बाल चित्रकला

दृष्टीक्षेप

  १.      मुले चित्र काढीत नसून त्यांचे अनुभव, विचार आणि कल्पना त्यांना मिळालेल्या साधनातून व्यक्त (प्रगट) करीत असतात.

  २.      ही चित्रे म्हणजे मुलांच्या भावनांचे ‘प्रगटीकरण’ होय.

  ३.      मुलांची चित्रे हि केवळ दृश्य-चित्रेच नसतात तर ते त्यांचे आंतरीक निवेदन असते. ते अभ्यासले पाहिजे.

  ४.      मुलांची चित्रे केवळ पाहून चालणार नाही. ती वाचावयास शिकले पाहिजे, ती आपल्या दृष्टीने पाहता मुलांच्या दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे.

  ५.      जे त्यांना सांगायचे असते, व्यक्त करावायचे असते त्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसा शब्दसंग्रह नसतो.

  ६.      त्यांना त्यासाठी लिपीचेही (लेखन) पुरेसे ज्ञान नसते.

  ७.      कलेद्वारे आपले विचार प्रगट करणे मुलांना आवडते, सोपे जाते व त्यांचा विकासही होतो.

  ८.      कलेद्वारे मुलांचा मानसिक, बौद्धिक व शारीरिक म्हणजेच सर्वांगीण विकास होतो.

  ९.      ज्ञान, क्रीडा व करमणूक (मनोरंजन) अशा तिन्ही गोष्टी एकत्र आणणारा बाल-चित्रकला हा एकमेव विषय आहे. त्याला मानसशास्त्राचा आधार आहे.

  १०.  मुलांना रंग खूप आवडतात. रंग उजाळ किंवा भडक असल्यास मुलांचे लक्ष तिथे चटकन वेधले जाते. तांबडा, पिवळा, नारिंगी, काळा असे रंग मुलांचे लक्ष आकर्षून घेतात.

  ११.  मुलांना सहजगत्या उमटणारी व मऊ माध्यमे देणे आवश्यक आहे. त्यामुळे ते आपला आविष्कार सहज, मुक्तपणे, विनासायास करू शकतील.

  १२.  यामुळेच मातकामाला बालकलेत अत्यंत महत्वाचे स्थान आहे. ते अतिशय मऊ आणि मुलांना अतिशय आवडणारे आहे. हल्ली बाजारात प्लास्टिक-क्ले (प्लास्टीसीन) विविध रंगातही मिळते. ती पुन: पुन्हा वापरता येते.

  १३.  मुले जसे दिसते तसे काढत नाहीत. त्यांना जे आवडेल तेच काढतील. त्यांना जे रंग आवडतील त्याच रंगात रंगवतील.

  १४.  मुलांच्या सृजनशीलतेला (Creativity) ला जास्तीत जास्त संधी देणारा व स्वनिर्मितीचा आनंद देऊन मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा ‘बाल चित्रकला’ हा एकमेव विषय आहे. इथे मुलांना जसे वाटते, जे आवडते  तसेच जे व जसे प्रगट (व्यक्त) करावेसे वाटते तेच चित्रातून काढण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे. इतर कोणत्याही विषयावर अभ्यासक्रमाच्या व गुणवत्तेच्या मर्यादा (limitations) पडतात.

  १५.  ‘मोठ्यांच्या दृष्टीकोनातून वाटणाऱ्या चुका’ हि बाल चित्रकलेची वैशिष्ट्ये होत.

  १६.  मुलांच्या चित्रात शिक्षकाने दुरुस्ती करू नये. सूचकतेने बोलून त्यांना चालना देऊन आपले विचार चित्रातून प्रगट करण्यास प्रवृत्त करावे हेच शिक्षकाचे मुख्य कार्य (ध्येय) असते.

  १७.  जीवनात उन्हाळे व हिवाळे अनेक येतात. पण बालपणाचा वसंतऋतू एकदाच येतो. तो फुलू, बहरू द्या. फुलणाऱ्या कळ्यांना कोमेजून टाकू नका.

  बाल चित्रकला फक्त मुलेच काढू शकतात. साधारणतः १४ ते १५ वर्षानंतर मुले वास्तवतेकडे झुकतात. प्रौढावस्थेत बाल चित्रकलेला स्थान नाही.