रिती रिवाज

नवसाचा उपवास

जवळ जवळ सर्वच धर्मात उपवास करणे हे आपल्या भक्तिभावाचे एक साधन म्हणून वापरलेले दिसते. हिंदुंमध्ये कुणाचा उपवासाचा वास ठरलेला असतो, तर कुणाची भारतीय पंचांगाप्रमाणे काही तिथीनुसार एकादशी, संकष्टी, प्रदोष, शिवरात्र असे मासिक दिन असे उपवासासाठी ठरलेले असतात. तर कुणी महाशिवरात्र, कृष्णाष्टमी, रामनवमी, आषाढी एकादशी असे वार्षिक सणाचे उपवास असतात. जैन, इस्लाम, ख्रिश्चन, बौद्ध अशा बहुतेक धर्मातही उपवासाच्या रिती आहेत. मात्र ते करण्याच्या पद्धती प्रत्येक धर्मात निरनिराळ्या आहेत. सर्वच धर्मात आपापल्या ईश्वराप्रती आपल्या भावना, श्रद्धा आणि निष्ठा व्यक्त करण्याचा हा एक मार्ग मानण्याचा समान धागा दिसून येतो. त्याचबरोबर ह्या प्रत्येक उपवासामागे त्या भक्ताला अथवा त्याच्या सुहृदाला काहीतरी मिळावे म्हणून ईश्वराला मागणे वा साकडे घातलेले दिसून येते. आपली उपवासरूपी सेवा देवाच्या दारी रुजू होऊन देव आपणास प्रसन्न होईल आणि आपणास इच्छित गोष्ट मिळेल असा भोळा विश्वास त्यामागे दिसून येतो. या मागण्यालाच आपण नवस असे म्हणतो. अमुक मिळाले तर, किंवा अमुकतमूक मिळावे म्हणून उपवासाचे साकडे घातलेले असते. ‘उपवास हे संयमाचा अभ्यास करण्याचे महत्वाचे साधन आहे’ हा मुलभूत हेतू मात्र कुणी ध्यानात घेत नाही.

मानव हा एकमात्र असा सजीव प्राणी आहे की, जो विचार करू शकतो. आपले विचार, भावना, अनुभव व कल्पना शब्दातून व्यक्त करू शकतो. दुसऱ्यांशी संवाद साधू शकतो. पण त्याचबरोबर मानव हा असा एकमेव प्राणी आहे की, ज्याचे संपूर्ण समाधान कधीही होऊ शकत नाही. इतर सारे पशू, पक्षी, जलचर किंवा भूचर आपले अन्न-पाणी जे असेल त्या स्थितीत मिळाल्यावर समाधान पावतात. मानवाचे मात्र अन्न, वस्त्र आणि निवारा याबाबत इच्छा, आकांक्षा आणि महत्वाकांक्षा थांबतच नाहीत. या वृत्तीमुळे मानवी संस्कृतीचा विकास घडत गेला हे जरी सत्य असले तरी मिळाले त्यापेक्षा अधिक चांगले, अधिक प्रमाणात मिळावयास हवे होते, अशी असमाधानी भावना त्याला सदैव छळत असते हेही नाकारून चालणार नाही. निवाऱ्यासाठी प्राणी-पशूपक्षी परंपरेने त्याच पद्धतीची घरटी बांधत असतात. उदरभरणासाठीही वर्षानुवर्षे तेच, तेच अन्न भक्षण करून निर्वाह करीत असतात. चवीसाठी आज काही वेगळे हवे असे म्हणत ते नवनवे प्रकार शोधात नाहीत, किंवा त्यासाठी समोरचे अन्न नाकारीतही नाहीत. माणसाचे मात्र तसे नसते. रोज चवीचे, वेगवेगळ्या प्रकारचे, आवडणाऱ्या रुचीचे अन्न मिळविण्याचा त्याचा अट्टाहास असतो.

आणि हे केवळ अन्नाच्या बाबतीतच असते, असे नव्हे तर घर म्हणजे निवारा, वस्त्रे-प्रावरणे, गृहसजावट, अलंकार तसेच व्यवसायापासून प्रत्येक गरजेमध्ये मानवाची अशी चिकिस्तकवृत्ती दिसून येते.

या इच्छा-आकांक्षांना संयमाचा आवर घातला नाही, तर त्या बेलगाम वारुसारख्या बेफाममध्ये पुढे पुढे पळत राहतील. त्याला आवर घालण्याची पहिली पायरी म्हणजे भोजनावर संयम. रोज, रोज, वेगवेगळ्या  चवीच्या अन्नावर हात मारून अपचनाचा त्रास व्हावयास नको. म्हणून एक दिवसाचे लंघन केले तर आरोग्यालाही हातभार लागेल. पण याला काही निमित्त नसेल तर मुद्दाम हे उपद्व्याप कोण करणार? म्हणून त्याला उपासनेचा आधार. शिवाय लंघनात भुकेकडे सतत लक्ष जायला नको म्हणून आपापल्या प्रिय देवाला स्मरून काही जप, आराधना किंवा तस्तम काही उपासना करून आपले मन त्यावर केंद्रित करावयाचे. त्यामुळे शरीर शुद्धीबरोबरच मन शुद्धीचाही प्रयोग होत राहणार. हा संयमाचा संस्कार मानवाच्या इतर राहणीवर, अभ्यासावर, कार्यपद्धतीवर किंवा जीवन शैलीवर पडतो हे आपल्या पूर्वजांनी जाणले. सर्व चराचर सृष्टीत ईश्वर पहाण्याच्या विशाल दृष्टिकोनामुळे आपल्याकडे देवांची संख्या अमाप. त्यामुळे ज्याला जो देव प्रिय, त्याला स्मरून त्याने उपवास करण्याचे स्वातंत्र्यही मिळाले. मात्र सदैव असमाधानी वृत्तीने जगणाऱ्या मानवाने त्या उपवासापोटी देवाकडून काहीतरी मागण्याची जोड दिली. त्यामुळे संयमाचा पहिला धडा देणारा हा उपवास आमच्या कर्मकांडांचे एक अविभाज्य अंग होऊन बसला.