बाल चित्रकला

प्रस्तावना

बालकला म्हणजे केवळ, मुलांनी काढलेली चित्रे एवढेच नव्हे, तर त्यांनी केलेले मातकाम, चिकट-चित्रे  अथवा इतर वस्तूपासून बनवलेली कोणतीही कलात्मक वस्तू बालकलेत मोडते. मुले जे पाहतात, ऐकतात किंवा अनुभवतात. त्याबद्दलच्या त्यांच्या भावना, विचार अथवा कल्पना, कुठेतरी व्यक्त कराव्या अशी प्रबळ इच्छा प्रत्येक मुलाच्या मनात असते. परंतु ते सांगण्यासाठी त्यांच्याकडे नसतात शब्द! शब्दसंग्रह, त्यांची मांडणी किंवा लिहिण्याचे ज्ञान! हे काहीच त्यांच्याकडे नसते. तेच जर चित्रातून मांडण्याची संधी  त्यांना मिळाली तर त्यांच्या अंतरंगाची एकेक पाकळी उलगडू लागते. त्यातून मुलांना मानसिक समाधान तर मिळतेच पण त्याच बरोबर स्व-निर्मितीचा आनंदही मिळतो. एखाद्या अनुभवावर चित्र काढताना त्याचे स्मरण ते मूल करते. त्यामुळे त्याच्या स्मरणशक्तीला चालना मिळते. चित्रात आकार व रंग यातून त्याच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. त्याच्या सृजनशक्तीला वाव मिळतो, तीचा विकास होतो. एकाग्रता वाढीस लागते. हाताला वळण लागते.- त्यामुळे त्याच्या स्नायूंचा (शारीरिक) विकास होतो. त्याचे स्वतःचे मनोरंजनही होते. अशा रितीने बाल-कला मुलांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावणारा (all round development) व त्यांना अतिशय आवडणारा असा एकमेव विषय आहे.

 

मोठ्यांच्या कलेत कलावंताचा अभ्यास, कसब, व माध्यामावरचे प्रभुत्व प्रगट होते. त्यांचा भर असतो तो Skill प्राविण्य व परिपूर्णता (perfection) यावर!  तर मुलांची कला उत्स्फूर्त असते. त्याला कोणत्याही तंत्राची, ज्ञानाची जोड नसते. मोत्यांच्या कलेचे नियम, तंत्रे अथवा तत्वे यांचे निकष याला लावायचे नसतात. ही एक वेगळीच संकल्पना (concept) आहे. हे प्रथमतः आपण स्वीकारले पाहिजे, मुलाचे चित्र हे चित्रनिर्मिती म्हणून काढलेले नसते. तर रंग, आकार व रेषा यातून केलेले त्या मुलाचे आंतरिक निवेदन असते. ते वाचवायचे असते.