रिती रिवाज

सुखासमाधानाची दिवाळी

आजकाल दीपावली भेटकार्डाची प्रथा थोडी रोडावत चालली आहे. मात्र या भेटकार्डात एक वाक्य सर्वत्र हमखास असायचे. ‘ही दीपावली तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखासमाधानाची जावो.’ तसे वर्षभरात अनेक सण येतात. सारेच आनंदाचे असतात. मग दिवाळीसाठीच असा शब्दप्रयोग वापरण्याची प्रथा का पडली असावी? आपले हिंदू सण निसर्गचक्रावर आधारलेले. त्या त्या काळातील नैसर्गिक, सामाजिक आणि भौगोलिक स्थितीचा विचार करून सणांची योजना केलेली दिसून येते. दिवाळी ही आश्विन महिन्याच्या अखेरीस येते. सारा समाज शेतीप्रधान संस्कृतीत वाढलेला. पावसाळ्यातील पिकांचा हंगाम संपून धान्य घरी येण्याचा हा काळ. त्याची सुरुवात नवरात्र, दसरा या सणांनी झालेली असतेच. धनधान्य घरी आल्याने सुखावलेला शेतकरी राजा हा वर्षातून एकदाच मिळणारा आनंद सर्वांनी मिळून एकत्र साजरा करणार हे ओघानेच आले. त्यानंतर वर्षभर पोटापाण्याच्या चिंता, विवंचना येणारच आहेत. पण आताघरात भरपूर धान्य आहे, हातात थोडेफार धनही खुळखुळत आहे, त्याचे सुखसमाधान व्यक्त करणारा हा सण!

हा सण दिव्यांचा, दिपोत्सवाचा. दीप म्हणजे प्रकाश. अंधाराचा, तिमिराचा लोप पावणारा. आनंदाचे, उत्कर्षाचे आणि समृद्धीचे स्वागत करायचे ते दीप लावून. आनंदाचा सण म्हणजे दुःखाचा लोप. तो दीप लावून व्यक्त करण्याची प्रथा सर्व धर्मात, सर्व देशादेशातून दिसून येते. मग तो ख्रिसमस असो, चिन्यांचा-जपान्यांचा आकाशदिवे लावून साजरा होणारा दीपोत्सव असो, भौगोलिक स्थितीनुसार रितीरिवाजात काही भिन्नता असेल पण दीपांचे स्थान सर्वत्र अढळपणे दिसल्याशिवाय राहत नाही. दिवाळीचा सण एक दिवसाचा नाही. तर वर्षभरात राहिलेल्या अनेक इच्छा पूर्ण करण्याचा. काही कृतज्ञता व्यक्त करण्याचा. अनेक गोष्टी एकत्र आणणारा हा सण आहे. या सणाची सुरुवात वसू-बारस म्हणजे गोवत्स द्वाद्शीने व्हायची. मग धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळीचा पाडवा, भाऊबीज अशा क्रमाने होत जाऊन तुळशी विवाहाने त्याची सांगता होणार. अशा रीतीने अनेक सणांची मालिका असलेला हा सण म्हणजे साऱ्या सणांची राणी जणू! भारतभर सर्व जाती-धर्माचे, गरीब-श्रीमंत, सर्व थरातील लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात ते उगाच नव्हे!

दिवाळी म्हणजे फराळाची लयलूट आणि फटाक्यांची धमाल! कामकरी-श्रमकरी मुळातच गोड पदार्थ कमी खाणारे. पण दिवाळीत त्यांच्याही घरी गोड पदार्थ त्यांच्या परीने आवडीने बनविले जातात. आर्थिकदृष्ट्या सक्षम व पांढरपेश्या घरांतून परंपरेने अनेक पदार्थ होत आलेत. त्यांच्या सहवासाने किंवा आपले राहणीमान सुधारल्याने हे पदार्थ, पक्वान्ने बनविण्याचा कृती इतरांनीही आत्मसात तर केल्याच पण ते पदार्थ घरोघरी आवडीने खाण्यात येऊ लागले. करंज्या, चकल्या, शंकरपाळे, चिवडा, कडबोळे, अनारसे, बेसनलाडू, रव्याचे लाडू, शेवगाठे आणि ..काय काय म्हणून नावे घ्यावी? आता तर हेच फराळांचे बाराही महिने बाजारात मिळू लागले आहेत. तरीही दिवाळीचा फराळ घरी बनविण्याची हौस यत्किंचितही कमी झालेली नाही. मात्र नोकरी व्यवसायात अडकलेल्या भगिनींना हेच पदार्थ घरगुती पद्धतीने बनवून देणाऱ्यांचा आधार घ्यावाच लागतो. तो एक चांगला गृहोद्योग म्हणून नावारूपास आला आहे. फटाके मात्र मजा आणि गंमत यांची मर्यादा सोडून प्रदुषणात भर घालणारे आणि कामठळ्या बसविणारे होत चाललेत मात्र दुर्दैवच!

तशी या दीपोत्सवाची नांदी दसऱ्यालाच होते. म्हणून दसरा-दिवाळी असा  एकत्रितपणे या सणांचा उल्लेख होतो. जणू दसऱ्यानंतर दिवाळीच्या सणाची तयारी करायला काही अवधी असावा म्हणून हे पंधरासतरा दिवसांचे मध्ये अंतर. आश्विन कृष्ण द्वादशीला वसू-बारसने या सणाची सुरुवात होते. ज्या गोधनाच्या बळावर घरात ही समृद्धी आलेली असते, त्या गाई-बैलांचे ऋण व्यक्त करण्यासाठी हा दिवस. गाई-वासरांची ओवाळणी करायची, त्यांना गोडधोड खाऊ घालायचे. गाई-बैलांच्या शिंगांना गेरूचा रंग देण्याचीही प्रथा आहे. गेरू म्हणजे विटकरी रंगाची माती. म्हणजे हा रंगही नैसर्गिक, पर्यावरणातील एक घटकच असतो. 

त्यानंतरचा दिवस धनत्रयोदशी. याच्या नावात धन शब्द असला तरी याचा तसा धनाशी सरळ संबंध नाही. या दिवशी जे दीपदान करतील, दीपोत्सव करतील त्यांना अपमृत्युचे दु:ख भोगावे लागणार नाही, अशा अर्थाची कथा यामागे आहे. दिवाळी म्हणजे दिव्यांच्या उत्सव. तो कुणी करायचा? हा केवळ साधनांचा उत्सव नसावा, तर ज्यांना तो साजरा करणे शक्य नाही; तशी ऐपत नाही त्यांच्यासाठी ही दीपदानाची व्यवस्था सर्वांनी मिळून हा सण साजरा करता यावा, ही त्यामागची उदात्त सदिच्छा आहे हे त्यांनाही साजरा करता यावी, आपण जाणून घ्यायला हवे. हे दीप-दान देवापुढे वाहून अथवा नदीत दिवे सोडून साजरे करावयाचे नसून ते अशांना करावे की, त्यायोगे या दीपोत्सवात सर्वांना आंनदाने सामील करून घरोघरी आनंदाचे दीप लावावेत अशी मंगल भावना यामध्ये सामावलेली आहे. मानवाच्या स्वार्थी व संकुचित वृत्तीवर मात करणारी दीपदानाची प्रगल्भ, सामाजिक कल्पना आपण मात्र दुर्दैवाने धार्मिक कर्मकांडात गुंडाळून ठेवली आहे.

त्यापुढचा दिवस नरक-चतुर्दशीचा. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि शेकडो स्त्रियांना (सोळा सहस्त्र नारी) त्याच्या बंदिवासातून मुक्त केले, अशी कथा आहे. त्या स्त्रियांचा कुणी स्वीकार करेनात तेव्हा त्यांचे पुनर्वसनही स्वतः श्रीकृष्णाने केले. मात्र त्यानंतरच्या दंतकथांमध्ये आम्ही सोळा सहस्त्र नारीचा नवरेपणा त्याचावर लादला. हे स्त्री-मुक्तीचे जगातील सर्वात प्राचीन, कदाचित पहिले उदाहरण असू शकेल.या प्रसंगातून काही बोध घेण्याऐवजी या दिवशी आम्ही अथांग-स्नानानंतर एक चिरोट-एक छोटे फळ पायाखाली फोडून श्रीकृष्णाच्या पराक्रमाची स्मृती जागवतो. श्रीकृष्णाचे शौर्य आणि स्त्री विषयक दृष्टीकोन अंगी बाणावयाचे मात्र पूर्ण विसरून जातो. सणांच्या उत्सवी स्वरुपांमुळे त्यामागच्या उदात्त विचारांचा विसर पडतो तो असा!

मग येते अश्विन अमावस्या, लक्ष्मीपूजनाचा दिवस. खरे तर हिंदू धर्मात अमावस्या अशुभ मानली जाते. पण या अमावस्येचा मान काही आगळाच. या दिवशी लक्ष्मीचे पूजन केले जाते. घरातील धनाचे ऋण व्यक्त करण्याची ही प्रथा, धनाने माणसांनी ‘उतू नये, याचे स्मरण देते. हे धन, ही लक्ष्मी फार चंचल असते, असे म्हणतात. कारण तिचा गर्व झाला की, आपली माणसे, नाती-गोती विसरतात. मोठेपणाची हाव, प्रतिष्ठा यासाठी आपल्या धनाचा अनाठायी वापर, वा उधळपट्टी करू लागतात. पण केव्हातरी घराचे वासे उलटे फिरून वाईट दिवस आले की, लक्ष्मी तिच्या चंचलपणामुळे गेली असा तिच्याच माथी दोषारोप ठेवतात. म्हणून हे लक्ष्मीपूजन. हे देवाचे देणे आहे, ते जपून ठेवा. त्याची काळजी घ्या. ते वाढवा. हाच संदेश या लक्ष्मीपुजनातून आपण घ्यावयाचा आहे.

त्यानंतरची कार्तिक शुध्द प्रतिपदा हा अनेकांच्या दृष्टीने महत्वाचा दिवस असतो. या दिवशी व्यापारी आपल्या हिशोबाच्या नवीन वह्यांचे पूजन करून त्यांची सुरुवात करतात. हिंदु व्यापाऱ्यांमध्ये हा नव-वर्षादिन म्हणजे ‘साल-मुबारक’ मोठ्या थाटाने साजरा केला जातो. त्यामुळे व्यापारी वर्गात या दिवसाचे महत्व फार मोठे मानले जाते. महाराष्ट्रात हा दिवस दिवाळीचा पाडवा म्हणून ओळखला जातो. या दिवशी पत्नीने आपल्या यजमानाला ओवाळण्याची प्रथा आहे. वर्षभर साऱ्या कष्टात, कामात, बिकट प्रसंगात किंवा दुखण्या-खुपण्यात हसत मुखाने साथ देणाऱ्या आणि आपल्या संसाराचा गाडा मानाने सावरणाऱ्या पत्नीची हौस पुरविण्याचा, तिच्या हक्काचा हा दिवस. वर्षभराच्या दगदगीत आपल्या पत्नीकडे जाणता-अजाणता दुर्लक्ष झाले, त्याची अंशतः का होईना भरपाई, परिपूर्ती करण्याची नगरदेवांना ही एक संधीच असते. आणि पत्नीलाही वर्षभरात संसाराच्या रगाड्यात आपल्यासाठी काही मागायला, आपल्या इच्छा व्यक्त करायला कुठे वेळ मिळालेला असतो? आता काही काळापुरतीच का होईना सुबत्ता आलेली असते. तेव्हा तीही आपल्या राहिलेल्या इच्छा, हौशी आणि पुरवून घेण्याची संधी साधून घेते.

यानंतरचा दुसरा दिवस यम-बीज म्हणजे भाऊबीजेचा. हा तर प्रत्येक स्त्रीच्या मनात घर करून राहिलेला दिवस. विवाहानंतर पहिल्या वर्षी श्रावणात हौसेने माहेरी यावयास मिळायचे. तेही सर्वांच्या नशिबी असायचेच असे नाही. मग नंतर माहेरच्या आठवणी काढीत वर्ष लोटायचे. भाऊबीजेला भाऊराया आठवणीने बहिणीला भेटायला येणार. आणि भाऊ..? घरात एवढा आनंदाचा उत्सव चालला असताना बहिणीला कसा बरे विसरेल? त्यालाही वर्षभरात कामाधानातून बहिणीकडे जायला वेळ काढणं जमत नाही. बहिणीकडे जायचे तर मनापानाने जायला हवे. रिकाम्या हाती कसे जाणार? सुगीचे दिवस हेच उत्तम दिवस. मग काही निमित्त तर हवे. म्हणून ही भाऊबीज. बहिण-भावाची भेट घालून देणारी; सुखदु:खाच्या गोष्टी बोलून मनाच्या वाटा मोकळ्या करणारी. सोबत बहिणीला आईच्या हातचा खाऊ घेऊन जाणारी ही भाऊबीज. याचवेळी बहिणीकडेही सुगीचेच दिवस. मग तीही आई-बाबांसाठी, भाऊ वहिनीसाठी, आपल्या लाडक्या भाचरंडांसाठी प्रेमाच्या भेटी पाठविणार. तेच खरे प्रेमाचे वाण. आजच्या काळात एकमेकांना भेटणे- फोन, मोबाईल आणि इंटरनेट अशी संपर्क साधने आल्याने अगदी परदेशवासियांसाठीही दुरापास्त राहिलेले नाही. तरीही भाऊबीजेचा ओढा आणि गोडी यत्किंचितही कमी झालेली नाही हेच भाऊबीजेचं खरे वैशिष्ट्य म्हणता येईल.

असा हा आनंदाचा पण थोडासा खर्च करायला लावणारा सण कुठेतरी थांबवायला हवा, नाहीतर माणसे उत्सवातच दंग राहुन आपले धन यातच उधळत राहतील. त्याचीही काळजी आपल्या पूर्वजांनी घेतली आहे. या सणाची सांगता कार्तिक शुद्ध पौर्णिमेला तुलसी-विवाहाने होते. या पौर्णिमेला त्रिपुरारी पोर्णिमा असेही म्हणतात. याच दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केल्याची पौराणिक कथा आहे. महाराष्ट्रात, विशेषतः कोकणात त्रिपुर म्हणजे दीपमाळा उजळून दीपोत्सव करतात.या दिवसाला देवदिवाळी असेही म्हणतात. या दिवशी काही ठिकाणी जत्राही भरते. तुळशी-विवाहात घरच्या यजमानाचे दारच्या तुळशीचा चक्क विवाह करतात. यामुळे त्याच्यावर तुळशीसारख्या बहुगुणी, महा-औषधी वनस्पतीचा सांभाळ करण्याची जणू काही जबाबदारी येऊन पडते. म्हणून तिचे स्थान मानाने तुलसी-वृंदावनात असते. आपण मात्र तिचे सारे औषधी गुण विसरून तिला केवळ देवघरात बसविली आहे. असा दीपावली हा सण गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता घरोघरी आनंदाचे दीप उजळणारा आणि सुखासमाधानाचे हसू फुलविणारा आनंदाचा सण आहे. याबद्दल कुणाचे दुमत असेल काय? नाही, नक्कीच नाही!