आजही अनेक खेड्यातून दिसणारे हे दृश्य आहे. रात्रीचा तिमिर संपून दिशा उजळू लागतात. खेड्यातील स्त्रीयांची लगबग सुरु होते. पहाटे उठून अंगण झाडणे, सडा-सारवण करणे, त्यावर छानशी रांगोळी काढणे, अशा सवयी खेड्यातील स्त्रीयांच्या अंगवळणी पडलेल्या दिसतात. प्रभातकाली लक्ष्मी येते. तिला प्रसन्न वाटेल, तिथेच ती थांबते, म्हणून तिच्या स्वागतासाठी हे करावयाचे, असे सांगितले जाते. म्हणून रांगोळीमधूनही काही शुभ चिन्हे काढण्याची प्रथा प्रचलीत आहे.
या गोष्टींचा सरळसाधा अर्थ आहे. खेड्यातील रस्ते धुळीने भरलेले. रात्रभर वाऱ्याने आलेली धूळ व अंगणात पडलेला पालापाचोळा यामुळे अंगण, घराचा ओटा आणि घरासमोरील रस्ता हे सारे अस्वच्छ वाटणारच. यामुळे उठताक्षणी मन प्रसन्न करणारे वातावरण निर्माण करण्यासाठी झाडलोट ही करायलाच हवी रोजच्या रोज अशी झाडलोट केली नाही तर दारी कचऱ्याचे ढिगच साचतील. खेड्यातील स्त्रीयांना स्वच्छतेची आवड जन्मजातच असते. त्यासाठी शारीरिक कष्ट उचलणे त्यांना मुळीच कमीपणाचे वाटत नाही. अंगण झाडून झाल्यावर त्यावर सडासारवण केल्याने दिवसभर अंगणात धूळ उडत राहणार नाही, याची व्यवस्था व्हायची. पूर्वी प्रत्येक घरी गोधन असल्याने सडासारवणासाठी लागणारे शेण घरच्या घरी उपलब्ध असे. ज्यांच्या घरी ते नसे त्यांना कुणीही शेतकऱ्याकडून फुकटात मिळत असे.
सडा म्हणजे शेण पाण्याने पातळ करून ते अंगणात शिंपडणे. आणि सारवण म्हणजे शेणात पाणी घालून त्याचा जाडसर थर हाताने किंवा खराट्याने-झाडूने अंगणातील खळ्यावर म्हणजे कच्च्या मातीच्या जमिनीवर, घरातील मातीच्या जमिनीवर अथवा कुडाच्या भिंतीवर देणे. विशेष म्हणजे गायीच्या शेणात काही औषधी व जंतुनाशक गुण असतात हे विज्ञानाने सिद्ध केले आहे. त्याचाही फायदा आपोआप त्या घराला होतो. असे सडा घालून छान झालेले अंगण पाहून मानवी मनाचे समाधान कसे होणार? त्यावर रांगोळीच्या चार रेघा तरी मारायलाच हव्यात नाही का? स्त्रीच्या कला गुणांना व्यक्त व्हायला तेवढीच एक संधी लाभायची. असे मंगलमय वातावरण निर्माण करणाऱ्या रांगोळीला पावित्र्याचे व मांगल्याचे प्रतीक मानले गेले तर त्यात नवल ते काय? घरचे सारे वातावरण प्रसन्न झाले की घरातील व्यवहारही आनंदाने व उत्साहानेच होणार. त्यालाच लक्ष्मी प्रसन्न झाली म्हणायचे. सडा सारवण झाले की, तुळशीची पूजा करून मगच कामाला लागायचे.