रिती रिवाज

या अनिष्ठ प्रथा कधी थांबणार

हे युग विज्ञानाचे आहे. यातील हर घडी हर पल विज्ञानाने व्यापले आहे. अंतराळातील अनेक ग्रहांचे वेध विज्ञानाच्या प्रगतीमुळेच घेता आले आहेत. चंद्रावर मानवाने पाऊल ठेवण्यालाही बरीच वर्षे होऊन गेलीत. मात्र मानवी समाजावर अजूनही अंधश्रद्धांचे पाश या ना त्या कारणाने अधिकाधिक आवळताना दिसतात. धर्माच्या आडोशाखाली काही समाजविघातक मंडळी अंधश्रधांची विषवल्ली कशी फोफावेल याच्याच प्रयत्नात दिसते. देव-देवतांना प्रयत्न करण्यासाठी पशु-पक्ष्यांचे बळी देण्याची प्रथा अशाच अंधश्रद्धांतून निर्माण झाली. आणि आजच्या विज्ञानयुगात ती कमी होण्याऐवजी एखाद्या साथीच्या रोगासारखी वाढतच चाललेली पाहून मन अतिशय विषण्ण झाल्यावाचून राहात नाही. शिक्षणाचा प्रसार व विज्ञानाची प्रगती या अमानवी प्रवृत्तीपुढे हतबल ठरलेल्या दिसतात.

या बलिदानाची मुळे मानवाच्या प्राचीन काळातच रुजलेली दिसतात. हजारो वर्षापूर्वी गुहेत राहणारा आदिमानव प्राण्यांच्या शिकारीस निघण्यापूर्वी गुहेतील भिंतीवर त्या प्राण्याचे चित्र काढून काही पूजा प्रार्थना करीत असावा. तसे काही चित्रांचे पुरावे सापडले आहेत. किंवा तो मानव-समूह शिकारीनंतर आपला आनंदोस्तव व्यक्त करीत असावा. अशा प्रसंगातूनच बळी देण्याची प्रथा उदयास आली असावी. श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होण्यात फारसा वेळ लागत नाही, हे आपण आजही पाहतोच. पुढे आर्य भारतात आले. त्यामुळे ‘यज्ञ-संस्थे’चा प्रसार भारतात झाला. यज्ञपूर्तीनंतर बलिदानाची आहुती दिली जात असे. यासाठी धष्टपुष्ट  बैल, रेडा किंवा सुलक्षणी  घोडा निवडला जात असे. ‘बळी’ चे मांस प्रसाद म्हणून भक्षण केले जात असे. या यज्ञांना पुढे राजाश्रय मिळत गेला. आपल्या स्वार्थासाठी, संतती-संपत्तीच्या प्राप्तीसाठी हळू हळू मानवी बलिदानापर्यंत मजल गेली. यात शाक्त-पंथीयांचा पुढाकार होता. त्यांच्या अघोरी, अनाचारी प्रवृत्तींनी समाजावर भीतीचा धाक बसविला. या शाक्तांमध्ये अघोरी वृत्ती, अनैतिक व बेबंद जीवन, मादक वस्तूंचे सेवन, घाणेरडे, किळसवाणे जगणे, कुठेतरी स्मशानासारख्या भयावह ठिकाणी राहणे आणि प्राणी किंवा मानवी बलिदानातून यशाचे मिळविण्याचे मार्ग सांगणे अशा अमानवी शाक्तांची पिलाजवळ कुठेतरी मानवी बळींचे अघोरी प्रयोग करताना दिसते हे आपले दुर्दैवच म्हणावे नाही का?

प्राचीन काळी राजसूय यज्ञ केला जाई. या यज्ञासाठी एक पंचलक्षणी अश्व (घोडा) विधीपूर्वक सोडला जात असे. जो जिथे जिथे भ्रमण करी, तो तो भुमीप्रदेश त्या सम्राटाच्या अधिपत्याखाली येत असे. तेथील राजांनी हे मांडलीकत्व स्वेच्छेने शरण येऊन अथवा त्या सम्राटाच्या सेनेशी दोन हात करून पराभवानंतर नाईलाजाने स्वीकारावे लागे. त्या अश्वाच्या यशस्वी भ्रमणानंतर मोठा यज्ञ केला जाई. विशेष म्हणजे त्या यज्ञाच्या अखेरीस बिचाऱ्या त्याच अश्वाचा विधीपूर्वक- समारंभपूर्वक बळी दिला जात असे. मध्ययुगात बलिदान व यज्ञ-संस्कार यांचे प्रस्थ फारच वाढले होते. त्याकाळी गोमांस –भक्षणदेखील अभक्ष्य मानले जात नव्हते.

राजे, सरदार किंवा श्रीमंत यांची यज्ञात बळी देण्याची प्रथा हळू हळू सामान्य जनातही झिरपत गेली. कोंबडं किंवा बकऱ्याचे बळी दिल्याने देवता प्रसन्न होऊन आपल्या इडापिडा टळतात, मनातले ईप्सित साध्य होते, ही संकल्पना जनसामान्यात रुजविण्याचे काम स्वार्थी भगत, भोंदूबाबा, बुवा किंवा तस्तम पुजाऱ्यांनी अगदी नियोजनपूर्वक केले. या कल्पनांचा पगडा भाव-भोळ्या समाजमनावर एवढा बसला की, त्या त्या समाजात अशा प्रथा पारंपारिक रीतीरिवाज बनून गेल्या. त्या प्रथा मोडल्या तर देवतेचा कोप होऊन काही आरिष्ट ओढवेल, कुटुंबात किंवा समाजात काही संकटे कोसळतील अशी हाकाटी या भोंदू-भगतांनी करून समाजाला सदैव भीतीच्या दडपणाखाली ठेवले. ही भीती आजच्या विज्ञानयुगातही दूर झालेली दिसत नाही. आजही गावागावातून ग्रामदेवतांच्या व त्यांच्या पूजा-बलिदानाच्या प्रथा यांचे प्राबल्य समाजमनावर गाढ ठसलेले दिसून येते.

आपण सारे एक महत्वाची गोष्ट विसरतो, ती ही की कुठलीही देवता आपल्या तोंडाने काही एक मागत नाही. किंवा काहीही खात नाही, काही परिधान करीत नाही. प्रत्यक्षात जे आपल्याकडे आहे त्याचा इतरांना, गरजूंना, उपेक्षितांना लाभ व्हावा या हेतूंनी देवकार्य म्हणून दानाची संकल्पना प्राचीनकाळी केव्हातरी पुढे आली. तिला पुण्यकर्म मानले गेले. हर्षवर्धन, कर्ण यासारखे निष्काम दान करणारे महापुरुष या भूमीवर कायमचा आदर्श ठेवून गेले आहेत. पण आपल्या भक्तीचे समाजात प्रदर्शन करण्यासाठी, आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी किंवा आपल्या वैभवात भर पडेल या स्वार्थापोटी विशिष्ट देवतांना किंवा देवस्थानांना पैसा, सोने-चांदी किंवा अशाच काही वैभवशाली वस्तूंच्या स्वरूपात भरभरून दान देण्याची वृत्ती श्रीमंत, सुखवस्तू, सुशिक्षित आणि भल्याबुऱ्या मार्गाने व्यवसाय करणारे व्यावसायीक यांच्यामध्ये दिवसेंदिवस वाढतच चाललेली दिसते. त्याच वृत्तीची दुसरी बाजू आहे, प्राणी-पशू किंवा पक्षी हत्येची. ती तर पैसाअडका वाह्ण्यापेक्षाही अतिशय क्रूर, निर्दयी आणि किळसवाणी प्रवृत्ती आहे.

बहुतेक ठिकाणी कोंबडे किंवा बकऱ्याचे शिर एका घावात धडावेगळे (हलाल) करून ते त्या देवतेपुढे वाहिले जाते. त्या प्राण्याच्या अथवा पक्ष्याच्या रक्ताचे शिंपणही त्या देवस्थानावर केले जाते. उरलेल्या धडाची प्रसाद म्हणून मस्त सागुती शिजवून यथेच्छ भोजन केले जाते. प्रसाद म्हणून या मांसाहाराबरोबर सोमरसाचे (मद्याचे) घुटकेही मोठ्या उत्साहाने भाविकमंडळी घेते. बरे, तो देवतेपुढे अर्पण केलेला शिरोभाग ती देवता खाते का? नक्कीच नाही. कारण ती बिचारी मूर्ती अचल असते. मग तिथला पुजारी अथवा भगतगण त्याचा हक्कदार बनतो. त्यांच्या घरीही मनसोक्त मेजवानी रंगते. महाराष्ट्रातील बहुतेक प्रसिद्ध स्थळी शेकड्यांनी- हजारोंनी अशी बलिदाने होतात. अशावेळी जास्त झालेली शिरे हे पुजारी स्वस्तात विकून टाकतात. त्यासाठी अर्थातच अनेक हौसे-गवशे टपून बसलेलेच असतात. त्यामुळे त्यांच्या घरीही मांसाहाराची चंगळ उडते. यात त्या बिचाऱ्या देवतेला काय मिळते? तर सारा परिसर, त्या मंदिराचे पवित्र प्रांगण रक्तामांसाच्या चिखलाने घाणेरडे, कुबट घाण आणि भणभणाऱ्या या मांशामुळे अगदी किळसवाणे बनून जाते.रोगराईला तर हे निमंत्रणच ठरावे असा हा गलिच्छ व्यवहार असतो.

या साऱ्यातून काय निष्पन्न होते? त्या देवतेच्या जत्रेच्या निमित्ताने दिन-तीन दिवस भाविक, पुजारी-भगत, आणि स्वस्तात मांसाहार ओरपायला मिळणारे लाभार्थी हे त्या देवतेच्या नावाने आपलीच चंगळ करून घेतात. वर त्या देवतेलाच साकडे घालायचे की, आमच्या इडा-पिडा दूर कर, आमच्या मुलाबाळांना सुख-आरोग्य लाभू दे, आमच्या धंदा-व्यवसायात यश लाभून सुख-संपत्ती, धनदौलत मिळू दे. आहे की नाही गंमत? मजा यांनी करायची, आणि त्या देवांनी यांची काळजी वाहायची. वर स्वच्छतेची काळजी स्थानिक प्रशासनाने करायची. यामुळे काही अपघात, रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता शासकीय प्रशासनाच्या यंत्रणेने घ्यावयाची. अशा अघोरी, अनाचारी भक्तीला आळा घालावा असे मात्र फारच थोड्यांना वाटत असते. पण तेही हतबलपणे या भक्तीला लोंढ्याकडे पाहात गप्प बसतात.

महाराष्ट्रातील अनेक संतांनी या अनिष्ट प्रथांविरुद्ध कडक शब्दात विरोध व्यक्त केला आहे. संत तुकाराम, समर्थ रामदास यांनी आपल्या अभंग आणि इतर साहित्यातून भोंदू भगवंतावर कठोर प्रहार केले आहेत. आधुनिक संत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज यांनी अंधश्रद्धा आणि पशुबळी यांच्या विरोधात सारा महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता.अक्षरशत्रू गाडगेबाबांनी गावोगावी स्वतः रस्ते झाडून लोकांना स्वच्छतेचे धडे दिले. संत बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून स्थानिक समाजसेवकांपर्यंत अनेकांनी या अंधश्रद्धांच्या विरोधात आपले विचार मांडून समाजप्रबोधनाचे व परिवर्तनाचे प्रयत्न केले. स्वातंत्र्यवीर सावरकर प्रखर हिंदुत्ववादी असले तरी ते अत्यंत विज्ञाननिष्ठ होते. त्यांनीही या अंधश्रध्दांविरुद्ध अतिशय कठोर शब्दात कोरडे ओढले आहेत. समाजमनावर मात्र त्याचा दूरगामी परिणाम झालेला दिसून येत नाही.

गेली अनेक वर्षे अंधश्रद्धा निर्मुलन समिती व तिचे सामाजिक कार्यकर्ते या अनिष्ट प्रथा थांबविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. साधना साप्ताहिकाचे संपादक श्री. नरेंद्र दाभोलकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. मोर्चे, मेळावे, निषेध कोर्टात दावे अशा अनेक सनदशीर मार्गांनी ही चळवळ महाराष्ट्रभर चालूच आहे. याशिवाय प्राणी-मित्र संस्था, पोलीस, शासन आणि काही स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते या प्रथा थांबविण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यांच्या प्रयत्नांना यश आल्यासारखे काही काळापुरते भासते. पण त्यांची पाठ फिरताच दुर्दैवाने मूळ वृत्ती अधिकच उफाळून आलेल्या दिसतात. जोवर या प्रश्नांकडे समाज जागृत, वैज्ञानिक दृष्टीने पहावयास शिकत नाही, किंवा तशी मनोधारणा बदलत नाही, तोवर या प्रयत्नांचे यश असेच फसवे राहील. याचे दुसरे कारण म्हणजे या प्रथांचे लाभार्थी भगतगण, महंत, बुवा वगैरे आपल्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक अफवा पसरवितात. भीतीचे वातावरण निर्माण करतात. देवदेवतांच्या कोपाच्या खोट्यानाट्या कहाण्या समाजातून मुद्दामच पसरविल्या जातात. या प्रचाराला भोळीभाबडी भाविक जनता सहज बळी पडते. मात्र या फसणाऱ्यांमध्ये अशिक्षितांइतकाच सुशिक्षातांचाही भरणा असतो, हे आपल्या देशाचे दुर्भाग्यच म्हणावयास हवे.

आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे ज्ञानप्राप्तीच्या असंख्य वाटा मोकळ्या झाल्या आहेत. अनेक बुवांचे चमत्कारांचे पितळ विज्ञानाने उघडे पाडले आहे. हे चमत्कार म्हणजे निव्वळ धूळफेक असते हे विज्ञानवाद्यांनी अनेकदा सिद्ध करून दाखविले आहे. आजच्या इंटरनेटच्या युगात नव्या पिढीला कोणतीही माहिती, ज्ञान मिळविणे सहज शक्य झाले आहे. अशा काळात समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून नव्या पिढीवर योग्य संस्कार व्हावेत म्हणून आपण काही प्रयत्न करणार की नाही? की, या अंधश्रद्धा आणि पशुबळीच्या प्रथांना खतपाणी घालून चुकीचे आदर्श आपण त्यांच्यापुढे ठेवणार आहोत?

याचा समाजातील सर्वच घटकांनी शांतपणे विचार करण्याची वेळ आली आहे. ही जबाबदारी केवळ पालकांची नसून शिक्षक, सामाजिक नेते, राज्यकर्ते, प्रशासन आणि प्रसिद्धी माध्यमे या सर्वांचीच आहे. समाजाने अशा अनिष्ट प्रथांना आळा तर घालायलाच हवा.  पण त्याचबरोबर अशा अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्यांनाही योग्य तो धडा शिकवायला हवा.  यासाठी प्रत्येकाने आपली स्वतःची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. या प्रथा चूक आहेत, समाजाच्या विकासाला घातक आहेत, हे स्वीकारण्याची मानसिकता या भाववेड्या समाजात निर्माण झाल्याखेरीज या अनिष्ट प्रथा थांबविता येणार नाहीत हेच खरे.