रिती रिवाज

कराग्रे वसते लक्ष्मी

पहाटेचं झुंजूमुंजू होतं. रवीराजाच्या आगमनाची चाहूल लागू लागते. निशेचा तिमिर संपून पूर्वदिशेच्या गालावर लालिमा चढू लागतो. निसर्गाचे गंधर्व आपल्या सप्तसुरात किलबिल गायन सुरु करतात. रात्रीची विश्रांती संपते. आणि नव्या दिवसाचे, उत्साहाचे आणि आनंदाचे मंगलमय किरण घेऊन प्रकाशदूत अवतरतात. अशा रम्य प्रभाती जाग आल्यावर आपल्या स्वतःच्या हाताच्या तळव्याकडे पहात एक प्रार्थना म्हणण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

कराग्रे वसते लक्ष्मी: करमध्ये सरस्वती |

करमूले गोविन्दम: प्रभाते कर दर्शनम | 

या प्रार्थनेचा अर्थ असा आहे की, कराग्रांवर म्हणजे हाताच्या टोकांवर बोटांवर लक्ष्मीचा वास आहे. तळव्याच्या मध्यभागी लक्ष्मी आहे तर तळव्याच्या मुळापाशी म्हणजे मनगटाजवळ गोविंद म्हणजे ईश्वराचा वास आहे. म्हणून उठताक्षणी त्यांना स्मरून आपल्या तळव्याचे दर्शन घ्यावयाचे. मग ते तळवे आपल्या मुखावरून फिरवायचे. म्हणजे उठताक्षणी ईश्वराचे दर्शन घेतल्याचे समाधान आणि त्याचा आशीर्वादही मिळावा. हा श्लोक एक रूढी किंवा परंपरा अनेकांच्या दैनंदिन व्यवहारात आजही स्थान मिळवून आहे.

‘आपला हात जगन्नाथ’ या म्हणीचा मतितार्थ सांगणारी ही प्रार्थना. श्रमनिष्ठेच्या गौरवाचे स्तोत्र. मानवाच्या मनातील पुरुषार्थाला आव्हान देणारी ही प्रार्थना. या प्रार्थनेच्या जसाच्या तसा अर्थ घेणारे त्यातील खऱ्या अर्थाचा विचारही करीत नाहीत. मात्र आपल्या पूर्वजांनी किंवा प्राचीन ऋषीमुनींनी या श्लोकाचे मोल जाणले होते. त्यांचा मानवाच्या स्वबळावर विश्वास होता. ते म्हणतात “हे मानवा, तुझ्या लक्ष्मीचे वैभव निर्माण करण्याची ताकद-बळ आहे. तुझे मनगट हीच तुझी खरी इच्छा शक्ती आहे. त्यांना बळकट ठेव.” त्यांनी साऱ्या या मानवजातीला असा आत्मविश्वासाचा संदेश दिला. कारण त्यांना श्रमाचे महत्व कळले होते. जीवनाचे सौंदर्य कशात आहे हे त्यांनी जाणले होते. म्हणून त्यांनी हाताला भगवंतांची सार्थ उपमा दिली. ‘असेल माझा हरी तर देईल मला खाटेवरी असा भोळा अंधविश्वास त्यांनी दिला नाही.’ हे आपण जाणून घेतले पाहिजे.

श्रमाची जोपासना करायची तर प्रथम त्याग करायला हवा तो दैववादाचा. दैववाद म्हणजे आळसाचे मूळ. दैवात असेल तसे होईल, हे निष्क्रीय आशाळभूतपणाचे लक्षण. 

ह्या दैववादाच्या बेड्यातून समाज बाहेर पडायला हवा. आत्मकर्तुत्वावर प्रत्येकाची श्रद्धा असली पाहिजे. आत्म-कर्तुत्वाचा स्फुल्लिंग प्रत्येक माणसाच्या हृदयात प्रज्वलित झाला तर विकासाची प्रभात निश्चितच सोनेरी किरणांनी उजळून निघेल. आत्मविश्वास हा श्रमाचा पाया आहे. द्विधा मनःस्थितीत कोणतेही कार्य तडीस-पूर्णतेस नेणे अशक्य आहे. कितीही कष्ट पडोत, हे काम मी पूर्ण करीन असा आत्मविश्वास आणिअपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यासाठीच ही प्रार्थना सांगते, ‘तुझे हात हे भगवंताचेच रूप आहेत. तूच तुझे भविष्य घडवायचे आहे.’ आत्मबलाबरोबरच श्रमाला जोड हवी ती चिकाटीची. प्रयत्नांना साधनेची, अभ्यासाची जोड दिल्याखेरीज उज्वल यश लाभणार नाही. उच्चपदीचे कलावंत, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कारागीर एवढेच काय उत्तम पिक काढणारा शेतकरीसुद्धा आपल्या श्रमाला चिकाटीचे, निष्ठेचे खतपाणी घालतो, म्हणूनच यशाची फळे चाखू शकतो. आज लावलेल्या रोपट्याला उद्या फळे लागणार आहेत, ही निष्ठा त्यामागे असावी लागते. आज दिसणारी धरणे, कारखाने, अवकाशयाने, अजिंठ्यासारखी लेणी, विज्ञानातील अनेक शोध, मायकल एंजलोसारख्या अनेक प्रतिभावान कलावंतांच्या कलाकृती ही सारी श्रममंदिरेच आहेत. सततचे श्रम, चिकाटी आणि अभ्यास हेच त्यांच्या यशाचे खरे गमक आहे.

श्रमाला आणखी जोड हवी ती नि:स्वार्थ भावनेची आपण आपले कर्तव्य करीत रहावे. फळाची अपेक्षा धरू नये. गीतेमध्ये यालाच ‘निष्काम कर्मयोग’ म्हटले आहे. काम करणारा जर म्हणू लागला की, हे माझ्या उपयोगाचे थोडेच आहे? मग मीच का ते करावे? असे झाले तर तो त्याचे कसब, कौशल्य मनापासून ओतू शकणार नाही. मग तो सैनिक असो की शिक्षक, वैमानिक असो किंवा छोट्या नावेचा नावाडी, तंत्रज्ञ असो की शास्त्रज्ञ. ज्याने त्याने आपले ध्येय, इतर काय करतात याचा विचार न करता निष्ठेने पूर्ण करणे हेच त्याचे कर्तव्य आहे. विज्ञानाने क्षणाक्षणाला उन्नतीच्या नवनव्या वाटा उघडल्या आहेत. नव्या, नव्या दिशा दृष्टीपथात येत आहेत. त्यासाठी श्रमनिष्ठा हेच प्रमुख ध्येय हवं. यासाठीच आपल्या मनगटावर आपला विश्वास असावयास हवा. म्हणूनच सकाळी उठताक्षणी प्रभाते कर दर्शन घेऊन आपला आत्मविश्वास जागवायचा आणि कामाला लागायचे, हाच संदेश यातून आपण घेऊया. म्हणा, हरी ओम आणि लागूया कामाला.