बाल चित्रकला

बाल चित्रकला : चित्ररूपी भाषा - २

आपण मानव स्वतःला सर्व श्रेष्ठ सजीव प्राणी समजतो. कारण आपण विचार करू शकतो. ते विचार, त्या संबंधीच्या भावना शब्दात प्रकट करू शकतो. शब्दांद्वारे इतरांशी ‘संवाद’ साधू शकतो. परंतु हजारो वर्षांपूर्वीचा आदिमानव प्राणी – अवस्थेत राहत असल्याने, त्याला येणारे अनुभव, त्याच्या भावना तो शब्दात प्रकट करू शकत नव्हता. परंतु ‘ते’ कुणास तरी सांगण्याची त्याची अनिवार इच्छा त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याला दिसणारे अजस्त्र हिंस्त्र पशु त्यांच्याशी होणाऱ्या झुंजी, त्यांच्या शिकारी या संबंधी कुणास तरी सांगावे याच बेचैनीतून त्याने गुहेतील भिंतीचा आधार घेतला. त्या गुहांतील भिंतींवर त्याने त्यांच्याकडील अपुऱ्या साधनानिशी उत्कृष्ट कला निर्मिती (चित्रे) केली. त्याचे मुख्य कारण होते-“त्याच्याजवळ नव्हते शब्द! नव्हती भाषा! म्हणूनच गुहा चित्रांचा जन्म झाला.”

 

      अगदी हेच कारण बाल कलेस लागू पडते. मुलांचे अनुभव, कल्पना आणि भावना चित्रातून प्रगट  होऊ लागतात. जे ते बोलून अथवा लिहून सांगू शकत नाही. ते आकार , रेषा आणि रंगातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात आणि तेही स्वतःच्या शैलीत! कारण तीच त्यांची भाषा असते.

 

      आंब्याचे चित्र काढताच त्यांत ‘कोय’ काढणे किंवा मोटारगाडीच्या एकाच अंगास चारी चाके दाखविणे हे मोठ्यांच्या नजरेस चूक वाटेल. पण तो आहे त्यांचा अनुभव! जे पहिले ते चित्रातून दाखविले जाते. घराच्या आकारात घरातील वस्तू, खोल्या, आई, बाबा, इ. दाखविले जाते. जणू काही घराच्या भिंती पारदर्शक आहेत. मोठ्यांच्या दृष्टीने वाटणारी ती चूक मुलांच्या ध्यानातही येत नाही. त्यांना घरासंबंधी जे जे सांगावयाचे आहे ते ते त्या चित्रातून दिसणारच! एवढंच नव्हे तर आपल्या घरात जे ‘हवं’ असं वाटतं  तेही चित्रातून दाखवून मानसिक आनंदही मुलं मिळवतात .

 

      मुलं हि अत्यंत स्वयंकेंद्रित असतात. त्यांचे विचार, भावना त्यांच्या स्वतःभोवतीच गुंतलेल्या असतात. प्रत्येक गोष्टींत त्यांना ‘मी’ दिसतो. प्रत्येक वस्तू ‘माझी’ असावी असा त्यांचा अट्टाहास दिसून येतो. गाडी आवडली की गाडीचा ड्रायवर ‘मी’ होणार किंवा बसगाडीच कंडक्टर ‘मीच’ होणार असे मुल बोलताना नेहमीच आढळते. ते आपल्याच स्वप्न-रांजणात दंग असते. जगातील व्यावहारिक वास्तवाशी त्याला कांही देण-घेण नसतं. यामुळेच मुलांना त्यांच्या संबंधित विषय चित्रासाठी दिले कि अधिक आवडीने ती चित्रं काढतात आणि मग, त्या चित्रांतून ‘मी, माझे मित्र, आवडी, कल्पना, पसंती व नापसंतीच्या गोष्टी अशा अनेक गोष्टी त्या त्या मुलांच्या चित्रांतून प्रगट होऊ लागतात. म्हणून बाळांची चित्रे म्हणजे कलानिर्मिती अथवा मुलांच्या कलेचा नमुना नसते तर ते असते त्यांच्या विचार, भावनांचे मुक्त प्रगटीकरण (free-expression)! प्रत्येक चित्र म्हणजे मुलांच्या भावनांचे चित्रमय कथानक असते. त्याला जे सांगावेसे वाटलेले असते ते आकारातून व्यक्त झालेले असते. त्यामुळेच हि चित्रे केवळ पाहून चालणार नाही. ती समजून घेतल्याशिवाय त्यातील मर्म कळणार नाही. “ बालचित्रे केवळ पहावयाची नसतात ती वाचायची असतात!” कारण तीच तर मुलांची ‘भाषा’ असते.

 

मुलांची चित्रे हि कलानिर्मिती नसून “त्यांच्या विचारांचे रेषा, आकार व रंगाद्वारे केलेले ‘कथन’ – प्रगटीकरण असते.” हे एकदा आपण स्वीकारले कि त्यांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन आपोआपच बदलतो. मग त्यातून उमलू लागते एकेका मुलांचे अंतरंग! त्यांच्या विचार आणि कल्पनांच्या भराऱ्या  थक्क करू लागतात. चित्रांतले आकार कितीही वेडेवाकडे असले तरी त्यातील आशय फार मोठा असतो. कधी कधी तो आशय कळून घेण्यासाठी त्या त्या मुलांशी बोलून समजून घ्यावे लागते. कारण त्यांनी काढलेले आकार ते त्यांचे स्वतःचेच असतात. कलाविषयक कसल्याही पुर्वाज्ञानाशिवाय त्यांनी ती चित्र निर्मित केलेली असते. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कि, बालकाला हि मुलांना कलावंत व चित्रकार बनविण्यासाठी आयोजित केलेली नसते; तर मुलांच्या विचारांच्या प्रगतीकारणाचे एक ‘मध्यम’, ‘साधन’ म्हणून हाताळलेली असते. म्हणूनच ती प्रत्येक मुलाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. चित्रातून आपले अंतरंग व्यक्त करण्याची संधी मुलांना देण्याचे काम सर्व प्रौढ, पालक व शिक्षक यांनी करावयाचे आहे. आपले विचार इतरांना सांगण्याचा मुलाचा हक्क आपण कसे नाकारू शकणार? त्यांना त्यांच्या भाषेत बोलू देणार ना?