संतप्रसाद

काजव्यांच्या ज्योती

मोले घातले रडाया नाही आसू आणि माया 

तैसा काय भक्तीभाव रंग बेगडीचा न्याय

वेठी धरल्या दावी भाव मागे पळायाचा ठाव 

काजव्यांच्या ज्योती तुका म्हणे न लगे वाती 

तुकाराम महाराजांचा वरील अभंग जीवनाचे तत्वज्ञान किती सोप्या भाषेत सांगून जातो. आजच्या काळात अनेकांना ‘मोले घातले रडाया’ चा अर्थ लागणार नाही. पूर्वी काही समाजामध्ये विशेषतः श्रीमंत घराण्यांमध्ये कुणी मेले म्हणजे स्वर्गवासी झाले की रडण्यासाठी पैसे देऊन माणसे आणवली जात. कारण रडणे त्या श्रीमंतांच्या प्रतिष्ठेला शोभून कसे दिसणार? म्हणून आपले दु:ख व्यक्त करण्याचे प्रदर्शन अशा भाडोत्री रडणाऱ्यांकडून करविले जाता असे. असं खोटं रडणाऱ्यांच्या डोळ्यात खरे अश्रू कुठून येणार? ना आसू, ना माया अशी त्यांची स्थिती. तुकाराम भक्तीच्या संदर्भात हे सांगत असले तरी साऱ्याच जीवनात अशा श्रद्धेची आवश्यकता आहे. ते पुढच्या ओळीतून स्पष्ट होते. कोणतेही काम करावयाचे असले, तरी त्या कामाविषयी आत्मीयता आपुलकी व श्रद्धा नसेल तर ते काम योग्य रीतीने कसे होईल?

आपण सरकारी कार्यालयात अथवा बँकेत कामासाठी जातो. काही ठिकाणी सहजासहजी प्रतिसाद मिळून चटकन काम होते. तर बहुतेक ठिकाणी तेथील कर्मचाऱ्यांच्या कपाळावर आठ्या उभ्या राहून त्यांचे तिरसट बोलणे अनुभवास येते. आपण अनेकवेळा बसमधून प्रवास करतो. बसमध्ये तशी फारशी गर्दी नसूनही बसचा कंडक्टर प्रवाशांवर उगाचच खेसकत असतो. याच विरुद्ध एखाद्या बसमध्ये खूप गर्दी असूनही त्या बसचा कंडक्टर सगळ्या प्रवाशांशी हसत खेळत बोलून स्वतःचा आणि त्याचबरोबर प्रवाशांच्याही मनावरील ताण हलका करीत असतो. असे का व्हावे? आपले काम म्हणजे आपल्यावर लादलेला एक बोजा आहे. आपणास या कामाशी काही देणे घेणे नसून महिन्यानंतर मिळणाऱ्या वेतनासाठी हे सारे करावे लागत आहे. अशी काहींची भावना असते. अनेकजण तर हे आपले हे गेल्या जन्मीचे पाप आपणास फेडावे लागत आहे; अशी काहींची भावना असते. अनेकजण तर हे आपले हे गेल्या जन्मीचे पाप आपणास फेडावे लागत आहे, असे म्हणत आपल्या गतजन्माला दोष देऊन मोकळे होतात. यांचा जर पुनर्जन्मावर एवढा विश्वास असेल तर या जन्मात काही चांगले कार्य करावे; अन्यथा पुढील जन्मात ते आपणास भोगावे लागेल असे का यांना वाटत नाही?

मुळातच पुनर्जन्माची कल्पना सामान्य माणसाच्या आवाक्या पलीकडली! पूर्वसुरींनी सांगितले; धर्म ग्रंथातून विवेचन आले, म्हणून नाकारता येत नाही. पण प्रत्यक्ष अनुभवाचा दाखलही देता येत नाही. अशी विचित्र परिस्थिती! गुरुवर्य खैरांसारखे ज्ञानी, गीतेचा अर्थ सामान्यांसाठी उलगडतात तेव्हा ते म्हणतात “पुनर्जन्माची काळजी करण्याऐवजी या जन्माचाच विचार करा. जे कर्म आज करू त्याचे फळ त्याच्या पुढच्या दिवसात मिळेल. निद्रेनंतरचा दुसरा दिवस; एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय; एका संस्कारातून दुसरे काम, हे जणू पुनर्जन्मासारखे आहे. तोच अर्थ यातून व्यक्त होतो.” हीच भावना गीतेवरील  भाष्य करणाऱ्या अनेक विचारवंतांनी वेगवेगळ्या पद्धतीने मांडली आहे. ते सांगतात की, ‘आपल्या कर्माची फळे, याच जन्मी आपल्या पदरी पडतात. म्हणून प्रत्येक काम मनापासून, सत भावनेने केल्यानेच यश, समाधान आणि कीर्ती लाभेल.’ संतांनीही मोक्षाची वाट दाखवितांना सत्कार्माचाच आग्रह धरला आहे.

तुकाराम म्हणतात ‘मनात भाव नसेल, श्रद्धा नसेल, आत्मीयता नसेल, तर कामात जिवंतपणा कसा येणार? सोनेरी कागद लावून चकचकीत केले म्हणून एखाद्या वस्तूला सोन्याचे मोल येईल काय?’ सचिन तेंडूलकरचे यश पाहून अनेकजण त्याच्यासारखे होण्याचे स्वप्न पाहतात. मग तसेच कपडे, चालणे, हातात बॅट धरण्याची पद्धत, अशा नकला करीत राहतात. पंडित नेहरूंच्या काळात अनेक नेते तशीच शेरवानी व टोपी घालीत. छातीवर गुलाबाचे फुल लावीत. लहान मुलांबरोबर आपले फोटो काढून घेत. अशा बेगडी देखाव्याने का नेहरूंचे मोठेपण प्राप्त होणार होते? या नकलाकारांना त्या श्रेष्ठ व्यक्तीची त्या विषयासंबंधीची तळमळ, अभ्यास, एकाग्रता आणि त्यासंबंधी असलेली पराकोटीची आत्मीयता दिसत नाही. अशामुळे त्यांचे हंसे होते. यश दूर दूर पळते. आणि ही माणसे मात्र आपल्या नशिबाला किंवा कर्माला दोष देत राहतात.

भगवद गीता आपणास हेच वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असते. जे काही आपले कर्म असेल ते ..मग ते विद्यार्थ्याचा अभ्यास असो, शेतकऱ्याचे शेतातले काम असो, मग तो खेळाडू असो, कर्मचारी असो, शास्त्रज्ञ-तंत्रज्ञ असो ज्याने त्याने आपल्या कामाबद्दल श्रद्धा आपुलकी व निष्ठा बाळगायला हवी.  ते एक पवित्र कार्य आहे या भावनेने आपल्या शंभर टक्के प्रयत्नांची जोड द्यावयास हवी. यालाच आपण ‘एखाद्या गोष्टीला वाहून घेणे’ असे म्हणतो. भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले. आजही आपल्या संस्थेसाठी, समाजासाठी, आपल्या खेळासाठी, संशोधनासाठी, देशरक्षणासाठी, सर्वस्व झोकून देणारी माणसे, इतरांनाही दीपस्तंभासारखी मार्ग - दिशा दाखवीत असतात. त्यांची आपल्या कामाबद्दल निष्ठा, श्रद्धा, चिकाटी आणि प्रयत्न हीच जीवन-सूत्रे असतात. तुकाराम महाराज अशा थोरांची वरवर नक्कल करू पाहणाऱ्यांना काजव्याची उपमा देतात. तो अंधारात लुकलुकताना दिसतो. पण जशी एखादी छोटी दिवटी आपल्या छोट्या प्रकाशानेही अंधारात घर उजळून टाकते; तसे काही करू शकत नाही. ते म्हणतात “प्रकाशासाठी वातीची जरुरी असते.” ‘वात’ हे त्यागाचे प्रतिक आहे. ती स्वतः जळत जाते, पण आपल्या भोवतालचा अंधार दूर करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करते. तसेच अज्ञानाच्या अंधश्रद्धेचा अंधार- दुरितांचे तिमिर नष्ट करण्यासाठी निष्ठेने काम करावे लागेल. ज्याचे त्याचे जे कर्तव्य-विहित कर्म आहे, ते त्याने प्रामाणिकपणे आत्मीयतेने आणि निष्ठेने करावे. केवळ आपण खूप काम करतो, असा आव आणून उपयोगाचे नाही. त्यामुळे ते काजव्यासारखे लुकलुकतील पण त्यांचा प्रकाश -प्रभाव पडणार नाही. अपेक्षित यश मिळणार नाही हे त्यांनी ध्यानी घ्यावे हाच या अभंगातून बोध घ्यावयाचा आहे.