रिती रिवाज

नारिकेल फलं समर्पयामि, अर्थात नारळ पुराण

तसे पाहिले तर संपूर्ण भारतवर्षाला निसर्गाची अपूर्व देणगी मिळाल्यासारखे अनुपम सौंदर्य जागोजागी दिसून येते. फुलांच्या स्वर्गीय सौंदर्याबरोबर फळांचीही विपुलता, हे आपल्या देशाचे खास वैशिष्ट्य सांगता येईल. भौगोलिक भिन्न भिन्नतेमुळे त्या त्या हवामानात होणारी विविध प्रकारची फळे हे आपल्याला मिळालेले फार मोठे वरदान आहे. जंगलात मिळणाऱ्या जांभळा-करवंदाबरोबरच राजेशाही सफरचंद, आंबा, द्राक्षे, यापासून केळी, फणस, चिकू, पेरू, संत्री-मोसंबी, कलिंगडे यासारख्या शेकडो फळांची निसर्गदत्त देणगी या देशाला लाभली आहे. आंब्याला तर फळांचा राजा म्हणून संबोधतात. पण देवापुढे पुजनासाठीचा मान श्रीफलाचा म्हणजे नारळाचाच! पूजा विधीमध्ये त्याचा ‘नारिकेल फलं समर्पयामि’ असा मानाने उल्लेख होतो. शुभ प्रसंगासाठी लागणारा मंगल कलश, मग तो सत्यनारायणाच्या पूजेतील असो, तो सजणार नारळानेच. एखाद्याच्या सत्कारप्रसंगी महावस्त्राबरोबर देण्यासाठी, सुवासिनीच्या ओटीसाठी, किंवा कुठल्याही देवतेपुढे भक्तिभावाने वाहण्यासाठी पहिला मान तो नारळालाच! कुठल्याही शुभकार्यासाठी नारळ हा हवाच, असे हे नारळाचे मानाचे आणि पावित्रतेचे स्थान हिंदु संस्कृतीमध्ये फार प्राचीन काळापासून चालत आले आहे. आणि यापुढेही ते तसेच शेकडो वर्षे चालत राहील, इतका त्याचा हिंदू मनावर पगडा पक्का आहे.

केवळ नारळाला ‘श्रीफळ’ हे मानाचं स्थान का मिळालं असावं? असा जेव्हा मी विचार करू लागतो हळू हळू अनेक गोष्टींचा उलगडा होऊ लागतो. अर्थातच ही कारणे धार्मिक नसून निसर्गाशी संबंधित आहेत. झाडावर वाढणारे नारळाचे फळ जाड सालीच्या आवरणात आकार घेत जाते. अखेरीस अत्यंत कठीण कवचाच्या आत पाणी व खोबरे असा नारळ तयार होतो. वरचे टरफल झाडावरच कोरडे झाल्यावर आपोआप पडलेला अथवा काढून घेतलेला नारळ नीट उभा करून ठेवल्यास महिने-महिने चांगल्या स्थितीत राहू शकतो. अगदी वरचे टरफल सोलून काढल्यानंतरही आतील खोबरे व पाण्याचे रक्षण त्याचे कठीण कवच म्हणजे करवंटी करीत असते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे इतर सगळी फळे ही विशिष्ट हंगामातच उपलब्ध असतात. त्यांची पूर्ण वाढ झाल्यानंतर म्हणजे पिकल्यानंतर ती फार काळ टिकू शकत नाहीत. म्हणजेच ती नाशवंत असतात. ती शक्यतो लवकर संपविणे जरुरीचे ठरते. याउलट नारळाच्या झाडावर बाराही महिने एकामागोमाग एक असा फळधारणेचा कोंब बाहेर पडत असतो. त्यामुळे वर्षाच्या कुठल्याही महिन्यात नारळ उपलब्ध होऊ शकतो. तो इतर कुठल्याही फळासारखा घाईघाईने नाशवंत ठरणारा नसतो. आणि त्याचा हाच महत्वाचा गुण त्याला ‘श्रीफल’ ठरविण्यास कारणीभूत ठरला असावा, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

आपल्या पूर्वजांनी अत्यंत सुज्ञपणे ही श्रीफलाची निवड केली असावी.चकचकीत तांब्याच्या कलशावर आंब्याच्या ताज्या पाच किंवा सात पानांचा टहाळ्यावर ठेवलेला नारळ किती देखणा, आकर्षक आणि पवित्र दिसतो. नारळाची साले सोलताना त्याचे कठीण कवच ठेवून पूर्ण सोलला जात नाही. त्याच्या वरच्या भागात निमुळती होत जाणारी शेंडी ठेवली जाते. यामागे त्याच्या वरच्या भागात असणाऱ्या डोळ्यांचे संरक्षण ही त्याची शेंडी करीत असते, हे एक कारण आहे. नारळाचे कवच म्हणजे करवंटी कितीही कठीण असली तरी ज्याला नारळाचे डोळे म्हणतात, त्या तीन गोलसर ठिकाणी आत पोहचत असतो. ते फुटूनही नारळ तसाच राहिला तर तो नासण्याची शक्यता असते. ही संरक्षक शेंडी नारळाच्या सौंदर्यातही भर घालते. बिनशेंडीचा नारळ कलशावर ठेवला आहे, अशी कल्पनाही कुणाला सहन होणार नाही. किंवा नारळाऐवजी इतर कुठलेही फळ कलशावर ठेवल्याची साधी कल्पना करून पाहा. छे, नारळाचे ते सात्विक स्थान दुसरे दुसरे कुठलेही फळ घेऊ शकणार नाही. पुजेनिम्मित अनेक विधीसाठी म्हणजे पूजन, ओटी भरणे, मंगल कलश, दक्षिणा आणि इतर देण्याघेण्याच्या विधीसाठी नारळाची म्हणजे श्रीफळाची साथ लागते. याऐवजी कुठलेही फळ वापरल्यास ते त्वरेने खाऊन संपविण्याची जबाबदारी येणार. तसे ते संपविले नाही तर जास्त पिकून, काळे पडून एकदोन दिवसातच खराब होण्याची वा नासण्याची भीती राहील. पण नारळाचे तसे नाही. त्यामुळे यजमान असो की ब्राम्हण, त्यांना घरी आलेले नारळ सावकाशीने वापरता येतात. शिवाय आतील पाणी आणि ओले खोबरे यामुळे सुका नारळ इतर वाळवणातील सांड्ग्याच्या स्वरूपातला नसून कायम ताजे फळ असतो. त्यामुळे नारळाचे उत्पादन होत नसलेल्या प्रांतातही नारळाचे हे पवित्र स्थान अबाधीत असते.

नारळाच्या झाडास कल्पतरू असेही म्हणतात. कल्पतरूखाली बसून व्यक्त केलेली इच्छा, वांच्छा पूर्ण होते, अशी पौराणिक कल्पना आहे. नारळाचे झाड तशा रीतीने इच्छा पूर्ण करीत नसले तरी त्याचा एवढा विविध अंगांनी मानवाला उपयोग होतो की, त्याचे ‘कल्पतरू’ हे संबोधन सार्थ ठरावे. नारळातून खोबरे व पाणी मिळते, हे त्याचे मुख्य उत्पादन. कोवळ्या नारळातील म्हणजे शहाळ्यातील पाणी तहान-भूक भागविणारे तर असतेच, पण आरोग्यवर्धकही असते. शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी, घट्ट अन न पचणाऱ्या रुग्णासाठी हलके अन्न म्हणून तसेच त्वचा रक्षणासाठी उपयोगात येते. नारळातील खोबऱ्याचा उपयोग अनेक गोष्टींसाठी होतो. स्वयंपाकासाठी, मिठाई बनविण्यासाठी तर त्याचा उपयोग होतोच पण त्यात असणाऱ्या तेलाच्या अंशामुळे ते पौष्टिक अन्नही ठरते. आपली कांती मऊ व सुंदर ठेवण्यासाठी ओल्या खखोबऱ्याचा रस-दुध वापरला जातो. सुके खोबरे स्वयंपाकासाठी तसेच खोबरेल तेल बनविण्यासाठी वापरतात. शिवाय अनेक खाद्यपदार्थात चवीसाठी म्हणून त्याचा उपयोग होतो. त्याची करवंटी मोठाले चमचे-डाव बनविण्यासाठी उपयोगात आणतात. शेतकरी त्यांचा जळणासाठी उपयोग करतात. करवंटीपासून निघणारे तेल त्वचा रोगावर औषधी ठरते. नारळाच्या सालांपासून काथ्याचे तंतू निघतात. त्यांच्यापासून दोरखंड, गालिचे, गाद्या, तक्के, पायपुसणी आणि शोभेच्या वस्तू अशा अनेक गोष्टी बनविता येतात. नारळाची पाने म्हणजे झावळ्यांपासून घरांच्या छपरासाठी झाणे विणतात. तर या पानातून मिळणाऱ्या या काड्यांपासून झाडू म्हणजे खराटे बनतात. नारळाचे खोड झोपडीसाठी किंवा तात्पुरत्या कामासाठी खांबासारखे वापरले जाते. तर मळ्यामध्ये पाणी वाहून नेणाऱ्या पाटासारखे उपयोगात आणता येते. नारळाच्या झाडाचा कुठलाही उरलेला भाग उत्तम जळण म्हणून उपयोगात येतो. तात्पर्य काय तर नारळाच्या झाडाचा कोणताही अंश वाया जात नाही. एवढेच नव्हे तर भारताच्या किनारपट्टीवरील राज्यांमध्ये नारळ व त्याच्यापासून बनणाऱ्या वरील वस्तूंमुळे हजारोंना व्यवसाय व रोजगार मिळाला आहे. म्हणूनच त्याला कल्पतरू म्हणणे सार्थ ठरते, नाही का?

महाराष्ट्र देशावर पोळा, तसा कोकणात नारळी पोर्णिमा हा सण जोरात साजरा होतो. १९६०च्या दशकापर्यंत गुजरात-उत्तरेकडील रक्षाबंधनाचे लोण महाराष्ट्रातील घराघरातून फारसे रुजलेले दिसत नव्हते. त्यानंतर काही हिंदी चित्रपटातून बहीण-भावांच्या प्रेमाच्या दर्दभरी कथा असलेले चित्रपट गाजले. त्यातील काही गाणी गावागावातून, घराघरातून वाजू लागली. मग मात्र हा सण महाराष्ट्रीय घराघरातूनही प्रसार पावलेला दिसू लागला. तोपर्यंत ‘नारली पुनव’ हा कोळ्यांचा सण म्हणूनच सर्वांना माहिती होता. पावसापूर्वी कोळी आपल्या नावा किनाऱ्यावर कोरड्या ठिकाणी चढवून ठेवतात. त्यांची डागडुजी, तेलपाणी किंवा रंगरंगोटी इ. कामे यादिवसात केली जातात. नारळी पौर्णिमेला नावा पुन्हा नव्याजोमाने समुद्रात जाण्यासाठी पाण्यात समारंभपूर्वक उतरवितात. हा दिवस म्हणजे कोळ्यांचा नववर्षदिनच असतो. यावेळी सागराची पूजा करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने नावांची सजावट, नाच-गाणी यांची धमाल उडते. समुद्राची पूजा करून त्याला नारळ वाहणे हा यातील एक महत्वाचा विधी असतो. नाहीतरी बिचाऱ्या कोळ्याकडे नारळाशिवाय सागराला अर्पण करण्यासाठी असतेच काय? या दिवशी पांढरपेशा घरांमध्ये मात्र साजूक तुपाचा नारळीभात आवर्जून, हमखास केला जातो. या सणाची ही महती देशावर दिसून येत नाही. तिथे समुद्र नाही की नारळ सहजासहजी उपलब्ध नाही. त्यांचा शेतीशी संबंधीत पोळा सण कोकणात दिसून येत नाही. हा स्थळकाळाचा महिमाच म्हणायचा.

काही अभ्यासकांच्या मते इतिहासकाळात गावकुसाबाहेरील उघड्यावरच्या ग्रामदेवतांचे महात्म्य कमी होऊन देवदेवतांची आकर्षक, सुडौल आणि भव्य मंदिरे बांधण्याची प्रथा सुरु झाल्यावर देवतेपुढे पशु-पक्षी यांचे बळी देण्याची प्रथाही हळू-हळू कमी होत गेली. परंतु देवतेला बळी देण्याचे समाजमनावरील संस्कार मात्र पुसले गेले नाहीत. म्हणून बळी म्हणून प्रतीकात्मरीत्या नारळ वाढविण्याची प्रथा सुरु झाली असावी. पशु किंवा पक्ष्याच्या शिराकडील भाग-मुंडके देवतेला वाहिले जात असे. त्याऐवजी डोळे व शेंडी असलेला नारळाच्या देठाकडील भाग देवापुढे ठेवला जातो. मात्र कालांतराने नारळ हे ‘बलीचे प्रतिक’ या संकल्पनेचा लोकांना विसर पडला. ती जागा आता श्रद्धेने घेतली. आपल्या भावभक्तीचे प्रतिक म्हणून देवतेला एक किंवा अनेक नारळ वाहण्याची म्हणजे अर्पण करण्याची प्रथा पुढे चालत राहिली. आजच्या भाविकांना नारळ हे बळीचे प्रतिक आहे असे सांगू लागलो तर, त्यावर कुणीही विश्वासही ठेवणार नाही. देव भावाचा भुकेला असतो असे म्हणतात. म्हणून त्याला भक्तिभावाने नारळ अर्पण केला जातो. अनेक शुभकार्यात नारळाचा उपयोग श्रीफळ या नात्यानेच केला जातो. यामुळे नारळाचा आजच्या काळातील असा वापर हा बळी-प्रथेचा पुरस्कार करणारा आहे. अथवा ती प्रथा चालू ठेवण्याचा अट्टाहास केला जातो, असे कुणीही मानून घेण्याचे काहीच कारण नाही. कारण सर्वांच्या मनात नारळाचे स्थान केवळ पवित्र ‘श्रीफळ’ असेच निर्विवादपणे असते. इति नारळ पुराण सफळ संपूर्ण..!