आकल्प आयुष्य व्हावे तयां कुळा माझिया सकळा हरीच्या दासा १.
कल्पनेची बाधा न हो कोणे काळी ही संत मंडळी सुखी असो २.
अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांसी ३.
नामा म्हणे तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग ४.
भक्त शिरोमणी संत नामदेवाचा हा अभंग साऱ्याच संतांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडवितो. संतांनी आपल्यासाठी वा आपल्या आप्तजनांसाठी देवाकडे काही मागितले नाही. त्यांची दृष्टी सर्वव्यापी किंबहुना विश्वव्यापी होती. त्यांनी सारे विश्व सुखात राहो अशी सदैव प्रार्थना केली. ज्ञानदेवांनीही अशीच प्रार्थना केली. त्यांनी आपल्या पसायदानात दुरिताचा, अज्ञानाचा तिमिर, अंधकार जाऊन विश्व स्वधर्माच्या सूर्याने तळपो, तेजाळून जाओ असे मागणे मागितले. ऋषीमुनींनी उपनिषदात ‘सर्वेपी सुखिनः संतु | सर्वे संतु निरामया’ अशीच प्रार्थना म्हटली. या संतजनांनी आपणास मोक्ष मिळावा, धन-धान्य मिळावे किंवा यशकीर्ती लाभावी अशी प्रार्थना कधीही केली नाही.
संत नामदेव म्हणतात “माझ्या सर्व हरीच्या दासांचे आयुष्य आकल्प म्हणजे विना त्रासाचे होवो.” सारे जन हे हरीची प्रजा वा दास आहेत. अशी ही भावना आहे. एखाद्या राज्यातले प्रजाजन पशु पक्षी प्राणी झाडे वेली हे त्या राज्याच्या आधीन असलेली सत्ता असे. तसे आपण देवाचे हरीचे जन आहोत. कर्ता करविता तोच आहे. अशी श्रद्धा त्यामागे आहे. त्यामुळे सर्वांचे आयुष्य जीवन ‘आकल्प’ कसल्याही त्रासाशिवाय जावो असे नामदेव म्हणतात. मानवी जीवनात होणाऱ्या अनेक त्रासाचे मूळ कारण मानवी स्वभावाच असतो. इर्षा, स्वार्थ, स्पर्धा हेवेदावे यातूनच अनेक कटकटी निर्माण व्हायला हवेत. ज्ञानदेवांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘खळांची व्यंकटी सांडो’ म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या माणसांची वाईट प्रवृत्तीच जर नाहीशी झाली तर जीवनात कटकटी वैर भावना कुठून निर्माण होणार?
नामदेवांनाही तेच अभिप्रेत आहे. समाजात शांतता निर्माण झाली, समभाव उत्पन्न झाला की जीवन सुखमय होईल. नामदेव पुढे म्हणतात की ह्या संतमंडळींना कल्पनेची बाधा न होवो. जे लोक कल्परहित आहेत शुद्ध भावनेचे आहेत. ते संतासारखेच आहेत. असे नामदेवांना सुचवायचे आहे. इथे ज्ञानदेवांच्या विचारांचा मागोवा त्यांनी घेतलेला दिसतो. ज्ञानदेव पसायदानात म्हणतात, ‘भूमंडळी सर्वत्र ईश्वर निष्ठांची मांदियाळी होवो.” मनातील वैरभाव दुष्टभाव नष्ट नाहीसे झाले की सारेजण संतसमान होतील. पण मन हे अतीचंचल. त्यात येणाऱ्या विचारांची गती कोण रोखणार? किती काही ठरविले तरी मनात वेगळेच भाव उत्पन्न होणार. या भावनिक गोंधळाला नामदेव कल्पनेची बाधा म्हणतात. समर्थ म्हणतात “अचपळ मन माझे नावते आवरीता.” हे मन आवरायला जावे तर ते अधिक गतीने विचार करते. जे विचार आपण करू नयेत असे वाटत राहते तर तेच तेच विचार पुन्हा पुन्हा मनात येत राहतात. म्हणून नामदेव देवालाच साकडं घालतात. ‘हे देवा मनाला आवर घाल. कल्पनेची बाधा या संत जनांना होऊ देऊ नकोस. त्यांचे चित्त स्थिर राहू दे. तरच ते सुखी होतील.’ मनाच्या चंचलतेची पुढील पायरी म्हणजे अहंकार. आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत ही भावना मनात रुजली की इतर सारे तुच्छ वाटायला लागतात. राज्यकर्त्यांना सत्तेची, महंतांना धार्मिक नेतृत्वाची, घरातील कर्त्या पुरुषाला आपल्या मोठेपणाची घमेंड वाटू लागते. इतकेच कशाला साध्या कचेरीत कारकून चपराशापेक्षा श्रेष्ठ, अधिकारी कारकुनापेक्षा श्रेष्ठ, तर मोठे साहेब त्या अधिकाऱ्यांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानत राहणार. अशी श्रेष्ठत्वाची मालिकाच सुरु होते. मग समानतेची भावना कशी जागी होणार? सारे एका पातळीवर येण्यासाठी ही अहंकाराची भावना वृत्ती नष्ट होवो. वारकरी पंथाचे हेच तर पायाभूत तत्व आहे. तिथे सारेजण सारखेच. एक दुसऱ्याला उराउरी भेटतो. एकमेकांना ते पाया पडतात. अशी समानतेची भावना जागवण्यासाठी ‘अहंकाराचा वाराही न लागो राजसा’ असे नामदेव म्हणतात.
हे सारे भाविकांसाठी किंवा केवळ भक्तांसाठी असे नव्हे. तर नामदेव म्हणतात ‘जे कधी तरी देवाचे पांडुरंगाचे नाव घेतात त्या सर्वांचे कल्याण होवो. जे केव्हातरी ईश्वराचे स्मरण करतात त्यांच्याही मनात विवेकबुद्धी जागी असून त्यांनाही काही चांगले व्हावे असे वाटत असते असा त्याचा अर्थ आहे. ईश्वराची भक्ती सतत जपताप करून अथवा मंदिरातच जाऊन होते असे नव्हे. तर आपला संसार व्यवसाय करता करता देखील देवाचे स्मरण करता येते. ईश्वराचे स्मरण हे आपणास चांगले सत्प्रवृत्तीने वागण्याचे स्मरण देत असते. म्हणून जे मुखाने पांडुरंगाचे नाव घेत असतात त्यांचे कल्याण होवो असे नामदेव महाराज म्हणतात. एका परीने ते असंच सुचवितात की अगदी भक्तीत दंग झाला नाहीस तरी चालेल. निदान अधून मधून ईश्वराचे स्मरण ठेवा. म्हणजे वाईट विचारांचा लोप होईल. दुरिताचा अंधार तिमिर जाऊन सर्वांचे आयुष्य आकल्प म्हणजे चिंतामुक्त होईल.