रिती रिवाज

दीपज्योती नमोस्तुते

एका प्रसिद्ध भाक्तिगीतातील पहिली ओळ आहे ‘ज्योत दिव्यातील मंद तेवते देवघरातील देवापाशी’ अशा मंद मंद जळणाऱ्या ज्योतीचे मानवी जीवनात फार महत्वाचे स्थान आहे. स्वतः जळून इतरांना प्रकाश देणारी म्हणून ज्योतीला त्यागाचे प्रतिक मानतात. ज्योत प्रकाशाचे प्रतिक! सूर्य साऱ्या जगाला प्रकाश देतो. पण तो अस्ताला गेला की जगतावर पसरलेले अंधाराचे साम्राज्य दूर करण्याचे काम करते ती इवलीशी ज्योतीच. अंधार म्हणजे अज्ञान. अज्ञानाचा तिमिर म्हणजे अंधार दूर सारणारी ज्योती ती ज्ञानज्योती! ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणाऱ्या या ज्योतीला वंदन असो. अशी ही प्रार्थना वेदकाळापासून म्हटली गेली. आपल्या आद्य ऋषीमुनींनी ज्योतीचे महात्म्य ओळखले. मानवी जीवनाचा विकास करावयाचा असेल तर प्रथम अज्ञान दूर व्हावयास हवे. म्हणून ज्ञानरूप ज्योतीची प्रार्थना त्यांना अगत्याची वाटली. आज विज्ञानामुळे शेकडो प्रकारचे दिवे वापरात आले आहेत. त्यांचा लखलखाट दिवसरात्र घरादारात, कार्यालये, बाजारात आणि औद्योगिक केंद्रांमधून होतो आहे. म्हणून इवल्याश्या ज्योतींचा कुणालाही विसर पडलेला नाही. आणि पडणारही नाही. कारण त्या साऱ्यांचे मूळ-स्त्रोत ‘ज्योतच’ आहे हे कसे विसरता येईल?

प्राणतत्व म्हणजे मानवी शरीरातील चैतन्य! मानवी शरीरात चैतन्य म्हणजे प्राण नसेल तर राहते ते केवळ कलेवर ! निष्प्राण देह. मग आपण म्हणतो, ‘त्याची प्राणज्योत मालवली.’ मानवी जीवन म्हणजे सतत जळत राहणारी ज्योतच जणू! ती ज्योत मालवली की, आटोपलाच सारा कारभार! त्यातून एक धडा घ्यावयाचा, शरीरात केवळ प्राण किंवा चैतन्य असणे म्हणजे जिवंतपणाचे लक्षण नव्हे. ती ज्योत सतत जळत राहायला हवी. सदैव कर्तव्यात मग्न असावयास हवी. आपण जळू इतरांना प्रकाश देणारी हवी. तरच त्या जिवंतपणाचे सार्थक होईल. या विश्वात लाखो प्राणी जन्मजात आणि काळाच्या उदरात नष्टही होतात. पण आपले आयुष्य इतरांसाठी वेचणारे अमर होतात. वंदनीय ठरतात. अन्यथा केवळ स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी जगणारे हजारो विस्मृतीच्या खाईत नाहीसे होतात. तर कार्यप्रवण व्यक्ती, देशासाठी शीर तळहाती घेऊन लढणारे सैनिक, श्रमिक, शेतकरी आणि समाजसेवक हे जणू समाजातील धगधगत्या ज्योतीच ठरतात.

आपल्या डोळ्यांनाही ‘नेत्रज्योती’ असेच आपण म्हणतो. नेत्र म्हणजे प्रकाशाकडे पाहण्याची दारेच! या विश्वातील विविध रूपे, आकार, रंगवैभव, सौंदर्य, सजीव आणि निर्जीव सृष्टी पाहण्याचे एकमेव साधन! या विश्वातील चराचराचा खजिना या नेत्रज्योतीच तुम्हाआम्हाला दाखवितात. म्हणून हे इंद्रिय इतर कुठल्याही इंद्रीयांपेक्षा अधिक महत्वाचे ठरते. या जगताचे ज्ञान होण्यासाठी नेत्रज्योतीच प्रकाश दाखवितात. आणि या ज्यांच्याकडे नाहीत त्यांनाही ज्ञानाचा प्रकाश दाखविणारी आणखी एक ज्योती असते. ती असते त्यांच्या मनातील, हृदयातील आंतज्योती! ही डोळस, अंध, सुदृढ आणि अपंग या सर्वांच्याच अंतर्मनात असावी लागते. तिच्या जोरावर अंधही या विश्वाचे ज्ञान मिळवतातच, पण ही ज्याती कुठल्याही कार्यासाठी प्रेरणा आणि उर्जा देते. ती सबळ नसेल तर शारीरिकरीत्या सबळ असणारी व्यक्तीही दुर्बळाहून दुर्बल ठरते. या ज्योतीच्या प्रकाशात, तिच्या आत्मबलावर अंध, अपंग आणि उपेक्षित माणसे असामान्य कर्तृत्व दाखवून यशाची उंच शिखरे गाठतातच, पण दृष्टी असणाऱ्यांनाही थक्क करतात. म्हणून ही ज्ञानज्योती सर्वश्रेष्ठ म्हणावयास हवी.

ज्ञानदेवांनी आपली ज्ञानेश्वरी पूर्ण होतांना विश्वात्मक देवाकडे प्रसादाचे मागणे केले.  साऱ्या मानवजातीच्या कल्याणाची प्रार्थना या पसायदानात सामावली आहे. ही एक ज्ञानज्योतीच आहे. गेली आठ शतके ती अखंड तेवत आहे. आणि पुढे विश्वाच्या अंतापर्यंत तशीच तेवत राहणार आहे. ज्ञानदेव म्हणतात, ‘दुरिताचा म्हणजे अज्ञानाचा तिमिर, अंधार नाहीसा होवो. आणि सद्भावनेचा, प्रेमाचा प्रकाश साऱ्या विश्वात पसरो.’ ते दुर्जनांचा, वाईट प्रवृतींच्या माणसांचा अथवा जनांच्या हितशत्रूंचा नाश किंवा नायनाट चिंतीत नाहीत. तेही अखेर मानवच आहेत. एकाच्या नाशातून दुसरीकडे सूडबुद्धीचे बीज पेरले जाईल. दुष्ट माणसे जातील पण त्यांचे विचार तसेच राहतील. म्हणून ज्ञानदेव म्हणतात, “मानव जात तशीच राहू दे. पण त्यांच्यातील खल, वाईट प्रवृत्तीचा अंध:कार नाहीसा होऊ दे.” मानवाच्या कपट, संशय, द्वेष, सूड आणि घात यासारख्या वाईट प्रवृत्ती जर लोप पावल्या तर राहील केवळ सद्भाव. हा सद्भाव केवळ मानवा-मानवामध्ये नव्हे तर सर्व भूतमात्रामध्ये, या विश्वातील सर्व चराचरामध्ये परस्पर मैत्र निर्माण करणारा होवो, असे ज्ञानदेवांचे मागणे आहे. ही विश्वप्रेमाची ज्ञानज्योती ज्ञानदेवांनी आठनऊशे वर्षांपूर्वी लावली. तिची खरी गरज आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवत आहे. एकीकडे विज्ञानाच्या सहाय्याने मानव एकामागून एक प्रगतीची शिखरे पादाक्रांत करीत आहे. पण त्यासाठी पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होत आहे. जीवसृष्टीतील अनेक वन्य प्राणी, पक्षी, इतर भूचर व जलचर प्राणी इतकेच नव्हे तर मानवी वन्य जाती-जमाती नष्ट होऊ लागल्या आहेत. माणूस माणसापासून दूर होत चालला आहे. एकमेकातील संवाद, प्रेम, जिव्हाळा व मैत्र दुरापास्त होत चालले आहे. ज्ञानदेवांनी “भूतां परस्परे पडो | मैत्र जीवांचे” अशी जी प्रार्थना केली ती किती चिरंतन गरजेची आहे, हे आता वेगळे सांगावयास नको.

समाजात भ्रष्टाचार, अपप्रवृत्ती, सूड, अबलांचे दमन यासारख्या अनेक दुष्ट प्रवृत्ती कायमच असतात. आज एकीकडे विकासाचे झेंडे पदोपदी फडकताना दिसतात, तर दुसरीकडे या अपप्रवृत्तीनी समाज पोखरून काढल्याचे अत्यंत दुर्धर चित्र समोर येत आहे. या दुष्ट प्रवृत्तीचा स्फोट होऊन सारा समाज नष्ट होईल की काय अशी भीती वाटण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे. पण सुदैवाने तसे होत नाही. कारण अशा प्रतिकूल काळातही समाजात कुठे ना कुठे सत्कार्याची पणती हाती घेऊन झटणारे वेगवेगळ्या रुपात उभे राहिलेले दिसतातच. समाजातील दुरिताचा अंधार नाहीसा करण्याच्या प्रयत्न या ज्योती आपापल्या परीने करीत असतात. म्हणूनच मानवी जीवनात कुठेतरी आशेची सोनेरी किरणे आपली पावले उमटविताना दिसतात ज्योत नेहमीच छोटीशी असते ती मंद, पण स्थिरपणे जळते. पण ती या धरतीवरचा अंधार, तिमिर दूर करण्याचा प्रयत्न करते. इतरांना प्रकाश दाखविते. त्याचबरोबर एका ज्योतीतून हजारो ज्योती उजळण्याचे सामर्थ्य त्या इवल्याश्या ज्योतीमध्ये असते हेही विसरून चालणार नाही. येशु-खिस्त, भगवान बुद्ध, ज्ञानेश्वर आणि महात्मा गांधी यांसारखे अनेक संत महात्मे समाजाला तारणारे दीपक ठरतातच. पण बाबा आमटे, गाडगेमहाराज, महात्मा फुले, महर्षि कर्वे, तुकडोजीमहाराज, साने गुरुजी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्यापासून दीन-दलितांसाठी, अपंगासाठी आणि उपेक्षितांसाठी काम करणारे, समाजातील अनेक छोट्यामोठ्या व्यथा दूर करण्यासाठी झटणारे समाजसेवक, आपला व्यवसाय सेवाभावी वृत्तीने करणारे डॉक्टर्स, शिक्षक, कर्मचारी ह्या साऱ्या समाजातील प्रकाशज्योतीच असतात. आपापल्या परीने या ज्योती समाजात आशेची, प्रेमाची आणि सद्भावाची किरणे पेरीत असतात. म्हणून त्या वंदनीय ठरतात.

कालपरत्वे दिव्याची म्हणजेच ज्योतीची रूपे बदलत गेली. आज तर विजेच्या दिव्यांचा लखलखाट शहराशहरातून, रस्तोरस्ती डोळे दिपवून टाकू लागला आहे. हा झगमगाट दिमाखाने आपले वैभव प्रदर्शन करीत असतो. पण देवापुढे अखंड जळणारी समईची ज्योत किंवा चर्चमध्ये मंद जळणाऱ्या मेणबत्तीत ज्योत आपल्या पवित्र्याने मनाला जी भुरळ घालते ती त्या झगमगाटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ वाटते. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी एके ठिकाणी हीच भावना व्यक्त केली आहे. ते म्हणतात...

‘नवलाख तळपती दीप विजेचे येथ 

उतरली तारकादळे जणू नगरात 

परी स्मरते आणिक करते व्याकूळ केव्हा 

त्या माजघरातील मंद दिव्याची वात’

वैभवशाली अनेक राजे-महाराजे काळाच्या उदरात विस्मृतीत गेले. पण वर उल्लेखलेल्या संत, महात्म्यासारखे नंदादीप जनमानसाच्या मनात चिरंतन तेवत राहतात. ‘ज्योत’ किती मोठी, यापेक्षा तिचे कार्य किती मोलाचे हे महत्वाचे ठरते. त्यामुळे विज्ञान किंवा वैभवाच्या बळावर कितीही प्रकारचे झगमगीत दिवे निर्माण झाले तरी अंधारातील वाटा उजळून मार्ग दाखविणाऱ्या ज्योतीचे महात्म्य कधीच कमी होणार नाही.

म्हणून या ज्योतीला देवत्व प्राप्त झाले. ‘दीपज्योती नमोस्तुते’ अशी प्रार्थना त्यामुळेच अस्तित्वात आली. ज्योतीची उपासना म्हणजे त्यागाची उपासना, ध्येयाची उपासना, ज्ञानाची उपासना आणि आपल्या निश्चयाची उपासना! आपल्या हृदयातील प्रेमाची, पावित्र्याची, मांगल्याची आणि सत्वाची उपासना! अशी ही प्रत्येकाच्या अंतरंगातील उर्मिची ज्योत अखंड तेवत राहो, म्हणून तिची उपासना करायची. ‘ज्योत’ या कवितेत कवी वि. म. कुलकर्णी यांनी हाच संदेश किती सहज शब्दात दिला आहे.

एकाच ठावे काम मला 

प्रकाश द्यावा सकलांना 

कसलेही मज रूप मिळो

देह जळो अन जग उजळो l