रिती रिवाज

लक्ष्मी जाईल

वरील विधानाचे उदाहरण घ्यायचे झाले तर संध्याकाळच्या काही व्यवहाराचे घेता येईल. सूर्यास्त झाला दिवेलागण झाली की घराचा मागचा म्हणजे परसदारी जाण्याचा दरवाजा बंद केला जाई. तसे न केल्यास घराची लक्ष्मी जाईल असे संगीतले जात असे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस विजेचा शोध लागेपर्यंत रात्री प्रकाशासाठी समई, पानाती, मशाली किंवा तत्सम काही साधने वापरली जात होती. एवढेच कशाला गेल्या वीस पंचवीस वर्षातील विजेचा प्रसार सोडल्यास खेडोपाडी अजूनही काळोखाचेच साम्राज्य होते. अशा कमी प्रकाशाच्यावेळी आर्थिक व्यवहार करताना काही नजर-चूका होण्याचा संभव अधिक; घरात झाडलोट केल्यास अंधारामुळे कचर्या बरोबर एखादी मोल्यवान वस्तू, दागिना बाहेर टाकला जाण्याची शक्यता; संध्याकाळनंतर परसदाराचा दरवाजा उघडा राहिल्याने साप-विंचवासारखे सरपटणारे धोकादायक प्राणी घरात प्रवेश करण्याची भीती, चोर चिलटांचा उपद्रव होण्याचा संभव. या सर्वांवर सावधता बाळगण्यासाठी ‘संध्याकाळी मागील दरवाजा बंद करणे’  हा एकमेव उतारा कुणीतरी सांगितलेला असावा. अंधारामुळे वरीलपैकी कोणतीही गोष्ट घडल्यास घरातील धनलक्ष्मी कमी होणारच. म्हणून लक्ष्मी-देवतेची भीती घालून या गोष्टींना आळा घातला गेला असावा. मात्र गंमत अशी की, शहरासारख्या ठिकाणी रात्री लख्ख प्रकाश असताना तिन्हीसांजेनंतर घरात झाडू नये, पैशाचे व्यवहार करू नये असे म्हणणारे किंवा या रूढीचे पालन करणारे घरोघरी आढळतात. त्या प्रथा आर्थिक धन संरक्षणाच्या विचारातून निर्माण झाल्या होत्या. आजच्या विज्ञान युगात त्या जशाच्या तशा पालन करण्याची गरज नाही. हे कुणाच्याही लक्षात येईल. प्रकाशाच्या सोयीसाठी पूर्वी बहुतेक व्यवहार दिवसा-उजेडी नैसर्गिक प्रकाशात करावे लागत होते. पण आता कल बदलला आहे. विजेच्या प्रकाश योजनेमुळे आता रात्री उशिरा पर्यंत आर्थिक व्यवहार विनासायास चालू असतात. इतर देशांशी ज्यांचे आर्थिक व्यवहार चालतात त्यांना तर त्या, त्या देशाच्या वेळेनुसार रात्री-बेरात्री असे व्यवहार करणे क्रमप्राप्त ठरते. यात सावधानता हाच महत्वाचा संदेश आपण घेणे इष्ट नाही का? ती बाळगली तर लक्ष्मी कशी बरं जाईल?