रिती रिवाज

आणि पितरं स्वर्गात गेली

नुकताच एका मृत वयोवृद्ध नातेवाईकाच्या त्रयोदश कार्याला म्हणजेच तेराव्याला जाण्याचा योग आला. ते कुटुंब तसे मध्यमवर्गीयच. दोन कर्ती मुलं, तीन मुली पण सारे विभक्त राहणारे. पण या कार्य विधीसाठी एकत्र आले होते. ‘गेलेले वृद्ध’ आपले आयुष्य सुखासमाधानात जगून चांगले दीर्घायुष्य भोगून गेलेले. त्यामुळे घरातील वातावरण दुःखाचा धक्का, शोकाकुल वगैरेचा उसना आव आणणारेही नव्हते. सारे काही शांततेने, हसत-खेळत चालले होते. आम्ही मुलं कमावती आहोत तेव्हा सारे काही व्यवस्थित होऊ द्या. अशा भावनेने तीन दिवस वेगवेगळाले विधी, आणि शेवटी म्हणजे तेराव्याला सर्वांना साग्रसंगीत भोजन नंतर वस्त्रभेटीचा कार्यक्रम असे अगदी यथासांगपणे श्राद्ध पार पडले. पिंडाला कावळा चटकन शिवला यातच साऱ्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले. आणि या श्राद्ध-कार्यासाठी उडालेल्या काही हजारांच्या ‘चटणीचे’ चीज झाल्यासारखेही वाटून सर्वांनी नि:श्वास सोडले. आता तो आत्मा मुक्त झाल्याचे समाधान साऱ्यांना झाल्याचे दिसले.

अशा प्रसंगी मनात असा विचार नेहमी येतो की, ‘खरोखरीच हे धार्मिक संस्कार’ आहेत का? मग समाजात असे कितीतरी लोक आहेत की, ते आपल्या गरीबीमुळे हे संस्कार करू शकत नाहीत. अथवा परंपरेने त्यांना हे माहितीही नाहीत. जे इतर धर्मीय आहेत ते असे श्राद्ध करीतही नाहीत. मग त्यांच्या कडील मृतांचे आत्मे मुक्तीची वाट पाहात तरंगत राहतात का? जे श्राद्ध करतात, ते कुठल्यातरी तीर्थक्षेत्री जाऊन काही अस्थीचे विधीपूर्वक विसर्जन करतात. पण बाकीच्या अस्थी आणि राखेचे काय? त्या स्मशानातील कचराकुंडीतच जातात ना? बिचारा गरीब समाज तेही करू शकत नाही. मग अशा कर्मकांडांना काही विशेष महत्व न देता आपणही आजच्या काळानुसार त्याचा वेगळा अर्थ लावू शकणार नाही का?

विज्ञानाच्या प्रगतीची झेप सूर्यमालिका ओलांडून पुढे पुढे जात आहे. सारे जग संगणकाच्या सहाय्याने विकासाच्या नवनव्या दिशा पादाक्रांत करते आहे. आणि आम्ही? विद्येचा एवढा प्रसार होऊनही, आपापल्या नावापुढे मोठमोठ्या पदव्या लावूनही अजून कर्मकांडाचीच महती गात आहोत. जेवढे आम्ही सुशिक्षित, सुखसंपन्न, तेवढेच अधिकाधिक जुन्या रुढींच्या आणि कर्मकांडांच्या जोखडात अडकलेले असे परस्परविरोधी दृश्य समाजात पाहावयास मिळते.

काही विस्मरणात गेलेल्या आणि अनेकांना माहिती नसलेल्या रूढी शोधून त्यानुसार व्यवहार करण्याचे तर फॅड सध्या फोफावत आहे, याला काय म्हणावे? बारसे-नामकरण विधी, व्रतबंध-मुंज, साखरपुडा, विवाह किंवा तस्तम घरगुती सोहळे आणि रूढींना असे काही सामाजिक आणि वैभव प्रदर्शनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे की, त्यात सामान्य मध्यमवर्गीय आपल्या आयुष्यभराच्या कमाईची आहुती देऊनही अनेकदा अपुरा पडतो. या साऱ्या कार्यात धार्मिक भावना अथवा संस्कार यांच्यापेक्षा आम्ही इतरांहून आम्ही कुठे कमी नाही, हे दाखविण्याची भावना अधिक प्रबळ असते. प्रस्तुत लेख हा श्राद्धांपुरता मर्यादित असल्याने इतर प्रसंगाबाबत अधिक विस्ताराने चर्चा करणे प्रशस्त वाटत नाही.

‘मृत्यू’ ही घटना दु:खदायक खरीच! मग तो अकाली झालेला किंवा वृद्धपणी,  आजारपणानंतर झालेला असो. अनेक वर्षांच्या सहवासाने त्या व्यक्तीबद्दल निर्माण झालेले प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा, स्नेह, आपुलकी, आदर किंवा रक्ताचे नाते असे अनेक पदर त्या व्यक्तीच्या कायमस्वरूपी विरहाला असतात. आणि ते मनुष्य स्वभावाला विचार घेता स्वाभाविकही असते. हजारो वर्षापूर्वीच्या मानवाला जन्म आणि मृत्यू या घटना दैवी चमत्कारासारख्या वाटल्या असतील. मुठभर बियाणापासून बहरणारे शेत किंवा एका बीपासून शेकडो फळे देणारा वृक्ष निर्माण झालेला पाहून तो नक्कीच थक्क झाला असेल. त्यातूनच दैवी उपासनेला सुरुवात खालेली असेल. कदाचित मृत्युसारख्या अतर्क्य घटनांमुळे त्यासंबंधीच्या कुतूहलाची जागा भीतीने घेतली असेल. त्यातूनच आत्मा, भूत-पिशाच्च, पुनर्जन्म व आत्म्यांची शांती यासारख्या अनेक कल्पनांनी जन्म घेतला असेल. त्या तत्कालीन मानवाच्या मनात कायमच्या घर करून राहिल्या असतील. अनेक प्राचीन अवशेषांतून अशा कल्पनांची प्रचिती येते. इजिप्तचे पिरॅमिड, इंकांची प्राचीन अश्मशिल्पे, अल्तामिरा आणि लास्कोची अतिप्राचीन गुहाचित्रे यामध्ये अशाच विचारांचे विविधांगी दर्शन घडते. आणि विशेष म्हणजे आजच्या आधुनिक युगातही हा भयगंड अजूनही मानवी मनावर तसाच राज्य करीत असल्याचे दिसून येते. धर्मा-धर्मानुसार याबाबतच्या कल्पना, चालीरीती वेगवेगळ्या असतीलही, पण त्यांचे त्या साऱ्यांचे भयसूत्र एकच आहे, असे दिसून येईल. धर्म-पुरोहित वर्गाने आपापल्या समाजात पक्के रुजवून ठेवले आहे. त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना ते हवेच आहे. ते याबाबाबत सत्याचे मार्गदर्शन कशाला करतील? आणि हे जर आपण एकदा का मान्य केले तर मृत्युपश्चात केल्या जाणाऱ्या प्रार्थना, श्राद्ध विधी, कर्मकांडं आणि प्रतीकात्मक दानं यांचा व्यवहार्य अर्थ आपणच लावावयास नको काय?

‘मरावे परी कीर्तीरूपे’ अशी म्हण आहे. साऱ्या जीवसृष्टीत मानवी जन्म हा श्रेष्ठ मानला जातो. कारण भावना, विचार, भाषा, विचारांचे प्रकटीकरण आणि स्वतःची प्रगतीकरण्याची क्षमता असलेला मानव हा एकमेव सजीव प्राणी आहे. या क्षमतांचा उपयोग करून आपला जन्म सार्थकी लावण्याची जबाबदारी प्रत्येक मानवाची स्वतःची असते, हे प्रत्येक स्त्री-पुरुषाने ध्यानात घ्यावयास हवे. म्हणून हा मानवी जन्म सार्थकी लागावा म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी चाली कृत्ये करावीत, ज्या योगे त्या व्यक्तीच्या पश्चातदेखील तिचे चांगले स्मरण राहील. म्हणजे प्रत्येकाने आपले आयुष्य सत्कारणी लावावे. विवेकाने आचरण करावे. वाईट हेतूने काही करू नये, असा बोध यातून घ्यावयाचा आहे. आपले आचरण शुद्ध, सात्विक आणि विधायक कार्यासाठी उत्सुक असणारे असावे. जुन्या कल्पनांतील ‘पुण्यकर्म’ म्हणजे याशिवाय आणखी वेगळे ते काय होते. कुणी त्याला जीवनाचे उच्च ध्येय असे म्हणेल. हाच संदेश देणारी एक प्रार्थना आहे..

उपासनेला दृढ चालवावे 

भू-देव संतांशी सदा लवावे

सत्कर्म योगे वय घालवावे 

सर्वां मुखी मंगल बोलवावे ||

आपल्या जीवनाचे मर्म या चार ओळीत कसे अचूकपणे सांगितले आहे. श्रेष्ठांचा आदर करून नम्रतेने आपले आयुष्य असे सत्कर्मात घालवा की, त्यायोगे सर्वांना आनंद होईल. सर्वत्र मंगल घडेल. हीच खरी जीवनाची उपासना अथवा साधना आहे. अनेकदा इच्छा असूनही काही प्रतिकूल परिस्थितीमुळे असे काही विशेष करणे अनेकांना शक्य होत नाही. तर कधी कधी साधने असतात, इच्छाही असते, परंतु निश्चित काय करावे याचे योग्य मार्गदर्शन होत नाही. पण आपण जे काही करू ते सत-भावनेने करण्याची मनोधारणा तर असावयास हवी. ते तर प्रत्येकाला सहज शक्य आहे की नाही?

आपल्याकडे एखाद्याच्या मृत्युनंतर तेरा दिवस सुतक पाळले जाते. त्रयोदश कर्म म्हणजे तेरावे, श्राद्ध मोठ्या थाटाने केले जाते. पण तसे करण्याऐवजी एखाद्याचे मरणोत्तर क्रियाकर्म आणि जेवणावेळी थाटामाटात घालणाऱ्या त्याच्या वंशजांनी त्या मृताच्या नावाने-स्मरणार्थ जर काही विधायक कार्याला हातभार लावला तर, वर उल्लेखलेल्या म्हणीचा सहज प्रत्यय येईल. या श्राद्ध विधीमध्ये मृताच्या आत्म्यास शांती लाभावी म्हणून अनेक प्रकारची दाने उदा. अन्नदान, गोदान, वस्त्रदान इ..इ. सांगितली आहेत. अनेकदा ही दाने प्रत्यक्षपणे न करता प्रतीकात्मक रुपात करून त्याऐवजी ब्रम्हवृंदाच्या दक्षिणेत अधिक रक्कम वाढविली जाते. अशा रीतीने प्रत्यक्ष दाने न करता पुरोहिताला जादा दक्षिणा देऊन पुण्यकर्माचे समाधान, तेही खोटे,मिळविण्याऐवजी वेगळ्यारीतीने प्रत्यक्ष दाने देऊन खरोखरीचे पुण्य मिळविता येईल. त्यामुळे मानसिक समाधान तर लाभेलच, पण त्याचबरोबर नावलौकिक, किर्तीही लाभेल.

असे अनेक होतकरू विद्यार्थी आहेत की, ज्यांना आपल्या शिक्षणासाठी पुरेशी साधने, पुस्तके, अन्न, कपडे यासारख्या प्राथमिक गरजेच्या वस्तू मिळत नाहीत. अनेक अडचणींचे डोंगर त्यांच्यापुढे उभे असतात. तरीही ते जिद्दीने आपली ज्ञानसाधना चालू ठेवण्यासाठी धडपडत असतात. याशिवाय शारीरिक किंवा मानसिक अपंगत्व असलेल्या मुलांच्या शाळा, वृद्धाश्रम, खेड्यापाड्यातील शाळा, छोटी छोटी वाचनालये अशी अनेक उपेक्षित आणि केवळ इतरांच्या मदतीवर चालणाऱ्या गरजवंत संस्था आपणास जागोजागी आढळतील. तिथे निरलस आणि सेवावृत्तीने काम करणारी माणसे त्यांना लागणारा निधी मिळवण्यासाठी वणवण फिरत असतात. अशा एखाद्या ठिकाणी जरी आपण आपला हात पुढे करून, फुल ना फुलाची पाकळीही भर घालू शकलो तरी आपण आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती मिळाल्याचे समाधान वा पुण्य मिळवू शकू. इथे कुणाच्या धार्मिक भावनांचा अवमान करावयाचा नाही. पण निरर्थक कर्मकांडे करण्यापेक्षा अशा गोष्टीची गरज समाजात अधिक आहे. आणि त्यामुळेही तेवढेच किंबहुना जास्तच मानसिक समाधान द्विगुणीत करणारा आनंद आपणास मिळू शकेल. शिवाय त्यातून पितरांचा नावलौकिक वाढविणारी ती घटना ठरेल, हेच आपणास सुचवायचे आहे. पु. ल. देशपांडे यांच्यासारख्या एका मराठी लेखकाने आपल्या आयुष्यभराच्या कमाईची ओंजळ भरूभरून सुमारे पंच्याहत्तर लाख रुपयांच्या देणग्या गरजवंत संस्थाना देऊन आपल्यापुढे फार मोठा आदर्श ठेवला आहे. त्यातून कित्येकांच्या हृदयात आशेची ज्योत जागविली असेल. कित्येकांच्या घरांतून त्यामुळे प्रकाश उजळला असेल. एवढेच नव्हे तर तर त्यातून स्फूर्ती घेऊन अनेकांना अशा सत्कर्माची जाणीव झाल्याने त्यांच्या ओंजळीतही मदतीसाठी आनंदाने उघडल्या असतील. पुरोहिताकडे प्रतीकात्मक दाने करून असे पुण्य किंवा समाधान लाभेल काय? पाप-पुण्यांच्या व्याख्या काळानुरूप आपणच बदलायला हव्यात. विज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक जुन्या संकल्पना मोडीत निघाल्या आहेत. त्याचप्रमाणे सत्कर्माची संकल्पनाही नव्या विचारांच्या आधारे बदलण्यासाठी आपली तयारी हवी, असे वाटल्यास वावगे वाटू नये.

सर्वांच्या धार्मिक भावना आणि पूर्वजांविषयीचा आदर याबद्दल कसलाही किंतु न मनात आणता असे सांगावेसे वाटते की, असे आदर्श आपल्या देशात प्राचीन काळापासून अनेक होऊन गेले आहेत. परंतु आम्हीच त्याकडे दुर्लक्ष केले आहे. राजा भगीरथाने आपल्या पितरांच्या उद्धारासाठी महत्प्रयासाने गंगा पृथ्वीतलावर आणल्याचे आपण मोठ्या अभिमानाने सांगतो. त्यामुळे कठीण परिश्रमांना भगीरथ प्रयत्न असे आपण म्हणू लागलो. विज्ञान म्हणते ही गंगा स्वर्गातून नव्हे तर हिमालयातून ब्रम्हदेशाच्या दिशेने वाहणारी मूळ गंगानदी, भगीरथाने तिचा प्रवाह बदलून हिंदुस्तानात वळवली. तसे असेल तर भगीरथ हा जगातील जलसंपत्तीविषयक पहिला अभियंता- इंजिनियर होता असेच म्हणावे लागेल. ही घटना त्याकाळी चमत्कारासारखी वाटल्यामुळेच गंगावतरणाची दंतकथा निर्माण झाली असावी. यामुळे त्याच्या पितरांना स्वर्गात मुक्ती लाभून त्यांचा उद्धार झाला की नाही, हे काळासच ठाऊक. पण या गंगावतरणामुळे साऱ्या गंगातीराची भूमी सुजलाम सुफलाम झाली, जिने हजारोवर्षांपासून तीराकाठ्च्या प्रजेच्या जीवनाचा जो उद्धार केला आहे, त्याचे मोल कशात करता येईल? असे सारेच कसे भगीरथ होऊ शकतील? पण सागरावर सेतु बांधणाऱ्या प्रभु रामचंद्रांच्या प्रयत्नात एका छोट्याश्या खारीनेही आपल्या परीने वाटा उचलला होताच ना? आपणही समाजाच्या गरजांच्या परिपूर्तीसाठी असाच खारीचा वाटा उचलून हातभार लावू शकलो तर आपली पितरं स्वर्गात गेली की नाहीत? त्यांना मुक्ती मिळाली की नाही? याची चिंता खात्रीने वाटणार नाही. जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा हेच सूत्र अधिक मोलाचे नाही का?