बाल चित्रकला

बाल कलेचा परिचय

“काय करावं या मुलांपुढे बाई?” साऱ्या भिंती – चितारून ठेवल्यात यांनी? अशी तक्रार करणारी आई जवळ जवळ प्रत्येक घरी आढळते. मुलांचं असं कुठेही रेखाटन, वेडेवाकडे आकार काढणे किंवा आपणास हवी तशी चित्र मुलांनी न काढणं, याबद्दल पालक आपली नाराजी लपवू शकत नाहीत.

 

हा सारा रंगाचा आणि वेळेचा अपव्यय आहे अशी अनेक मोठ्यांची भावना असते. असा जेव्हा मोठी मानसं बोलतात तेव्हा एक गोष्ट ध्यानात येते कि, त्या चित्रांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न मुळी त्यांनी केलेला नसतो. ती केवळ चित्र नसतात तर ती मुलांच्या कल्पनांची, स्वप्नांची खाण असते. त्यांच्या भाव विश्वाचे अनोखे भांडार असते. असा काय असतं या मुलांच्या चित्रात?

 

मोठी माणसं अथवा कलावंत जेव्हा चित्र काढतो त्या, त्या विषयांच्या सखोल चिंतन बरोबरच त्यांचे ते विशिष्ट माध्यम हाताळण्याचे कसब, सराव इतकेच नव्हे तर प्रेक्षकांची आवड या साऱ्या  गोष्टींच्या विचारांतून तो चित्र निर्मिती करतो. मोठ्यांच्या चित्राच्या या कसोट्या मुलांच्या चित्रानां  लावता येत नाहीत. बाल चित्रकला हि पूर्णतः वेगळी संकल्पना आहे. कलेच्या कसल्याही अभ्यासावाचून , तंत्र-कौशल्याशिवाय मुलं चित्र काढतात. मोठ्यांच्या नजरांना जाणवणाऱ्या चुकाही बालचित्रकलेची वैशिष्ट्ये आहेत. हे प्रथम फ्याझ सिझेक या बालकलेच्या आद्य प्रवर्तकाने जगाला सांगितले. बालकाला हि मोठ्यांच्या कलेपेक्षा वेगळी आहे. पण तिचे महत्व अनन्य साधारण असेच आहे. हे सिझेकने जगाला पटवून दिले. आज बाल-कला जगभर मान्यता पावली आहे. आपण मात्र जुन्या पाऊलवाटा सोडावयास तयार नाही हे दुखः आहे.

मुलं जे पाहतात, ऐकतात, अनुभवतात त्यातून त्यांच्या ज्ञानात भर पडत जाते - या ज्ञानाचे मूळ  त्यांची जिज्ञासा असते. या जिज्ञासेतून मिळालेले अनुभव, त्यातून फुलणाऱ्या आपल्या कल्पना, कुणाला तरी सांगाव्यात अशी त्यांची उत्कट इच्छा असते. पण त्यासाठी त्यांच्याकडे नसतात शब्द! शब्दाराचाना वा वाक्ये यातून मुलं ते सारं व्यक्त करू शकत नाहीत. तेच चित्रांतून सांगणे त्यांना अधिक सोपे जाते, आवडते आणि मग मुलांची चित्रे, त्यांच्या मनातील भावनांचे विश्व उलगडून दाखवू लागतात. त्यांचे अनुभव सांगू लागतात. यासाठी मुलांना कलेचा अभ्यास, सराव यांची जरुरी भासत नाही. ती एकेक आकार उत्स्फुर्तपणे काढत जातात. ते आकार त्यांनी स्वयंस्फुर्तीने काढलेले असतात. तो असतो त्यांच्या भावनांचा मुक्ताविष्कार, आत्मा प्रगटीकरण!

 

अगदी बालवयात रेघोट्यापासून सुरु झालेल्या बालकलेत मुलांच्या अनुभवाच्या वाढीबरोबर आकारांची त्यातील बारकाव्यांची आणि रचनेची भर पडत जाते. आपली शिक्षणपद्धती बाल-केंद्रित आहे असे मानलं जातं. पण सर्व विषयात हा एकच असा विषय आहे कि त्यात प्रत्येक मुल ‘एक स्वतंत्र घटक मानलं आहे - प्रत्येकाला जसं वाटतं, आवडतं ते त्याच्या स्वतःच्या पद्धतीने मांडण्याची संधी केवळ बालकलाच देऊ शकते. पण आपण मात्र ते निट न समजल्यामुळे अनेक गैरसमज करून घेतो. मुलांच्या विचार, कल्पना आणि भावनांना चालना देऊन त्यांच्या सृजनशक्तीचा विकास करणारी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला फार मोठा हातभार लावणारी बाल-कला आपल्याकडे मात्र फारच उपेक्षित आहे. या छोट्या लेखनाद्वारे बाल-कलेचा आपण परिचय करून घेऊ या. आता भेटू या पुढील अंकी.