बाल कविता / कविता

गम्मत स्वप्नातली

एकदा काय गम्मत झाली
ससोबाला दोन शिंगे आली
भू भूची शेपटी झाली सरळ
खारूताईने आणला वरून नारळ
मोर म्हणाला नाचू कसा?
म्हणते कोकीळ बसला घसा
वाघ ओरडला मियाऊ माऊ
हत्तीला होता पाहिजे खाऊ
चिमणीने हत्तीला दम दिला
पाण्यात माशाला घाम् सुटला
टॉवेल घेऊन घाम पुसला
कोंबड्याऐवजी पोपट आरवला
कासव धावते सश्याच्या मागे
मैनाताई भरली माऊवर रागे
गाते गाढव गोड गोड गाणी
उगाच घोडा पितोय पाणी
उंदीर मामाच्या डरकाळीने
पळापळी रानात झाली
गजर वाजताच कानाजवळ
सोनू बाळाला जाग आली..