रिती रिवाज

गुरु साक्षात परब्रम्ह

गुरु-शिष्याचे नाते आपल्याकडे अलौकिक मानले  आहे. ‘गुरु’ ही संकल्पना तशी पुर्वेकडीलच. पाश्चात्यांकडे जो शिकवितो तो टिचर म्हणजे शिक्षक एवढीच ओळख असते. पण ज्ञानाचा श्रेष्ठ जाणकार, सर्वज्ञ आणि आपली स्वतःची परंपरा निर्माण करणारा तो गुरु अशी मुळ ‘गुरु’ या संस्कृत शब्दाची फोड करून सांगितली जाते. प्राचीनकाळी शाळा, महाविद्यालये, पुस्तके, ग्रंथालये किंवा इतर तांत्रिक साधने नव्हती. तेव्हा ‘गुरु’ हेच एकमेव ज्ञानाचे भांडार होते. त्यामुळे गुरु हे सर्वज्ञानी, व्यासंगी, अभ्यासू आणि साऱ्या शास्त्रांचे जाणकार असत. कसलीही आधुनिक साधने हाताशी नसताना ही प्रचंड ज्ञानप्राप्ती हे गुरु मिळवत. म्हणूनच त्याला ‘तपश्चर्या’ असे म्हणत.  गुरु म्हणजे त्यागाची परमावधी! जे जे आपणास ठावे ते ते आपल्या शिष्यांना भरभरून देणारा तो गुरु! ते देताना, एखाद्या व्यापाऱ्याप्रमाणे आपल्या मालाचे मोजमाप आणि मूल्य गुरु कधीही ठरवित नाही. कोणते कोणास द्यावे याचा शोध घेऊन त्या शिष्याला आपल्या अंतःकरणापासून जेवढे शक्य असेल तेवढे ते ते ज्ञान गुरु देत असत.

फार प्राचीनकाळी आपल्याकडे गुरूंचे आश्रम असत. शिक्षणासाठी या आश्रमात जाऊन राहावे लागे. हे आश्रम नागर वस्तीपासून दूर एकांतात किंबहुना रानावनात असत. तिथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरूच्या सेवेबरोबरच शेती करणे, जंगलातून लाकूडफाटा  आणणे तसेच गुरुमातेस घरकामात मदत करणे इ. कामे करावी लागत. आश्रमात शिकावयास येणारे विद्यार्थी राजपुत्र, सरदार-प्रधानांचे, धनिकांचे त्याचबरोबर गरीब ब्राम्हणांचे पुत्रही असत. पण इथे कसलाही भेदभाव पाळला जात असे. सर्वांना समान भावनेने राहावे लागे. सारे साधीसुधी वल्कले नेसून पडतील ती कामे आनंदाने करीत. विद्यार्थ्यांच्या म्हणजे शिष्यांच्या साऱ्या निष्ठा गुरूच्या पायी वाहिलेल्या असत. ‘गुरु साक्षात परमेश्वर’ अशी प्रार्थना सर्वश्रुत आहेच. कोणतेही ज्ञान मिळवायचे असेल तर गुरु हा हवाच. स्वबळावर, स्वप्रयत्नाने, चुका करीत सुधारणा ‘ट्रायल अँड एरर’ पद्धतीने ज्ञानप्राप्तीला आपल्याकडे मान्यता नाही. कारण यात दिग्दादर्शन करणारा कुणी नसल्याने प्रयत्न दिशाहीन ठरतील किंवा वाया जातील अशी भीती राहतेच. त्याऐवजी ज्ञानसंपन्न गुरूकडे अध्ययन केल्यास त्या, त्या विषयाची आवड, ओढा आणि कुवत यांचा विचार करून त्याला योग्य असे ज्ञान गुरूच देऊ शकेल असा विश्वास आपल्याकडे परंपरेने ठेवला गेला. त्यामुळे आपल्याकडे ‘गुरु’ हिये एक अत्यंत महत्वाची संस्था मानली गेली.

‘गुरूबिन कौन बतावे बाट| बडा बिकट यमघाट’ असे संत कबीरांनी म्हटले आहे हा भवसागर तरुन जायचे असेल तर योग्य गुरूच खरे मार्गदर्शन करू शकतील असा त्यांचा विश्वास आहे. या जीवनात लोभ, मोह, मत्सर, मद, काम आणि क्रोध अशा अनेक विकारांनी मानवी मन व्यापलेले असते. जोतो आपल्या स्वार्थात मश्गुल राहून अखेर अनेक दुःखाचा धनी होतो. श्रीकृष्णांनी अर्जुनाला श्रीमदभगवतगीता सांगण्याच्या निमित्ताने साऱ्या मानवजातीलाच उपदेश केला आहे. हजारो वर्षे गेल्यानंतरही त्याचे महत्व यत्किंचितही कमी झालेच नाहीच, पण आज त्याचे मोल अधिकाधिक जाणवू लागले आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, “आपण जेथे आहोत तेथे आपले जे जे विहित कर्म आहे ते फलाची आसक्ती न ठेवता निष्ठेने करीत राहा. आपले कर्तव्य, कर्म भगवंताच्या जपायाशी वाहा. म्हणजे अपयशाचे दु:ख होणार नाही किंवा यशाच्या गर्वाने फुलणार नाहीस. मीपणाचा अहंकार वाढणार नाही. तसेच योग्य निर्णय घेतांना मन विचलित होणार नाही.” भगवान श्रीकृष्ण गीतेतील शिकवणीमुळे साऱ्या जगताचे, मानवजातीचे सर्वश्रेष्ठ गुरु ठरतात. पण त्यांची शिकवण सामान्य माणसांपर्यंत पोहचविण्यासाठी, त्या त्या व्यक्तिच्या प्रत्यक्ष जीवनात योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सुयोग्य गुरु लाभणे हे अतिशय भाग्याचे ठरते. तसा गुरु न लाभल्यामुळे मानवी जीवन भरकटण्याचा संभव उरतो. बुद्धी, ज्ञान, धन, पात्रता अशा अनेक गोष्टी हाताशी असूनही मानव असमाधानी, दिशाहीन आणि अस्वस्थ राहतो. याचे कारण आपण जे ऐहिक वैभव मिळवीत आहोत, त्यासाठी जे करतो आहोत तेच खरे आहे असे मानत राहतो. ते खरे समाधान नसून तो आपला भ्रम होता, असे कळेपर्यंत अनेकदा उशीर झालेला असतो. म्हणूनच ‘योग्यवेळी गुरु लाभणे’ फार महत्वाचे ठरते.

आपल्या आयुष्यातील विकासाचे ध्येय ठरविण्यासाठी आणि ते गाठण्यासाठी सक्षम गुरु हा हवाच. पण तो कोण व कसा शोधायचा? संत एकनाथांनी यावर फार सोपे उत्तर दिले आहे. ते म्हणतात, “जो जो जयाचा घेतला गुण | तो तो म्या गुरु केला जाण |” कुणाकडे काय गुण असेल ते सांगता यायचे नाही. आपल्या आयुष्यात असे अनेकजण येतच असतात. त्यांच्याकडे कुठला ना कुठला गुण दडलेला असतो. तो अनेकजण घेतच असतात. त्यांच्याकडे कुठला ना कुठला गुण दडलेला असतो. तो ओळखून त्याला आत्मसात कसे करावे हे ज्याचे त्याने ठरवावयास हवे. त्या गुणाविषयीचे त्याचे श्रेष्ठत्व विनासंकोच मान्य करून त्यास गुरूचा मान देण्याचे मोठे मनही असले पाहिजे. मुंगी सारखा यत्किंचित प्राणीदेखील उद्यमशिलतेचा गुरूच ठरतो. तिला आळस आणि विश्रांती जणू माहितीच नसते. सातत्याने प्रयत्नशील राहणे हा तिचा गुण प्रत्येक मानवाने उचलला तर जगाचा विकास किती सहजतेने होईल हे सांगावयास नको. जे ज्ञान, कसब वा कौशल्य मोठमोठाले ग्रंथ वाचून अथवा एखाद्या शिक्षणसंस्थेत शिकून मिळविता येणार नाही, ते एखाद्या अर्धशिक्षित कारागीर, शेतकरी किंवा अशिक्षित खेडूतही सांगून जाईल. बांबू आणि वेतापासून आणि आकर्षक वस्तू बनविणारे कारागीर, गर्द झाडीच्या जंगलात आपला मार्ग अचूक शोधणारे आदिवासी असोत की मोठमोठ्या मेजवानीप्रसंगी अनेक चविष्ट पदार्थ बनविणारे अर्धशिक्षित खानसामे असोत, ते त्यांच्या क्षेत्रात इतरांपेक्षा श्रेष्ठच ठरतात. त्यांच्याकडून तसे कौशल्य शिकायचे असेल तर प्रथम नतमस्तक होऊन त्यांचे शिष्यत्व पत्करायला हवेच. तिथे आपले शिक्षण, आर्थिक स्थिती आणि प्रतिष्ठा बाजूस ठेवली तरच गुरु प्रसन्न होऊन आपणास हवे ते ज्ञान आनंदाने देईल. यामुळेच संत एकनाथांसारख्या प्रकांड पंडितही नम्र भावाने ज्याच्या, ज्याच्याकडे घेण्यासारखे गुण आहेत, त्याला गुरु मानायला तयार होतो.

ज्ञानदाता गुरु आपल्याकडील ज्ञान शिष्यांपर्यंत केवळ पोहचवीत नाही तर त्याच्यावर असे संस्कार करतो की, ज्ञानाने त्याचा सर्वांगीण विकास होऊन त्याचे चारित्र्य विकसित होईल. ते सकारात्मक घडत जाईल. शिष्य यशाची शिखरे गाठत जातो. पण गुरु मात्र असतो तिथेच राहतो. मात्र तेच गुरूच्या आनंदाचे निधान ठरते. “माझ्या ज्ञानाचे अमुक, एवढे मोल मोज म्हणजे, ते तुझ्या पदरात घालीन.” असा लोभ, मोह गुरूपाशी नसतो. आपल्या स्वार्थाचा विचार करून भक्तांना फशी पाडणारे गुरु ‘अड्क्याला तीन मिळतात’ असे समर्थांनी सांगून ठेवले आहे. लोभी, दांभिक आणि भोंदू यांनी गुरुपणाचा कितीही आव आणला तरी ते खरे गुरु नव्हेत. जे आपल्याकडे आहे ते अत्यंत निस्वार्थ भावनेने, निर्मळ मनाने, शिष्याचा गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता नि:संकोचपणे देतो तो गुरु. आणि त्याहूनही उच्च कोटीचा गुरु तो सद्गुरू या पदवीस पोहचतो. कसल्याही ऐहिक सुखाचा, धनदौलतीचा अथवा मान-प्रतिष्ठेचा लोभ न ठेवता विशुद्ध भावनेने आपला ज्ञानयज्ञ आयुष्यभर चालविणारे निष्ठावंत.

गुरु आणि तितकेच श्रद्धावान आणि प्रामाणिकपणे आपल्या गुरूची कीर्ती वाढविणारे शिष्य अशी गुरु शिष्य परंपरा आपल्या देशात प्राचीन काळापासून जोपासली गेली आहे. आजच्या आधुनिक काळात ऐहिक सुखाच्या मायाजालापुढील धन, वैभव आणि साऱ्या सुखसोयींचा मोह टाळून आपल्या शिष्यांचे आयुष्य घडविण्यात सौख्य, समाधान आणि धन्यता मानणारे गुरु आजही कुठे ना कुठे दिसतातच. आजच्या भ्रष्टाचारी तिमिरात अशा पणत्या आशेचे किरण जागवत असतात. कालाय तस्मै नमः|

सद्गुरू म्हणजे उच्चकोटीचा गुरु. संत निवृत्तीनाथांचे उदाहरण सद्गुरू म्हणून सांगता येईल. ज्ञानेश्वरांच्या चार भावंडातील निवृत्तीनाथ हे थोरले. त्यांचे अक्षरवाड:मय फारसे नसल्याने सामान्यांना त्यांच्या विषयी फारशी माहिती नसते. ते स्वत: नाथपंथी होते. त्यांना नाथपंथी योगीराज गहिनीनाथांकडून दीक्षा प्राप्त झाली होती. ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई या तिन्हीही भावंडांनी त्यांना गुरु मानले होते. ज्ञानेश्वरीसारख्या अजरामर ग्रंथ आणि तेवढ्याच तोलामोलाच्या अभंगरचनेत ज्ञानदेव पदोपदी गुरुकृपेची महती सांगतात. हा ज्ञानियांचा राजा आपल्या ज्ञानेश्वरी लिहिण्याबद्दल बोलताना म्हणतो “गीता म्हणजे साऱ्या वेदांचे सार. त्यावर लिहिणे महाकठिण. मी तर किटकमच्छरासारखा शुद्र, पण गुरुकृपेमुळेच हे धाडस करतो आहे.” यातील ज्ञानराजांची विलक्षण विनयता आणि पराकाष्ठेची नम्रता बाजूस ठेवली तरी निवृत्तीनाथांची थोरवी कमी होत नाही. आपल्या लेखनाचे सारे श्रेय ते गुरूंनाच देतात. त्याअर्थी त्यांचे श्रेष्ठत्व वादातीतच असले पाहिजे. मग जर निवृत्तीनाथ एवढे ज्ञानी, जाणकार होते तर मग त्यांनीच का ज्ञानेश्वरी लिहिली नाही? किमानपक्षी ज्ञानेश्वरीतील काही ओव्या, काही भाग त्यांना स्वतःचा म्हणून सहज घालता आला असता. पण तसे झाले नाही. कारण ते आपल्या शिष्याची प्रतिभा, काव्य शक्ती, निवेदनातील आर्तता आणि त्याचावर असलेला सरस्वतीचा वरदहस्त जाणणारे ते सद्गुरू होते. आपल्या शिष्याचे श्रेष्ठत्व त्यांनी जाणले आहे. म्हणून ज्ञानेश्वरी लेखनाचा जणू आदेशच त्यांनी गुरु या नात्याने ज्ञानदेवांना दिला होता. त्यामुळेच ज्ञानदेवांसह सोपान आणि मुक्ताबाईदेखील आपण निवृत्तीनाथांच्या गुरुकृपेने पावन झाल्याचे सांगून आपल्या यशाचे सारे श्रेय त्यांनाच देतात. स्वतः मागे राहून आपल्या शिष्यांच्या उत्कर्षाच्या परमावधीला कारणीभूत होणाऱ्या निवृत्तीनाथांसारखे त्यागी सद्गुरू विरळाच!

गुरु-शिष्याचे नाते पिता-पुत्राप्रमाणेच असायचे. आपल्या आश्रमात शिकावयास येणारी मुले गुरूला आपल्या मुलांप्रमाणेच वाटत. गुरु हे पित्याप्रमाणे कठोरही असत. तितकेच वत्सलतेचा पान्हा असलेले प्रेमळ हृदयाचेही असत. त्यामुळे गुरूला ‘गुरुमाऊली’ असे संबोधण्याची प्रथा आपल्याकडे शेकडो वर्षांपासून चालत आली आहे. गुरूला पित्याचा मान दिल्याने गुरुपत्नी ही गुरुमाऊली आणि गुरुपुत्राला अथवा कन्येला अनुक्रमे गुरुबंधू व गुरुभगिनी असे संबोधले जात असे. आपल्या संतांच्या गुरूविषयीच्या भावना मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने त्यांच्या अभंग आणि इतर साहित्यातून व्यक्त झाल्या आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘सद्गुरुसारखा पाठिराखा असेल तर जगात कशाचीच भीती बाळगायला नको.’ निवृत्तीनाथ ज्ञानदेवांचे गुरु. नात्याने ते जरी वडील बंधू होते, तरी गुरुपदास पोहोचल्यावर ज्ञानदेवांनी त्यांना पिता, माऊली, पाठिराखा एवढेच नव्हे तर परमेश्वराचीही उपमा दिली. केवळ उपमाच देऊन ते थांबले नाहीत, तर आपल्या सर्व कार्याचे श्रेय गुरुपदी वाहून आपण स्वतः अत्यंत नगण्य, शुद्र असल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतरच्या संतांनी ज्ञानदेवांना गुरुस्थानीमानून त्यांनाही ‘माउली’ हेच नामानिधान दिले. आजही ते ‘ज्ञानेश्वर माउली’ म्हणूनच ओळखले जातात. नव्हे तसे सर्वांच्या मुखातून त्यांचा उल्लेख आपोआपच तसा केला जातो. आई आपल्या तान्ह्या बाळाची जशी काळजी घेते, त्याला भरविते, न्हाऊ-खाऊ घालते, हात धरून चालविते, व संगोपन करते तशी ही ‘गुरुमाऊली’ शिष्याला घडविते. असे गुरु-शिष्याचे प्रेमाचे, जिव्हाळ्याचे अतूट बंधन आहे. इथे देण्याघेण्याच्या व्यवहाराला, मोहाला यत्किंचितही स्थान नसते. इथे असते ते त्यागाचे अधिष्ठान!

आषाढ शुध्द पौर्णिमेला व्यास पोर्णिमा म्हणून ओळखतात. महर्षी व्यास यांना आद्य गुरु म्हणून ओळखतात. हे ‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्व’अशी म्हण सार्थठरविणारे अद्वितीय आचार्य. भारतीय संस्कृती यांना वंदनीय मानते. धगधगीत वैराग्य, द्रटेपणा, प्रतिभासंपन्न कवित्व, उद्दात्त साहित्यिक सद्गुण, लोकोत्तर ज्ञान, संकलन, संपादन-समन्वय यांची अपूर्व अंतर्दृष्टी, नैतिक उत्कर्षाचा ध्यास, समाजाला अभ्यासनिष्ठ बनविण्याची जाज्वल निष्ठा आणि परंपरेचा सार्थ अभिमान यासारख्या अनेकविध गुणांमुळे हे भारतीय संस्कृतीचे मानदंड ठरले आहेत. (संदर्भ: भक्तिकोश) यानिमित्ताने सर्वच गुरूंचा सन्मान यादिवशी करण्याची प्रथा व परंपरा सुरु झाली. म्हणून या दिवसाला ‘गुरुपोर्णिमा’ असे नाव पडले.  या दिवशी गुरूंचा गौरव, पूजन करून त्यांच्या पायी आपले ज्ञान वाहण्याची प्रथा आहे. विशेषतः संगीत-नृत्यक्षेत्रात या परंपरा अत्यंत श्रद्धेने व उत्साहाने पाळल्या जातात. आपले शिक्षण पूर्ण होताच नतमस्तक होऊन ‘गुरुदक्षिणा’ देऊन आपल्या गुरुचे ऋण फेडण्याच्या भावनेने हे केले जाते. तर आपल्या शिष्याची उज्जवल कीर्ती हीच खरी गुरुदक्षिणा मानणारे गुरु आपल्या त्यागी वृत्तीचे दर्शनच घडवीत असतात.

कुणाही कलावंतांची ओळख देताना, तो किंवा ती अमुक-तमुक गुरूंचे शिष्य अशी आदरपूर्वक करून दिली जाते. शास्त्रीय संगीतात वेगवेगळ्या प्रस्थापित झालेल्या आद्य गुरूंनी आपापली वेगळी शैली व परंपरा निर्माण केली. ह्या शैली संगीतातील घराणी म्हणून नावारूपास आली. प्रत्येक घराण्याची खास वैशिष्ट्ये, नियम आणि आविष्कार पद्धती परंपरेने आणि तितक्याच अभिमानाने जोपासल्या जातात. आपल्या कलायशाचे सारे श्रेय गुरूला देऊन गुरूच्या ऋणात राहण्यात शिष्याला आनंद आणि अभिमान वाटतो. यामुळे संगीत-नृत्यामध्ये प्रत्येक घराण्याचे वेगळे-आगळेपण गेली शेकडो वर्षे जपून ठेवले आहे. हा त्या त्या घराण्यातील गुरूंचा महिमा आहे. कुमारगंधर्वासारखे व्युपन्न, प्रतिभावान आणि सर्जनशील गायक वेगवेगळ्या शैलीतील खास वैशिष्टे एकत्रित करून संगीतात प्रयोग करणारे अतिशय थोडे आहेत. पण तरीही मूळ गाभ्याला दोष तर नाहीच पण धक्काही देऊ इच्छित नाहीत. कारण त्यांनाही या गुरुपरंपरेचा तितकाच अभिमान असतो. आपल्या कला आविष्काराने आपल्या गुरूला कुणी दोष देईल असे नियमबाह्य वर्तन संगीत-नृत्य क्षेत्रात सहसा कुणीही करणार नाही. एवढे गुरु-परंपरेचे पावित्र्य आवर्जून पाळले जाते.

आजच्या आधुनिक काळातही शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये याचबरोबर आधुनिक संगणक तंत्राने तर ज्ञानाच्या वाटा सर्वव्यापी झाल्या आहेत. प्राचीनकाळी अत्यंत अल्प साधनांमुळे ज्ञान, शिक्षण ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी झाली होती. ती परंपरेने किमान दोन हजार वर्षे तशीच राहिली होती. ती स्थिती आता राहिलेली नाही. प्रत्येक घराघरातून ज्ञानाचा दीप लावला जाण्याचे सर्वतोपरी प्रयत्न चालू आहेत. प्रत्येक मानव साक्षर होणे हा त्याचा जन्मसिद्ध हक्क मानला गेला आहे. तरीही ज्ञानदानाचे कार्य करण्यासाठी गुरुचे स्थान आजही अढळच आहे. शिक्षणाचा श्रीगणेशा असो की, उच्चतम ज्ञानप्राप्तीचे संशोधन असो, पुढला योग्य मार्ग दाखविणारा दीपस्तंभासारखा गुरु हा हवाच. गुरु हा नेहमी आहे तिथेच राहतो. त्याचे मात्र यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करून नावलौकिक मिळवितात. गुरुही तोच आपला सन्मान वा गौरव मानतात. जगातील होऊन गेलेल्या सर्वच श्रेष्ठ किंवा थोर व्यक्तिंचे शिक्षक कीर्तीने लहान किंवा पडद्याआड राहिले असतील, पण त्यांनीच या श्रेष्ठांना घडविण्याचा पाया घातला. संस्कार करून योग्य दिशा दाखविल्या. हे त्याचे जगावर किती मोठे ऋण आहे, हे शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. आपल्या शिष्याच्या प्रतिभेचा स्फुल्लिंग फुलविण्याचे कार्य त्या, आज छोट्या वाटणाऱ्या ज्योतींनीच केले आहे, हे कधीही विसरून चालणार नाही.

म्हणूनच आपल्याकडे ५ सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारतीय तत्वज्ञानाचे अत्यंत व्यासंगी, विद्वान व श्रेष्ठ प्राध्यापक म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातकीर्त होते. त्यांच्या जयंती निमित्ताने या दिवशी सर्वच शिक्षकांचा गौरव राष्ट्रीय पातळीवर करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. हा शिक्षक-दिन गावपातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो. आपल्या गुरूंचे ऋण व्यक्त करण्याचा हा दिवस बालांपासून मोठ्यांच्याही आवडीचा झाला आहे.

मात्र आज समाजामध्ये शिक्षकी-पेशाबद्दल प्रचंड अनास्था, अप्रतिष्ठा, आणि अप्रियतेची भावना वाढीस लागली आहे. एकीकडे विज्ञानाच्या प्रगतीमुळे जगातील कुठलेही ज्ञान घरबसल्या सहजतेने मिळविण्याची साधने एवढी उपलब्ध झाली आहेत की, कुणाच्याही सहाय्याशिवाय आपल्या आपण ज्ञानप्राप्ती करून घेणेही शक्य झाले आहे सारे जग एकमेकांच्या जवळ आले आहे. राष्ट्राराष्ट्रातीलच नव्हे तर अंतराळातील ग्रहांचे अंतरही कमी झाल्यागत सारे एकमेकांजवळ आल्यासारखे चित्र भासत आहे. तरीही मानव मात्र मनाने एकमेकांपासून दूर जात आहे, असे दुर्दैवी चित्र समोर येत आहे. भ्रष्टाचाराचा भस्मासुर समाजाच्या सर्व थरांतून आपला विळखा आवळत चालला आहे. त्याचे दृश्य आणि अदृश्य परिणाम शिक्षण क्षेत्रावरही उमटणे, हे स्वाभाविकच ठरले आहे. या काळात मानवतेला कलंक लागतील अशा घटना पदोपदी घडत आहेत. नव्या पिढीपुढे चांगले आदर्श दिसेनासे झाले आहेत. वैभव लोलुपता, ऐहिक सुखासीनता, आधुनिकीकरणाचा हव्यास आणि चंगळवादाकडे समाज आकर्षित होउ लागल्याने सामाजिक मुल्ये बाजूला सारून आपणास जे हवे ते, हव्या त्या (वाटेला त्या) मार्गांनी मिळविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे.

दुसरीकडे संगणकीकरणामुळे मोठमोठ्या वेतनाच्या नोकऱ्या उपलब्ध झाल्याने नवी पिढी साहजिकच तिथे ओढली जाऊ लागली आहे. त्यामुळे हुषार, सर्जनशील आणि निष्ठावंत शिक्षकांची वानवा निर्माण होईल अशी भीती व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. अशा वेळी आज कार्यरत असलेल्या शिक्षकांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. आजच्या उमलत्या फुलांतून, मुलांतून त्यांना उद्याचा सक्षम, राष्ट्र-प्रेमी नागरिक बनवायचा आहे. ती मुलेही आजच्या आधुनिकतेची आणि चंगळतेची शिकार बनलेली आहेतच. आता उडदामाजी काळेगोरे असल्याप्रमाणे काही अकार्यक्षम शिक्षक सोडले तरी, कमी वेतन, सामाजिक उपेक्षा, अनेक शालेय जबाबदाऱ्या अशा प्रतिकूलतेतही बहुतांशी शिक्षक आपल्या ध्येयाशी एकनिष्ठच असतात. अनेक अडीअडचणीवर मात करून नवी पिढी घडविण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना स्थैर्य, आर्थिक पाठबळ आणि सामाजिक प्रतिष्ठा लाभो हीच या प्रसंगी शुभकामना! तसे झालेच तर, त्यातूनही गुरूंची नवी ‘आदर्श’ पिढी उदयास आल्यावाचून राहाणार नाही, हे निर्विवाद !