रिती रिवाज

वास्तू म्हणजे तथास्तू

घर आपले म्हणजे वास्तू. मग ती छोटी झोपडी असो की, मोठा आलिशान बंगला. घरातील वातावरण शांत, आनंदी, मंगलमय असावे असे कुणास वाटणार नाही?  नीटनेटके फर्निचर, उत्तमोत्तम वस्त्रे, पंचपक्वान्ने आणि वैभवशाली आभूषणे वापरल्यास घर आनंदी होईलच असे म्हणता येणार नाही. घरातील माणसांचा एकमेकांशी असलेला व्यवहार किंवा संवाद, त्या सर्वांचे इतरांशी म्हणजे  त्यांचे आप्त, शेजारी अथवा समाजाशी असलेला संपर्क आणि सुसंवाद यावरच त्या घराचे आनंदीपण टिकून असते. मानवी व्यवहारात एवढ्या तेवढ्यावरून वाद, असामंजस्य आणि दुराग्रह यांनी जागा घेतली की, दोन्ही बाजूच्या व्यक्ती मनातून दुखावल्या जातात. एकदा तुटलेले सूर पुन्हा जुळणे कठीण जाते. प्रत्येक शब्दाचा चुकीचा अर्थ लावला जातो. शब्दाला शब्दाने प्रत्युत्त्तर दिले जाते. आईबाबा आणि मुळात बिनसते. सुनेची कोणतीही गोष्ट दुराग्रहाने नाकारणाऱ्या सासूची कोणतीही कृती सुनेला स्वीकारार्ह वाटत नाही. ती कृती संशयास्पद दिसू लागते. त्यात काही अंतस्थ दुष्ट हेतू असेल असे सुनेला वाटत राहते.

आपण घरातच असे जीवन जगत असू तर त्याचे पडसाद आपल्या दैनंदिन व्यवहारावर उमटल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणूनच घरातील आचार-विचार, एकमेकांशी राखला जाणारा संवाद, संवेदनशीलता, भावना, प्रतिक्रिया अशा साऱ्याच गोष्टी ‘द्वेश, असूया, स्वार्थ, क्रोध, दुष्ट विचार’ यापासून दूर राहावयास हव्यात. ‘आहे त्याचा स्वीकार, क्षमाशीलता, आणि आनंदी हसतमुख संवाद’ या सौख्याचा पाया आहे. ‘हे असे वाग’ सांगून कोणीही वागत नाही. ते अंतरात रुजायला हवे. पण हे सर्वांना कळत असून वळत नाही अशी स्थिती असते. म्हणून आपल्या दृष्ट्या पूर्वजांनी हे सांगून ठेवले आहे की, ‘ आपल्या घराची वास्तुदेवता आपले बोलणे ऐकत असते. आपण जे जे बोलू त्याला ती वास्तू म्हणते तथास्तू. हे एकदा मनावर ठसले; घरातील प्रत्येकाच्या अंतरात रुजले की, आपोआप घरातील संवाद, आचरण, विचारांची देवाणघेवाण यात सामंजस्य, पावित्र्य,आनंदीपणा येणार हे निश्चित. घर आनंदी तर समाज आपोआपच आनंदी हे समीकरण आपोआपच सुटेल.

हाच अनुभव समाजात, आपल्या कार्यालयात, रोजच्या दैनंदिन व्यवहारात एवढेच तर राष्ट्राराष्ट्रातील संबंधातही आढळून येतो. मन एकदा विशाल भावनेने विचार करू लागले की, परस्परांच्या संबंधातील कटूता आपोआप विरघळून जाते. ‘खळांची व्यंकटी सांडो’ म्हणजे दुष्टांची दुष्ट भावनाच नष्ट होवो. आणि ‘भूतां परस्परे पडो| मैत्र जीवांचे’ असे जे ज्ञानदेव म्हणतात ते याच भावनेतून. मानवी कलहाला मूळ कारण म्हणजे माणसाचे अखंड असमाधानी मन. त्यावर संयमाचा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न संत महात्म्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेला दिसून येतो. सत्कार्याला सुरवात आपल्या घरातूनच व्हायला हवी अशा अर्थाची म्हण आहे. जो विचार घरात रुजला त्याचे संस्कार बाहेरील जगात, समाजात परावर्तीत होणारच. म्हणून वास्तू म्हणते तथास्तूमध्ये किती महान अर्थ भरला आहे हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. आता कोणाबद्दल वाईट बोलण्यापूर्वी किंवा तसा विचार करण्यापूर्वी आपण ध्यानात ठेवूया की, वास्तू म्हणेल तथास्तू आणि बघूया आपल्याच वर्तनात काही बदल होतोय का? घराची वास्तुदेवता प्रसन्न राखण्यासाठी आपली मनोदेवता प्रथमतः प्रसन्न ठेवायला हवी. तेच खरे आपल्या जीवनातील आनंद, समाधान, आणि शांततेचे गमक ठरेल.