महाभारतात अनेक उपकथानके आहेत. त्यातल्याच एका कथेत द्रुपद राजाच्या गायी कौरव पळवून नेतात. त्यामुळे विराटाचे कौरवांशी युद्ध होते. या त्याच्या पदरी वेषांतर करून राहिलेले पांडव त्याच्या मदतीसाठी पुढे सरसावतात. त्यांनी वेषांतरापुर्वी आपली लपवून ठेवलेली शस्त्रे शमीच्या झाडावरून खाली उतरवतात. आणि कौरवांशी युद्ध करून विराटाला विजय मिळवून देतात. या विजयाची आठवण म्हणून हा दिवस ‘विजया –दशमी’ नावाने साजरा करतात. त्याचेच दुसरे नाव ‘दसरा’ असेही आहे. याच दिवशी रामाने दहा तोंडाच्या रावणाचा वध केला अशीही एक कथा आहे. दशमुखांवरून या दिवसाला उत्तरेत ‘दशहरा’ म्हणून ओळखतात. याच दिवशी अष्टभुजा देवीने उन्मत झालेल्या महिषासुराचा वध केल्याची आणखीही एक कथा आहे. इतिहासकाळापासून या दिवशी शस्त्रपूजा करण्याची व सोने लुटण्याची प्रथा आहे. आजच्या काळातही प्रतिकात्मक शस्त्रपूजा करून सोने म्हणून आपट्याची एकमेकांना दिली जातात. दारी गुढ्या तोरणे उभारली जातात. घरी गोडधोड केले जाते. आता तर विजयादशमीच्या दिवशी शोभा यात्रा काढून हा सण मोठ्या हौसेने सार्वजनिकरीत्या साजरा केला जातो. म्हणजे ही फार प्राचीन काळापासून चालत आलेली हिंदू प्रथा आहे, असे म्हणावयास हवे.
आपले राष्ट्र ‘शेतीप्रधान देश’ असल्याचे सर्वश्रुतच आहे. इतिहासकाळात राजे-सम्राटासाठी लढणारी सेना ही त्याची प्रजाजनच असावयाची. त्याकाळी आजच्यासारखी उन्हाळ्यात जलसिंचनाची काही व्यवस्था नसल्याने पावसाळी शेती हेच अन्न उत्पादनाचे एकमेव साधन होते. तशातच पावसात युद्धे करणे सोयीचे नसल्याने सैनिक म्हणून काम करणारी प्रजा आपापल्या शेतीच्या कामाकडे वळत. सैनिकांबरोबर बाकीचे उद्योग करणारे सुतार, लोहार, गवंडी, चर्मकार, कास्तकार, शिकलगार असे सर्वच व्यावसायीक आणि मजूर आपापली कामे थांबवून शेती करण्यासाठी जात. भरपूर धान्य पिकवित. प्राचीनकाळी गणप्रमुख म्हणजे राजादेखील मोठा शेतकरीच असावयाचा. यामुळे पावसाचे चार महिने साऱ्यांची अस्त्रे-शस्त्रे गुंडाळून ठेवली जात. कोणतेही साधन वा शस्त्रे चार महिने पडून राहिले तर ते गंजणार किंवा काम देईनासे होणार हे ओघानेच आले.
भाद्रपद महिन्याच्या अखेरीस पावसाळी पिके तयार होऊन घरी आली की, पुन्हा युद्ध- मोहिमा सुरु होत. त्या बहुधा दिवाळीचा सण साजरा झाल्यावर पूर्ण तयारीने सुरु होत असत. त्यासाठी आपापली हत्यारे वा साधने जय्यत तयार ठेवण्याचे महत्वाचे काम सर्वांपुढे असे. या आधीचे चार महिने शेतीत रमलेले किंवा थोडे आळसावलेले पुन्हा कामाला केव्हा सुरवात करणार? म्हणून परंपरेने शस्त्रपुजेसाठी विजयादशमीचा म्हणजेच आश्विन शुद्ध दशमीचा सुदिन मुक्रर करून तो नित्यनेमाने पाळला जाऊ लागला असावा.
पावसाळ्यानंतर शस्त्रपूजा करावयाची म्हणजे शस्त्रे शस्त्रागरातून बाहेर काढायला हवीत. त्यांना साफसूफ करणे; आवश्यक ती डागडुजी करणे; धार लावणे; तेलपाणी करणे इ. कामे ओघानेच आली. तसेच इतर कामे करणाऱ्यांची साधने देखील पूर्ववत काम करण्याच्या स्थितीत आणण्यासाठी त्यांचीही डागडुजी करणे गरजेचे ठरले. अशा रीतीने चार महिने शेतकरी झालेले सारे कामकरी, सैनिक आपापल्या साधनांची जुळवाजुळव करणार. हे काम सर्वांनी एका ठराविक वेळेत केले नाही तर मात्र एकामुळे दुसऱ्याचे काम अडून पडणार. यासाठी दसरा ही कालमर्यादा सर्वांसाठी ठरली असावी. त्यादिवशी शस्त्रपूजन करून कामालाच पुन्हा सुरुवात करायची. अशा रीतीने शस्त्रपूजनासाठी एक दिवस मुक्रर झाल्यावर त्याला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आल्यास नवल ते काय? यादिवशी सारेजण एकत्र यावयाचे: एकमेकांना भेटी देऊन, सोने लुटून आनंद व्यक्त करायचे. पूर्वी राजे-महाराजे, सरदार, संस्थानिक अथवा धनिक खरोखरीच सोन्याच्या भेटी देत असत. सामान्यांसाठी आपट्याची पाने प्रतिकाच्या स्वरूपात दिली जातात. इतिहास काळात लढाईच्या मोहिमेची रंगीत तालीम म्हणून आपल्या नगराची सीमा प्रतीकात्मकरीत्या ओलांडून सिमोल्लंघन करून आलेल्या वीरांचे घरी ओवाळून स्वागत व्हायचे. ही साधने त्या त्या व्यक्तीची अन्नदात्री असल्याने त्यांचे पूजन करून, वंदन करूनच आपल्या साधनांना, हत्यारांना रोज सकाळी हात लावून कामाला लागणारे कारागीर आजही आपण पाहातोच.
आज काळ बदलला. आता तर शेतीसह सगळेच व्यवसाय वर्षाचे बाराही महिने चालू असतात. त्यामुळे प्रत्येकाला आपापल्या साधनांची, यंत्रांची व्यवस्थित निगा राखणे, हे रोजचेच कर्तव्य झाले आहे. तरीही या साधनांबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करण्याची आपल्या संस्कृतीतील ही महान प्रथा आजही दरवर्षी दसऱ्याला मोठ्या उत्साहाने सर्वत्र पाळली जाते. कारखान्यातील यंत्रसामग्रीपासून विविध कार्यालयांतील कॉम्प्युटरपर्यंत सर्वच साधनांची दसऱ्याला समारंभपूर्वक पूजा करून त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते. हे आपल्या सुसंस्कृतपणाचे एक मोठे लक्षण आहे, असे म्हणावयास हवे. मात्र या साधनांच्या डागडुजीसाठी, देखभालीसाठी, किंवा तेलपाणी करण्यासाठी दसऱ्याची वाट पाहात थांबणे, हे आज योग्य ठरणार नाही, याची खुणगाठ मात्र प्रत्येकाने बांधली पाहिजे. तेच आजच्या व्यवहाराला धरून योग्य ठरेल नाही का?