रिती रिवाज

गाईला चारा

मुंबईत ऐन गर्दीच्या ठिकाणी नाकानाक्यावर गाईला चारा अशी हाळी देत एक बाई बसलेली असते. सोबत एक गवताचा भारा, भिजवलेल्या धान्याचे किंवा जाणारे येणारे त्या गाईला कुणी नुसताच नमस्कार करतात. तर बरेचजण त्या बाईला पैसे देऊन तो लाडू किंवा मुठभर गवत त्या गाईला भरविण्याचे पुण्या पदरात पाडून घेतात. दिवसभरात काही एक काम न करता त्या बाईची भरपूर कमाई होते. कधी कधी त्या बाईची शाळेत जाणारी मुलेही ते लाडू वळण्याची मदत करताना दिसतात. या बाईची गणना भिकाऱ्यात करायची नाही. ती चांगली कुटुंबवत्सल असते. शिवाय ती भीक कुठे मागते? ती लोकांना पुण्यकर्माचे आवाहन करते. आणि लोक आपल्या पुण्यकर्मासाठी तिच्याकडून लाडू वा गवत घेतल्याचा मोबदला तिला देतात. असा हा पुण्याचा वापर राजरोसपणे वर्षानुवर्षे अखंडीतपणे चालू राहिलेला दिसतो. ही माणसे आपल्यासाठी पुण्या मिळवितांना एक आळशी पण धूर्त कुटुंब मस्तपैकी पोसत असते. अशा रीतीने भर रस्त्यावर धार्मिक भावनांचा हा अवैध व्यापार उघडपणे चालत असतो. कुणी कुरकुर केल्यास वर त्या बाईची उर्मट बोलणी ऐकावी लागतात. यासंबंधी तर आणखीनच मजेशीर माहिती नुकतीच वाचनात आली. ही गाय त्या बाईच्या मालकीची नसतेच. ती बाई कुठल्यातरी गोठ्यातून गाय भाड्याने आणते. ज्या मंदिरासमोर किंवा फुटपाथवर बसते तिथे त्या जागेचे भाडे म्हणून त्या मंदिराच्या पुजाऱ्याला अथवा फुटपाथ दादाला पैसे द्यावे लागतात. दुपारी कमी गर्दीच्या वेळेत त्या गाईचा मालक गाय गोठ्यात नेऊन तिचे दुध काढून घेतो. म्हणजे त्याचा दुहेरी फायदा. गाईचे भाडेही मिळते, वर दुधाचा धंदा. त्या बाईने विकत आणलेल्या गवताचे व भिजवलेल्या धान्याचे हे पुण्य मिळविणारे दामदुप्पट नव्हे तर चौपट मोल देऊन गाईचे परस्पर पोषण करतात ते वेगळेच. असा हा व्यवहार महिनाकाठी काही हजारात चालतो. हे सारे मुंबईसारख्या आधुनिक तेने नटलेल्या नगरीत बिनदिक्कत चाललेले असते. त्याचे लोण आता इतर शहरातही पसरलेले दिसू लागले आहे, त्यात नवल ते काय?

गाईच्या ठिकाणी हिंदुंचे सारे तेहतीस कोटी देव एकवटलेले असतात, असे आमची आजी सांगायची. तीच समजूत सामान्य हिंदू मनात घर करून बसलेली असते. आमच्या खेड्यात अनेकांच्या घरी देवांच्या फोटोसोबत गाईचे चित्र असलेली एक फ्रेम लटकत असे. त्या गाईच्या सर्वांगावर निरनिराळ्या देवांची चित्रे दाटीवाटीने काढलेली असत. त्यावर त्या देवांची नावेही लिहलेली असत. तशी चित्रे अजूनही देवांची चित्रे विकणाऱ्यांकडे पाहावयास मिळतात. सर्व देवदेवता गाईमध्ये एकवटल्याने ती सर्वात पवित्र व पूजनीय वस्तू मानली गेली आहे. यामुळे बालपणीचा एक प्रसंग आठवला. आमच्या घरची गाय आमच्या घरासमोरच्या अंगणातच व्याली. तिची प्रसूती बराचवेळ चालली होती. तिला होणाऱ्या वेदनांमुळे ती केविलवाणे हंबरत अंगणभर फिरत होती. आम्हा मुलांचा घोळका ते विस्मतेने पाहात जमला होता. त्याचवेळी आमच्याकडे आमची देवघेव करणारी आत्या आली होती. ती आमच्यावर ओरडली “मेल्यांनो, तिला प्रदक्षिणा तरी घाला. पृथ्वी-प्रदक्षिणेचे पुण्य तरी लागेल.” असे म्हणून तिने त्या गाईला फेऱ्या घातल्या. आम्ही सारे बालचमूही उत्साहाने प्रदक्षिणा घालू लागलो. हे पृथ्वी प्रदक्षिणेचे पुण्य म्हणजे काय? ते तेव्हाही कळले नाही. आजही त्याचा अर्थ लागत नाही.

गाय हा मानवी जीवनातला अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक प्राणी होय. अगदी प्राचीन काळापासून मानवाच्या अनेक गरजा या प्राण्याने पुरविल्या आहेत. आईच्या दुधाला पर्याय म्हणून गाईच्या दुधाला हजारो वर्षांपासून स्वीकारले गेले आहे. शेतीच्या अनेक कामात लागणारा, बैल हा आवश्यक प्राणी गाई-प्रजातीतील नर हा गाईपासूनच मिळतो. गाय हा केवळ पाळीव प्राणी नसून शेतकऱ्याच्या जिवाभावाचा, प्रेमळ व लाडका प्राणी असतो. गायीची तुलना, तिच्या वासरावरील प्रेमामुळे आईशी व्हायची. एखाद्या अत्यंत शांत, सहनशील, प्रेमळ स्वभावाच्या स्त्रीला गरीब गायीची उपमा दिली जाते, ती याचमुळे मारक्या गायी अपवादानेच आढळायच्या. आपला देश शेतीप्रधान असल्याने गाय हे शेतकऱ्याच्या जीवनातले आवश्यक व महत्वाचे अंग बनले. घरच्या बाईला गाय तर एखाद्या सखीसारखी भासायची. गायीचे मल-मुत्रही शेतीसाठी खतासारखे वापरता येते. सारवणासाठी शेणाची गरज तर घरोघरी असायची. अशा रीतीने गाय हा केवळ गरजेचा पाळीव प्राणी नव्हे, तर घरोघरीच्या जिव्हाळ्याचा प्राणी ठरला.

पूर्वी घरोघरी मातीच्या जमिनी होत्या. त्यावर नियमितपणे शेणाने सडासारवण होत असे. अंगणातही शेणाचा सडा टाकण्याची प्रथा अनेक खेड्यातून आजही दिसून येते. यासाठी गाई-बैलांचे शेण घरच्या गोठ्यातच मिळे अथवा कुणा शेतकऱ्याकडून मिळविले जात असे. त्याकाळी आमच्या कोळ्यांच्या गावात आमचे एकमेव पांढरपेशे कुटुंब होते. त्यामुळे या सारवणासाठी गावातील कुणीतरी कोळीण बाई हौसेने येत असे. आमच्या आईचा स्नेह आणि तिच्या हातचा चहा एवढेच तिला पुरसे असे. या सारवणावर हाताच्या बोटांनी लांबट गोलाकार मोठा पट्टा त्याच्या आत एकापाठोपाठ एक असे लहान होत जाणारे पट्टे काढले जात. त्याला त्या बाया ‘कणा’ असे म्हणत. असे गोल सारख्या आकाराचे पट्ट्याचे कणे घरभर काढण्याचे कौशल्य साऱ्यांनाच जमत नसे. सारवण चालू असताना तो कणा बिघडेल म्हणून सारवण वाळवल्याशिवाय त्यावरून चालत जाण्याला कुणाला परवानगी नसे. अगदीच काही घाईचे काम असल्यास त्यावरून जाणारा अंगठ्याच्या चवड्यावर चालत जाई. या चालवण्यावरून आम्ही मुले त्या बाईचे बोल हमखास खात असू. त्या सारवणावर रांगोळी काढणे शुभ मानतात. ती रांगोळी आई काढीत असे. त्यात गोपज्ञ म्हणजे गाईचे पाऊल हमखास असे. गोपज्ञ म्हणजे लक्ष्मीचे चिन्ह असे ती म्हणायची.

दिवाळीचा सणहा हिंदुंचा अतिशय आवडता सण. गरीब-श्रीमंतांना हवाहवासा, आपलासा वाटणारा! या सणाची सुरुवात ‘वसुबारस’ ने होते. आश्विन कृष्ण द्वादशी  या दिवसाला गोवत्सव द्वादशी किंवा वसुबारस असे म्हणतात. या दिवशी गाय-वासराची पूजा केली जाते. गाईला गोडधोड खाऊ घातले जाते. अशा रीतीने गाय हा सर्वात पवित्र व देवमय प्राणी मानला जातो. निदान हिंदु मनावर तसे पक्के बिबंलेले असते. विश्वामित्र ऋषींच्या ‘कामधेनु’ गाईची कथाही आमच्या पुराणात मोठ्या कौतुकाने सांगितलेली आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती तर रोज सकाळी गाईची यथासांग पूजा करूनच आपल्या कामाची सुरुवात करीत. आजही बहुतेक अनेक हिंदु धार्मिक कार्यात गो-ग्रास म्हणजे गाईला एक नैवेद्य खाऊ घालण्याची प्रथा दिसून येते.

सर्व प्राण्यांमध्ये गाईचे महात्म्य एवढे का? असा जेव्हा विचार करू लागतो. तेव्हा भूतकाळाचा मागोवा घेणे अपरिहार्य ठरते. मोहोन-जो-दोरोच्या काही टेराकोट्टा म्हणजे भाजलेल्या मातीच्या मूर्ती डोळ्यासमोर येतात. धष्टपुष्ट बैलाच्या या मुद्रा बरंच काही सांगून जातात. प्राचीन काळी सारेच देश शेतीप्रधान होते. अगदी रानावनात राहणारा मानवदेखील काही ना काही धान्य पिकवून त्यावर गुजराण करीत होता. थोडा सुसंस्कृत झालेला मानव शेतीसाठी, माल वाहतुकीसाठी, आणि प्रवासासाठी बैलांचा उपयोग प्राचीन काळापासून करीत आला आहे. एवढच नव्हे तर प्राचीन काळी यज्ञवेदीवर दिल्या जाणाऱ्या पशुबळींमध्ये बैलांचाही समावेश होता. अशा बळी दिलेल्या पशुंचे मांस प्रसाद म्हणून भक्षण केले जात असे. म्हणजे गोमांस-भक्षण करणे प्राचीनकाळी निषिद्ध नव्हते. त्यामुळे गायीचा वंश कायम टिकविण्यासाठी गाईचे रक्षण करणे, तिची जोपासना करणे अत्यंत आवश्यक गोष्ट ठरली असावी. गाईचा वापर बैलासारखा श्रमाच्या कामासाठी होऊ नये, किंवा मांस भक्षणासाठीही होऊ नये यासाठी तत्कालीन दृष्ट्या ऋषीमुनींनी गाईला देवत्व बहाल केले असावे. हळू-हळू गोरक्षण हा धार्मिक कर्तव्याचा भाग ठरला. गाईला देवत्व प्राप्त झाल्याने तिच्या रक्षणाची जबाबदारी हिंदु समाजावर आपोआपच आली. तिचे देवत्व समाजावर बिंबवण्यासाठी तत्कालीन पुरोहितांनी अनेक पौराणिक कथांची जोड त्याला दिली असावी. गाईच्या सर्वांगावर देवांची वसती असल्याने तिच्या कुठल्याच अवयवाला धक्का लागणार नाही, याची काळजी आपल्या पूर्वजांनी घेतली असावी. हिंदु-समाज तसा पापभीरू, भाबडा असल्याने ऋषीमुनींनी गाईविषयी पसरविलेले समज, कथा, दंतकथा आणि पूजाविधी समाजात खोलवर मुरले गेले. आजही ते तसेच घर करून राहिले आहेत.

सातव्या-आठव्या शतकापासून हिंदुस्तानावर यवनांची आक्रमणे वाढतच गेली. पुढे यवनांनी इथे आपली सत्ताच स्थापन केली, हा इतिहास सर्वश्रुतच आहे. सत्ता स्थापनेबरोबर सक्तीच्या धर्मप्रसालाही त्यांनी प्राधान्य दिले. सत्तेच्या बळावर जबरदस्तीने धर्मांतर करवून त्यांनी हजारो हिंदुंना आपला यावनी धर्म स्वीकारायला लावला. हे यवन मुळातच गोमांस-भक्षक होते. हिंदु समाज गाईला देवतेसमान मानतो हे त्यांच्या लक्षात येताच, सार्वजनिक ठिकाणी गाईची हत्या करून आपल्या शक्तीचे प्रदर्शन करून हिन्दुंवर दहशत बसविण्यात ते धन्यता मानू लागले. यामुळे हिंदुंवर गाईच्या रक्षणाची जबाबदारी आणखीनच वाढली. याचबरोबर शेतीसाठी व इतर कामासाठी, तसेच मुलांच्या पालनपोषणासाठी गाईच्या रक्षणाची आवश्यकताही वाढली. गोरक्षण हे धर्माचेच एक अंग बनून गेले. हिंदु राजांच्या प्रजाहिताच्या कामात गो-रक्षण हे एक महत्वाचे कर्तव्य ठरले. शिवछत्रपतींनी आपल्या नावाच्या बिरुदांमध्ये आणि आपल्या राजमुद्रेवर ‘गोब्राम्हण प्रतिपालक’ असे अभिमानाने गोवले. गाईचे रक्षण म्हणजे हिंदु धर्माचे रक्षण असे समीकरणच होऊन गेले. नंतरच्या काळात म्हणजे कालपरवापर्यंत गो-हत्येचे निमित्त होऊन मोठमोठ्या जातीय दंगलीही उद्भवल्या. मात्र अशा दंगलींमध्ये धर्मप्रेमापेक्षा धर्माचे राजकारण करणारेच आघाडीवर राहतात. आणि मधल्यामध्ये भरडला जातो तो सामान्य माणूसच!

आता काळ बदलला. जीवनशैली बदलली. मात्र गायीच्या दुधाची गरज अधिकच वाढली. म्हणजे गोरक्षणाचा प्रश्न अधिकच प्रभावी झाला. परंतु हे गोरक्षण वा गो-प्रतिपालन केवळ आपल्या देशापुरते मर्यादित राहिलेले नसून ती जगभराची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. दुधाची वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनेजगभर मोठमोठे उद्योग म्हणून नावारूपास आली आहेत. दुधाची भुकटी (पावडर), चीज, लोणी, चॉकलेटस, दुधाची पेये, मिठाई, पक्वान्ने आणि चहा-कॉफीसारख्या पेयांना लागणारेच दुग्ध व्यवसाय वाढवून त्याचे औद्योगिकीकरण करण्यात युरोपीय देश,  ऑस्ट्रेलीया, न्युझिलंड, कॅनडा, अमेरिका अशा अनेक देशांनी अतिशय जागरूकतेने, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अतुलनीय प्रगती केली आहे. त्यामानाने आपला देश मात्र अजूनही पारंपारिक पद्धतीचाच अवलंब करीत राहिल्याने याबाबतीत खूपच मागे राहिला आहे, तसेच म्हणावे लागेल. दुधाच्या जागतिक बाजारपेठेत हा देश शेतीप्रधान असूनही आपला बोलबाला नाही. तिथे आपला दबदबा निर्माण करण्याइतकी नैसर्गिक संपत्ती आपल्याकडे निश्चितच आहे त्यावर आपल्या राष्ट्रीय नियोजनात जाणीवपूर्वक भर द्यायला हवा. गुजराथेतील आनंदसारखे प्रयोग भारतभर प्रयत्नपूर्वक व्हायला हवेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तेच खरे गोरक्षण ठरेल. गायीवरील आपले प्रेम रस्त्यावरील गायीला चारा घालून पुण्य मिळविण्याकडे वळण्याऐवजी वैज्ञानिक दृष्टीकोनातून गोपालनाचा विचार समाजात रुजविणे अधिक महत्वाचे नाही का?