व्यक्तिचित्रे

आनंदयात्री मंगेश पाडगावकर

सुमारे १९३५ सालचा काळ.......

“नमस्कार दादा, मी गणू, उनभाट च्या नानाकाका मोरेंनी धाडलाय,” तो त्या तरुण डॉक्टरास म्हणाला.

“बसा हं, एवढे तीन पेशंट आटपतो. मग आपण बोलू”,...... डॉक्टर

गणू बाकड्याच्या एका टोकाला बसून निरीक्षण करू लागला. एकेक करीत सगळे औषध घेऊन बाहेर पडले. मग डॉक्टराने विचारले, “हं बोला, कोन आजारी आहे.?”

“नानाकाकाचा केशव घणा आजारी आहे.” असे म्हणत गणूने थोडक्यात त्याच्या येण्याचे प्रयोजन सांगितले. उनभाटच्या केशव नानाची भरपूर शेतीवाडी होती. शिवाय कल्याणला ताडीचा मोठा व्यवसाय होता. त्याला ‘ताडीचा पट्टा’ म्हणत. गेल्या वर्षी त्याचे लग्नही झाले होते. पण गेल्या दोन-तीन महिन्यांपासून त्याला कसल्याशा आजाराने गाठले होते. पाण्यापारी पैसा ओतला. मोठ-मोठे वैद्य डॉक्टर केले, पण उतार पडला नाही. आजार अगदी विकोपाला गेला होता. शेवटी जगण्याची अशा सोडल्याने, शेवटचे दिवस आपल्या घरी काढावे, म्हणून त्याला उनभाटला आणले होते. पहाडासारखा दिसणारा केशव आता खाटेत दिसत नाही असंही त्याने सांगितले.

“मग ? मग मी काय करावं असं तुमचं म्हणणं आहे? डॉक्टरांनी मुद्यास हात घातला. 

“काय नाय दादा, मरेपर्यंत फार त्रास होणार नाही, अन सुखानं मरण यावं, एवढीच सर्वांची विच्छ्या आहे.” गणूनेही स्पष्टच सांगून टाकलं.

“ते ठीक आहे, पण मी आजारी माणसाला पाहील्याशिवाय काहीच सांगणार नाही” .......... डॉक्टर

“हो, हो, जरूर बघा नं. म्हणून गाडी आणलीय साहेब, तुम्हाला न्यायला!”

रोग्याच्या भेटीला असे बैलगाडीने जाण्याची डॉक्टराची पहिलीच वेळ होती. शेजारच्या आत्माराम काकांनी ते पहिलेच.

“काय रे गणू, कोणासाठी दादाला नेतोयेस?” त्यांनी विचारले.

“नानाकाकाचा केशव, घणा बिमार आहे. काय खरं नाय त्याचं!” इति गणू.

थोड्याच वेळात उनभाट मधल्या एका मोठ्या घरी बैलगाडी उभी राहिली. फाटकाशी चिंचेची मोठी झाडे होती. दोन, तीन दणकट कुत्री, नवा माणूस पाहताच त्वेषाने भुंकायला लागली. तेवढ्यात एक मळक जकेट घातलेला, कमरेला लंगोटासारखा छोटा पंचा गुंढाळलेला म्हातारा कुत्र्यांना शिव्या हासडत पुढे आला. पोरांकडे पाहून म्हणाला, “त्यांच्या मायला, यांना कुनी हेपाटा रे”, मन गाडीजवळ येऊन नम्रपणे म्हणाला,

“या दादा, तुमशीस कवाची वाट पहातू आम्ही”.

“हा नानाकाका,” गणू म्हणाला.

“अरे बसायला खुर्शी घे रे,” म्हातारा ओरडला. पटकन कुणीतरी एक जुनी खुर्ची आणली.

“काय, तरास तर जाला नाय नं दादा?” काकांनी विचारले.

एवढा मोठा रोगी हाताळण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचे गुरु डॉ. लिमयेंनी अशावेळी काय करायचं, याचं खूप मार्गदर्शन केलं होतं.सारे बारकावे यानेही आत्मसात केले होते. स्वतः चा आत्मविश्वास बुलंद होता. क्षण कसोटीचा होता. पण मनावर कसलाच ताण नव्हता. मात्र या घरच्या लोकांना कसलीच आशा नव्हती. साऱ्याचे चेहरे उतरलेले होते. शेवटी हाच म्हणाला, “चला, केशव कुठे आहे?”

त्याला आतल्या खोलीत नेण्यात आलं. त्या अंधाऱ्या खोलीत केशव पूर्ण निराशेने, केविलवाणा होऊन कण्हत पडला होता. डॉक्टरचा हा देखणा, तेजस्वी अवतार पाहून त्याच्या मनावर नकळत आशेचं पिस फिरलं. केशवची आणि डॉक्टरची नजरानजर झाली. खोल गेलेल्या केशवच्या डोळ्यात आशेची ज्योत चमकून गेली. दोघांच्या हृदयांतील तार जणू कुणीतरी छेडली होती. हा तरणाताठा डॉक्टर केशवला एखाद्या प्रेशितासारखा भासला. डॉक्टराच्या चेहऱ्यावर सहज स्मित उमटले. केशावनेही केविलवाणे स्मित करण्याचा प्रयत्न केला. एकेक पावलं टाकीत डॉक्टर त्याच्या खाटेजवळ आला.

आजूबाजूला पहात तो म्हणाला, “या खिडक्या उघडा आधी, मोकळी हवा येऊ द्या.” मग खाटेच्या एका कडेला बसत त्याने केशवचा हात आपल्या हाती घेतला. डोळे मिटले आणि देवाचे स्मरण करीतच नाडी-परीक्षा सुरु झाली. ‘ही कसली नाडी-परीक्षा? ही डॉक्टरचीच सत्वपरीक्षा’ होती. यात उत्तीर्ण होण्यावर त्याचे अन केशवचे भवितव्य अवलंबून होते. केशावच्या नाडीचे ठोके थेट डॉक्टरच्या हृदयापर्यंत पोहचत होते. अंतर्मन सांगू लागलं, “हा मरणार? छे, नाडी तर चांगली आहे! आपण शिकलो ती ‘मृत्यूनाडी’ ही नक्कीच नाही! मग? ..... मग हा वाचेल? शहरातल्या धन्वंतरिंनी जिथे हर मानली, तिथे आपण काय करू शकू? नाही, हा वाचलाच पाहिजे. याला वाचवायलाच हवे! मी,..... मी वाचवीन याला!’ त्याच्या चेहऱ्यावरचे आत्मविश्वासाचे तेज अधिकच वाढले. त्याने शांतपणे केशवला पूर्ण तपासले. दुखणं नक्की कुठे आहे? किती खोलवर आहे? याचा मनोमनी विचार झाला. मनाचा निर्णय आणि निर्धार पक्का झाला.

घरचे मात्र उदासवाण्या चेहऱ्याने हे पहात होते. शहराच्या डॉक्टरांनी केशवचा शेवट जवळ आल्याची स्पष्ट कल्पना दिलीच होती. तरीही हा तरुण डॉक्टर एवढ्या एकाग्रतेने काय तपासतोय? त्यांना काही उमगत नव्हते. पण त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास त्यांना अचंब्यात टाकीत होता. आजवर इतर डॉक्टरांच्या चेहऱ्यावर दिसलेली निराशा इथे अजिबात दिसत नव्हती. “आता, हा आणखी काय सांगणार?” सारे आतुरतेने वाट पहात होते.

“हे पहा, “डॉक्टराने सुरवात केली.” आजार खूप मोठा आहे, तरीही केशव बरा होईल. पण.......”

“पण काय दादा?” म्हाताऱ्याने प्राण कंठाशी आणून विचारले.

“हे पहा, मी त्याला नीट तपासले आहे. तो बारा झलकच पाहिजे, त्याची नाडीच सांगतेय, पण.... पण मी म्हणेन ती औषध आणावी मागतील. खूप खर्च येईल. मी सांगेल ती पथ्य पाळावी लागतील. मध्येच थांबायचं नही की दुसरी औषधं घ्यायची नाहीत. आणि हो, देव-देवस्की तर मुळीच नाचवायची नाहीत. कसलीही हयगय करून चालणार नाही. आधीच खूप उशीर झाला आहे. आहे का काबुल?” एका दमात त्याने सगळं काही सांगून टाकलं.

डॉक्टरांच्या मुखातून देव बोलला होता. ‘केशव वाचेल’ असं आजवर कुणीच सांगितलं नव्हतं. क्षणभर घरच्यांचा आपल्या कानावर विश्वास बसेना, तरी एकानं धीर करून विचारलेच, काय? “केशव बारा होईल?”

“होईल म्हणजे काय? बारा झालाच पाहिजे. आजच्या पंधरा दिवसांनी तो त्याच्या स्वतः च्या पायावर उभा राहिला पाहिजे!” डॉक्टराने जणू भीष्म प्रतिज्ञाच उच्चारली.

नानाकाकानं तर त्याच्या पायावर डोकं ठेवायचंच बाकी ठेवलं. तो म्हणाला, “पोरा पैशाची तू फिकीर नको करू. आमशा मैर (जवळ) पैशाची काय वाण नाय. अशी नोटांना कसर लागतेय. केशवच्या पुढा त्याची काय पर्वा करातू!”

एकाएकी सर्वांच्या मनावर उत्साहाचे वारे संचारले. काकाने एकाला सांगितले, “जाय रे दादाला शेळ आन. गल्लास चांगला धोवून घे.” धाकट्या मंगळ्याने समोर बसूनच गोल धारदार आऊताने गरगरीत भरदार शहाळे देठाच्या बाजूने वरवरच्या तासले. आऊताच्या टोकाने एक कपची काढून काचेच्या मोठ्या ग्लासावर ते उलटे केले. तो ग्लास भरूनही नारळात बरेच पाणी शिल्लक राहिले होते. तो पोरांच्या हाती देताच ती आनंदाने नारळ घेऊन पळाली.

“हा खास पाणी पिण्याचा नारोल,” नानाकाकान माहिती पुरविली. थंड, ताजे अन मधुर शहाळ्याचे पाणी पिऊन डॉक्टराने निरोप घेतला.

नकळत एक मोठे आव्हान डॉक्टरने स्वीकारले होते. पण ते भावनेच्या भरात मुळीच नव्हते. त्याचा आत्मविश्वास दृढ होता. आपल्या ज्ञानाला या आव्हानाचा कस लावून त्याचे शुद्ध सोनेपण सिद्ध कातायचे होते. ताबडतोब उपचारांना सुरवात झाली. डॉक्टर होता आयुर्वेदाचा तज्ज्ञ. महागडी रसायने, भस्मे, मात्र आणि तेले मागवून घेण्यात आली. काही लेपही आणवले. सकाळ-संध्याकाळ डॉक्टर स्वतः येऊन केशवला मसाज देऊ लागला. चार-दोन दिवसातच केशवच्या कोमजल्या चेहऱ्यावर फरक दिसू लागला. निराश, केविलवाणा केशव हसून डॉक्टराचे स्वागत करू लागला. परवापर्यंत पार खंगून गेलेला केशव, आता आधार घेऊन बसू लागला. घरातली उदासवाणी छाया सरून तिथे चैतन्याचे वारे वाहू लागले.

“हं, जास्तवेळ बसायचे नाही. मी सांगेपर्यंत काहीएक करायचं नही,” डॉक्टराने बजावले.

बोलबोलता चौदा दिवस सहज गेले, गेले चौदा दिवस डॉक्टराचा एकच ध्यास होता. रात्रंदिवस तोच विचार होता. केशव! केशव!! आणि केशव!!! छोट्या, छोट्या आजाराचे रोगी येत-जात होतेच. रोजच्या दिनक्रमातही तसा फारसा फरक पडला नव्हता. पण त्याचे चित्त बाकीच्या गोष्टींत रमत नव्हते. दिवस रात्र एकच ध्येय, एकच विचार डोक्यात घर करून राहिला होता. ती त्याची खरी ‘सत्व-परीक्षा’ होती. स्वतः हून स्वीकारलेले ते एक आव्हान होते. हाती होत्या नव्हत्या त्या ग्रंथांचा त्याने कीस काढला होते. रात्रीचा दिवस करून कंदिलाच्या उजेडात त्याने वाचन, मनन आणि चिंतन चालूच ठेवले होते. तशी यशाची चाहूलही लागली होते, पण आश्वासनाचा ‘शब्द’ उद्या खरा करून दाखवायचा होता. त्या विचार मालिका डोक्यात फेर धरतच रात्री उशीराच झोप लागली.

सकाळी जाग आली तेंव्हा फटफटीत उजाडले होते. सकाळच्या गार वाऱ्यांनी वातावरण कसे प्रसन्न झाले होते. स्नान करून डॉक्टराने नित्याप्रमाणे देवापुढे हात जोडले. डोळे मिटून नेहमीचे रामरक्षा, इ. चे पठाण केले. डोळे उघडून देवाच्या तसबिरीकडे एकटक नजर लावली. एक क्षण.... दोन क्षण.... आणि एकदम शरीरात चैतन्य निर्माण झाल्याचा भास झाला. मनावरचा तन, मरगळ कुठल्या कुठे निघून गेली. त्याने कपडे केले आणि उनभाटचा रस्ता धरला....... केशवकडे!

“अरे डॉक्टरदादा आयले.” कुणीतरी म्हटलं.त्याला चालत येताना पाहून म्हातारा कळवळला. “अरे दादा, गाडीची वाट तरी बघायची,” असे म्हणत तो धाकल्यावर डाफरला, “मंगळ्या, गडी केव नाही धाडली?”

“ते जाऊ दे, काय म्हणतोय केशव?”

“मी बराय दादा, केवाची तुमचीच वाट बघतोय,” केशवाने आतूनच स्वगत केले.

डॉक्टराला पाहताच घराचे सारे भोवताली जमले. पोरांनी खिडकीत गर्दी केली. आई-बापाचे प्राण डोळ्यात जमा झाले होते.

“दूध घेतलं?” ....... डॉक्टर

“नाय तो केवाची तुमचीच वाट बघत थांबलाय.”

“मग आधी दूध आणा.”

डॉक्टराने पाठीशी हात घालून केशवला बसते केले. दूध आलं. तो ग्लास केशवाच्या तोंडाला लावून ते प्यायला लावले, मग तो म्हणाला,

“हं हळूहळू पाय खाली सोड. शाब्बास!” हात माझ्या खांद्यावर ठेव.” असे म्हणून डॉक्टराने आपला हात केशवच्या बगलेखाली घातला.

सारे अवाकपणे पहात होते.

“हं, पाय टेक, थोडा जोर करायचा शाब्बास!” आणि केशव थरथरत उभा राहिला. त्याचा सारा तोल डॉक्टराच्या खांद्यावर होता. खालचा ओठ त्याने आवळून धरला होता.

“चल, आता एक पाऊल टाक. अं..... घाबरायचं नाही. मी आहे ना?”

“ऑ....., अं...... नको, एवढं पुरे,” केशव.

“छे छे आता काळजी नको, आणखी एक पाऊल... आता दुसरं, .... आता एकच. बस्स, आज एवढं पुरे!

तेवढ्या श्रामानही केशवला घाम फुटला होता,

आपण चार पावलं चालू शकतो यावर केशवचाच अजून विश्वास बसत नव्हता. डॉक्टराने त्याला हलकेच खाटेवर बसवले.

“दादा, मी.... मी आज चाललो!” केशवच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. त्याला खाटेवर आडवं करून डॉक्टर इतरांकडे वळला, माउलीने चक्क त्याच्या पायावर डोकं ठेवलं. म्हाताऱ्या बापाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. दोघांच्याही डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला होता. त्यांच्या पाया पडण्याने हा तरुण डॉक्टर लाजून चूर झाला. “अहो, अहो, हे काय करताय काका?” असे म्हणत तो मागे सरला. म्हाताऱ्याला मात्र दादाला कुठे ठेवू आणि कुठे नको असे होऊन गेले होते. घरात आनंदी आनंद झाला होता. आज केशवच्या घराची आनंदाची खरी दिवाळी होती.