रिती रिवाज

नागांचे रक्षण करणारी पंचमी

श्रावण शुद्धपंचमी हा दिवस नाग पंचमीचा सण म्हणून हिंदू धर्मात साजरा केला जातो. जशी कुठल्याही सणाला पौराणिक कथेची जोड दिलेली असते, तशीच याही सणाला सुरस कथेची जोड दिलेली आहे. फार फार वर्षांपूर्वी एका आटपाट नगरात एका ब्राम्हणाची सून गरीबाघरची असते. तिला श्रावणात माहेरी न्यायला कोणी येत नाही. मग नागोबा तिचे मामा बनून येतात. तिला आपल्या घरी म्हणजे वारुळात नेतात. तिचा खूप आदर सत्कार करतात. पण काही अपघाताने तिच्या हातून एका पिल्लाची शेपटी तुटते. मग ती सासरी परत आल्यावर त्या पिल्लासाठी म्हणजे आपल्या भावासाठी पूजा करते वगैरे वगैरे. आणखी एक कथा आहे. एका शेतकऱ्याच्या हातून चुकून नागाच्या वारुळावरून नांगर चालविला जातो. नागाची पिल्ले त्यात मरतात. नाग याचा सूड म्हणून शेतकऱ्याच्या कुटुंबाला दंश करून मारतो. पण त्या शेतकऱ्याची मुलगी मात्र नागाची मनोभावे पूजा करताना पाहून त्याचे मन विरघळते. तो त्या मुलीकडे अमृत देऊन सर्वांना जिवंत करतो. इ...इ. यातून आपण तात्पर्य काय घ्यायचे?

आपला देश कृषिप्रधान. बहुतेक समाजविस्तार, वसाहती पाण्याच्या आश्रयाने म्हणजे नद्या, तळी, तलाव यांच्या काठी झाला. शेती हा प्रमुख व्यवसाय व जीवनाची प्राथमिक गरज ठरली. मानव आपल्या विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधन सामुग्रीचा अनिर्बंध वापर करू लागला. त्याने नैसर्गिक वैभवाची अमानुष हानी करू नये यासाठी प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी वा जाणत्यांनी सातत्याने काही प्रयत्न केले. आज ज्याला आपण पर्यावरण रक्षण असे म्हणतो त्याची जाणीव त्यांना त्या काळातच होती. त्याकाळच्या समाजाला पटतील अशा धार्मिक कथा किंवा ईश्वरी संकल्पनांची जोड त्यांनी या प्रयत्नांना दिली. आज पर्यावरणाची काळजी वाहणाऱ्यांना सर्प-बचाव मोहीम हाती घ्यावी लागते. त्याचा प्रचार करावा लागतो. या मोहिमेची सुरुवात नागपुजनाच्या निमित्ताने प्राचीन काळापासूनच झाली होती असं म्हणायला हवे. त्यासाठी समाजाचे प्रबोधन करायला त्यांनी धार्मिक भावनेचा आधार घेतला. ते त्या काळाशी सुसंगतच होते. बहुतांश समाज अशिक्षित असल्याने त्यांना पुस्तकी ज्ञानाऐवजी कथा, धार्मिक विधी आणि श्रवण यातूनच पर्यावरण रक्षणाचे नियम समाजात रुजविणे त्यांना योग्य वाटले असावे.

मुळात सर्प-जातकुळीतील सर्वच सरपटणारे प्राणी मानवाला भीतीदायक वाटणारे. त्यातील काही विषारी जाती सोडल्यास बहुतेक साप बिनविषारी, निरुपद्रवी. पण सर्व सामान्यांना सापकुळी विषारी कोणती आणि बिनविषारी कोणती याचे ज्ञान नसल्याने आणि विषारी सापांचे प्रताप समाजातून अनुभवास आल्याने साऱ्या सर्प जातीबद्दलच एक प्रकारचा धसका प्रत्येकाच्या मनात बसलेला दिसतो. त्यामुळे वळवळ हालणारी दोरी पाहूनदेखील घाबरून भुई धोपटली जाते. मग खरोखरीचा जिवंत साप पाहताच तो बिनविषारी आहे की विषारी आहे याचा विचार करायला वेळ कुणाकडे असतो. पाहणाऱ्याची भीतीने गाळण-बोबडी वळते. बाकीचे शूरवीर लाठ्याकाठ्या घेऊन त्याचा चेंदामेंदा करायला पुढे सरसावतात. अशा भीतीच्या कारणांमुळे गावकुसाभवताली फिरणाऱ्या या, शेतमळ्यात वावरणाऱ्या अनेक सर्पजाती इतक्या प्रमाणात मारल्या गेल्या आहेत की, त्यातील काही जाती नष्ट तरी झाल्या आहेत तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. प्रचंड वृक्षतोड, जंगलतोड, माळरानावरील नवी बांधकामे किंवा दगडांच्या खाणीसारखी खोदकामे यामुळे अनेक वन्य पशु-प्राणी आणि पक्ष्यांची निवासस्थाने धोक्यात आली आहेत. वाघ-बिबळे मानवी वस्तीजवळ फिरकू लागले आहेत. तसेच सापांची निवासस्थाने, लपण्याच्या जागा नष्ट झाल्याने साहजिकच त्यांचा वावर उघड्यावर अधिक होऊ लागला आहे. उघड्या माळरानावर औद्योगिक वसाहती उभय राहात असताना आजूबाजूच्या गावातून अनेक साप निघाल्याची उदाहरणे सर्वत्र आहेत. म्हणजे निवासस्थानात राहता येत नाही, आणि उघड्यावर वावरू देत नाहीत; अशी शोचनीय अवस्था या सर्पजातीची झाली आहे. इथून तिथून विनाश अटळ ठरला आहे. पुढे काही वर्षांनी अनेक वन्य प्राणी, पक्षी यांच्या प्रमाणेच या सापांच्याही अनेक जाती केवळ चित्रांतून, पुस्तकांतून पाहाण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहाणार नाही. 

पण या पृथ्वीतलावरील जीवसृष्टीतील प्रत्येक घटकाला जगण्याचा, वाढण्याचा, फिरण्याचा वा विकसित होण्याचा हक्क आहे, हेच आम्हा मानवांना मान्य नसल्यासारखी आपली कृती असते. मानव फक्त आपल्या विकासाचाच विचार करतांना दिसतो. त्यासाठी तो झाडे-पाने, प्राणी, पक्षी तसेच इतर भूचर किंवा जलचर, माती, पाणी, पर्वत कशाचाही उपयोग करतो. त्यांच्यावर प्रयोग करतो. त्यांच्या मृत्यूचा, नष्ट होण्याचा अथवा मोडतोडीचा आपल्या वैभवशाली विकासासाठी बिनदिक्कत वापर करतो. त्याच्या विकासाआड येणारी कुठलीही सजीव वा निर्जीव वस्तू तो सर्व शक्तीनिशी दूर करतो. त्यात ‘सर्पजाती’ तर सामान्य जीवनात भीती उत्पन्न करणारी, सामान्य मानवाच्या दृष्टीने निरुपयोगी वाटणारी. तिचे रक्षण कोण आणि कशासाठी करणार? खरे तर साप स्वतःहून कोणावरही हल्ला करीत नाही. मानवी हालचालीची चाहूल लागताच आश्रयाला पळून जाण्याची त्याची वृत्ती दिसून येते. चुकून वा मुद्दाम मारलेल्या धक्क्यामुळे स्व-संरक्षणासाठी साप आपला फणा उभारून फुत्कारतो. पण इतर साप तेही करू शकत नाहीत. साप चावल्याच्या बहुतेक घटना अंधारात, गवतात अथवा अडगळीत पाय पडल्यामुळे किंवा तस्तम अपघातामुळे तसेच नागावर हल्ला केल्यामुळे स्व-संरक्षणासाठी त्याने केलेल्या प्रतीह्ल्ल्यामुलेच घडतात. यात मानवी दोष, बेफिकिरी किंवा आक्रमकताच अधिक दिसून येते. खापर मात्र नाग-सापाच्या माथी मारले जाते.

निसर्गातील प्रत्येक जीवजंतू आपापले नियमितपणे करीत असतो. त्यातूनच पर्यावरणाचा समतोल राखला जातो. ‘जीवो जीवस्य भोजनम’ या उक्तीनुसार अनेक मोठे जीव आपल्यापेक्षा कमी शक्तीच्या प्राण्याचा वा पक्ष्याचा भक्ष म्हणून उपयोग करतात. वाघ, सिंह हरिणासारख्या अनेक लहानमोठ्या प्राण्यांना मारून मांसाहार करतात. गरुड, घार यासारखे मांसाहारी पक्षी काही छोटे प्राणी मारून खातातच पण त्याचबरोबर काही लहान पक्षीही त्यांच्या भक्ष्य स्थानी पडतात. तर सारेच पक्षी छोटेमोठे किटक मारून खातात. तसेच साप देखील उंदीर, बेडूक आणि किटक मारून साप शेतकऱ्यांवर उपकारच करत असतो. कदाचित त्यामुळेच शेताचा रक्षक म्हणून नागपूजा अस्तित्वात आली असावी. शिवाय शेताचा रक्षक नागोबा वावरतोय म्हटल्यावर चोराचिलटांना त्याची भिती वाटायचीच.

निसर्गातील प्राणीजीवन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे पर्यावरणाचा समतोल राखते, हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. पण मानवाच्या बेफिकीर अधिक्षेपामुळे कित्येक प्राणी जीवने धोक्यात आली आहेत. त्यात सापांच्या अनेक जाती नष्ट होण्यामागे मानवी हावच कारणीभूत ठरत आहे. सापाच्या कातडीच्या शोभेच्या वस्तू बनविणारे, सापाचे मांस चवीने खाणारे मांसाहारी सापांच्या अमानुष कत्तली करीत आहेत. ही मानवी वाव पूर्वजांनी प्राचीनकाळातच ओळखली होती असेच म्हणायला हवे. त्यातूनच या नागपंचमी सणाचा उगम झाला असावा. आज साप हा केवळ शेतकऱ्यांचा मित्र राहिलेला नाही. त्याच्या विषापासून अनेक दुर्धर रोगांवर उपचारासाठी उपयोगी पडणारी प्रतिजैविके, औषधे, प्रतिबंधक लसी बनविल्या जातात. अशा प्रकारची संशोधने यापुढेही चालूच राहणार आहेत. अशा रीतीने साप हा मानवाचा मित्रच ठरला आहे. यामुळे साप नष्ट न होता त्यांना सुरक्षितपणे जगता यावे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. नागपंचमीच्या निमित्ताने सापाला दुध पाजण्याच्या प्रकारही त्याच्या जीवितास घातक ठरतो. नागाला दुध ही गारुड्यांची लबाडी असते. नाग कधीही दुध पित नाही. याउलट भूकेपोटी प्यालेल्या दुधामुळे सापाची प्रकृती बिघडून अनेक साप मृत्युमुखी पडतात. याची त्या भाविकांना मात्र जाणीवही नसते. नागपंचमीच्या सणाला नाग्पुजनाचा हेतू नागांचे रक्षण करणारा ठरो, त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करणारा ठरो, हीच या वर्षाची खरी फलश्रुती ठरेल. नाही का?