होईपर्यंत वाढत जातात. मग तुकारामांना पडलेला प्रश्न तुम्हा-आम्हालाही पडतो. की यांना साधू कसे म्हणावे?

एकनाथ महाराजांनी भागवत धर्मावर आयुष्यभर प्रवचने केली. त्यावर विपुल लेखन केले. स्वतः गृहस्थाश्रमात राहूनही संतासारखे जीवन जगले. गोदाकाठी तापलेल्या वाळूच्या चटक्यांनी कळवळणारे हरीजनाचे मुल त्यांनी नि:संकोचपणे उचलून छातीशी कवटाळले. अंगाला राख न फासता, कुठे आश्रमात वा मठात राहता त्यांना संतपद प्राप्त झाले. तुकाराम म्हणतात, “अशा सज्जनांच्या दारी द्वारपाल होऊन सेवेसाठी उभा राहीन. त्यांच्या पदस्पर्शाने मला चांगले, शुद्ध जीवन जगण्याची उर्मी मिळेल.” आज अनेकदा असे म्हणायची वेळ येते की ज्या पायावर डोके ठेवावे, असे पायच उरले नाहीत. म्हणूनच तुकाराम म्हणतात “जे बोलतात, तसेच चालतात, तसेच जीवन जगतात, तेच माझे देव आहेत.” त्यांच्या पायाशी माझ्या श्रद्धा आणि निष्ठा वाहण्यात मला कसलीही लाज वाटणार नाही. अन ती का वाटावी?