सामाजिकलेख

वंद्य वंदे मातरम्

      सकाळी सहा वाजता रेडीओवर आकाशवाणीचे कार्यक्रम सुरु होताना शहनाईबरोबरच ‘वंदे मातरम्’ हे समूहगीत रोज ऐकू येते. हेच गीत रोज, रोज ऐकणाऱ्यांना कदाचित त्या गीताचे महत्त्व ठाऊकही नसेल. या गीता मागाचा फार मोठा इतिहास नव्या पिढीला खरोखरीच माहिती नाही. आपण आज स्वातंत्र्यात जन्मलो आहोत, स्वातंत्र्यात जगात आहोत. पण हे स्वातंत्र्य ब्रिटीशांकडून मिळविताना, त्या इंग्रजी जुलुमी सत्तेशी स्वातंत्र्यासाठी झुंज देतांना ‘वंदे मातरम्’ या घोषणेने आणि गीताने लढणाऱ्यांना किती बळ दिले, किती स्फुल्लिंग पेटविले हे आज कुणीतरी नव्या पिढीला सांगायलाच हवे. याच प्रेरणेने झपाटून सुरेश चांदवणकर यांनी अथक प्रयत्नांनी या गीताचा मागोवा घेतला. अनेक संदर्भ धुंडाळले. काही ध्वनीफिती आणि चित्रफिती मिळविल्या. समाजाच्या या गीता बाबतच्या उद्बोधानासाठी विनामूल्य कार्यक्रम आयोजित केले. सुदैवाने त्यातील एक कार्यक्रम ऐकण्याची संधी मला मिळाली. तिथे ऐकलेल्या निवेदनाच्या आधारेच हा ‘वंदे मातरम्’ गीताच्या प्रवासाचा थोडक्यात आढावा.

      बंकिमचंद्र चटर्जी या आद्य बंगाली कादंबरीकाराच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत ‘वंदे मातरम्’ हे गीत आहे, हे सर्वांना माहित असते. परंतु हे गीत बंकिमचंद्रांच्या एका कथेमध्ये १८७५ साली लिहिले गेले होते. त्या कथेतील नायक आपल्या खेड्यात परत गेलेला असताना तेथील सूर्योदयाचा देखावा पाहून उत्तेजित हेते. त्याच्या भावना व्यक्त करताना बंकिमचंद्रांनी या गीताची योजना केली होती. १८८२ मध्ये त्यांनीच लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या क्रांतिकाराकाच्या जीवनावरील कादंबरीत मायभूमीवरील त्याच्या प्रेमाचे प्रतिक म्हणून या गीताचा समावेश त्यांनी केला. ही कादंबरी खूप गाजली. त्याचबरोबर या गीताचाही बोलबाला बंगालभर झाला – पुढे ती कादंबरी अनेक भारतीय भाषांतून भाषांतरीत झाल्याने या गीताचाही प्रसार झाला. विशेष म्हणजे या कादंबरीची प्रेरणा क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजाविरुद्ध केलेल्या बंदातून घेतली असाही एक प्रवाद आहे. पुढे या कादंबरीने बंगाली क्रांतीकारकांनाही फार मोठी  प्रेरणा दिली.

      या गीताने गुरुदेव रवींद्रनाथ टागोर अतिशय प्रभावित झाले. १८९९ सालच्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनातून रवींद्रनाथांनी हे गीत स्वतः गायले. त्या नंतर कॉग्रेस अधिवेशनाच्या प्रारंभी गाण्याची प्रथाच पडली. त्यामुळे ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र चळवळीचे गीत ठरले. भारतभर या गीताचा प्रसार झाला. १९०५ साली रवींद्रनाथांच्या आवाजात या संपूर्ण बावीस ओळी गीताची पहिली रेकॉर्ड तयार झाली. विशेष म्हणजे या रेकॉर्ड मधील राविन्द्राचा आवाज चांदवडकरांकडे ध्वनिमुद्रित आहे. जुन्या ध्वनिमुद्रिकेमुळे त्यात काही दोष अपरिहार्यपणे आले आहेत. त्यांनंतर गीताचे गायन स्वातंत्र चळवळीचे अंग ठरले. प्रांता प्रांतातून भाषा आणि प्रादेशिक संगीत यांच्या संस्कारामुळे या गीताला वेगवेगळ्या चालीत बसविण्यात आले. शास्त्रीय संगीत गाणाच्या दिग्गज कलावंतांनी गाण्याच्या मैफिलीत ख्याल-संगीताच्या ढंगात देखील या गीताचा समावेश केला. अगदी नाट्यगीताच्या चालीतही ‘वंदे मातरम्’ गायले गेले. स्वातंत्र्याच्या उदयकाळात आलेल्या ‘आनंदमठ’ या चित्रपटातील हेमंतकुमार यांनी संगीतबध्द केलेले ‘वंदे मातरम्’ हे गीत अतिशय गाजले. या अजरामर गीताला यावर्षी १४० वर्ष पूर्ण होत असून आज ही नवनवीन संगीतकारांना व गायकांना या गीताच्या चालीवर प्रयोग करून वेगवेगळ्या ढंगात गाण्याचे आव्हान वाटते. तितकाच तसे करण्याचा मोह ही होतो आहे.

      १९०५ मध्ये तत्कालीन व्हॉयसरॉय लॉर्ड कर्झन च्या कुटील कारस्थानाने बंगालच्या फाळणीचा घात घातला. त्याच्या फोडा-झोडा या कुटील राजनीतीने बंगाल मधील हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडून इंग्रजी सत्तेचा फास अधिक घट्ट करता येईल असा त्याचा समाज होता. पण झाले उलटेच. सारा बंगाल एकवटून या फाळणीच्या विरोधात पेटून उठला. जागोजागी निदर्शने आणि निषेधाच्या सभा होऊ लागल्या. लोकमान्य टिळक, लाला लचपत राय आणि बिपिनचंद्र पाल या ‘लाल-बाल-पाल’ रूपातील एकत्रित आणि प्रखर, तेजस्वी नेतृत्वाने सारा हिन्दुस्तान बंगालच्या फाळणीच्या विरोधात उभा ठाकला. अशाच एका निषेध सभेत कुणीतरी घोषणा दिली, “वंदे मातरम् ! ! ” आणि त्या सभेचे वातावरणच बदलून गेले. सगळे एकमुखाने घोषणा देऊ लागले, वंदे मातरम्, वंदे मातरम् ! ! ” वंग भंग चळवळीचा नारा झालेले ‘वंदे मातरम्’ त्यानंतर स्वतंत्र चळवळीचा एकमेव मंत्र ठरला. बोलता, बोलता ‘वंदे मातरम्’ ही घोषणा आणि गीत दोन्हीचा असा काही उद्रेक झाला की, त्याचा दहशत वजा धसका ब्रिटीश सरकारने घेतला. त्या दोघांवरही सरकारने बंदी घातली. ‘वंदे मातरम्’ उच्चाराणे हा गुन्हा ठरून मारझोड सुरु झाली. परंतु एखादी गोष्ट दडपून टाकण्याचा प्रयत्न केला की, ती अधिक जोमाने उसळून येते याचे प्रत्यंतर येथेही आले. भारतीय सामान्य जनता, बालके, स्त्रीया, कामकरी, शेतकरी सारेच अधिक चेव येऊन जीवाची परवा न करता जिथे जमेल तिथे ‘वंदे मातरम्’ चा उद्घोष करू लागले. ग. दि. माडगुळकरांनी म्हटल्याप्रमाणे ‘वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्’ हा घोष पवित्र ठरला. भारतीय स्वातंत्र चळवळीचे प्रतिक ठरला.

      ‘वंदे मातरम्’ या नावानी भारतातील गावागावामधून संस्था निघाल्या. मंडळे स्थापन झाली, वर्तमानपत्रे, मासिके निघाली. दुकानांना नावे आली. त्याचा उल्लेख असलेली देशभक्तीपर गीते आली. ‘वंदे मातरम्’ हा मायभूमीच्या स्वातंत्र्याचा आणि स्वाभिमानाचा मंत्र ठरला. कुठेही पोलीस दिसला की जाणूनबुजून ‘वंदे मातरम्’ च्या आरोळ्या उठू लागल्या.  सत्याग्रहींवर लाठीमार होताच ते अधिक जोमाजोमाने ‘वंदे मातरम्’ चा जयघोष करीत. शूर स्वातंत्र्यवीरांनी लाठ्या, बुटांचे मार आणि प्रसंगी गोळ्या छातीवर झेलून देशासाठी प्राणार्पण केले. पण आपल्या मुखातील ‘वंदे मातरम्’ चा जयघोष थांबवला नही. अगदी तुरुंगवास भोगतांना देखील कुणा सत्याग्रहीवर अन्याय झाला किंवा मार पडला की त्याच्यासह सारेच सत्याग्रही-तुरुंगवासी ‘वंदे मातरम्’ च्या जयघोषाने सारा तुरुंग दणाणून सोडीत. अनेक राजबंदी आणि क्रांतिकारक हसत, हसत ‘वंदे मातरम्’ म्हणत फासावर चढले. ‘वंदे मातरम्’ चा जयघोष करीत हुतात्मा झालेल्या त्या क्रांतिवीरांमुळे प्राणाची पर्वा न करता लाठ्या आणि बंदुकींच्या गोळ्या झेलणाऱ्या सत्याग्रहींमुळे, देशसाठी आपल्या सर्वस्वाचा होम-त्याग करणाऱ्या राष्ट्राविरांमुळेच आपण आज आनंदात स्वातंत्र उपभोगीत आहोत याची कृतज्ञतापूर्व जाणीव देश बांधव ठेवीत आहोत का? हा एक संशोधनाचा विषय ठरावा.

      ‘वंदे मातरम्’ ची आणखी एक स्पुर्तिदायी आठवण आहे ती १९०७ सालची! हिन्दुस्तान आज आद्य क्रांतिकारक स्त्रियांपैकी एक, मादाम कामा यांनी जर्मनीमध्ये १९०७ साली हिन्दुस्तानची दयनीय अवस्था जाहीरपणे जगापुढे मांडून तिथे स्वत्रंत हिन्दुस्तानचा तिरंगा प्रथम फडकविला. मात्र या तिरंग्यावर हिरवा, पिवळा व तांबडा असे तिन रंगाचे पट्टे होते. त्यावर ‘वंदे मातरम्’ ही अक्षरे ठळकपणे रंगविलेली होती. ‘वंदे मातरम्’ या गीताचे कॉग्रेसच्या अधिवेशनाच्या प्रारंभी गायन होते असे असा उल्लेख सुरवातीस आलाच आहे. यासाठी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आपल्या शिष्यगणांसह अनेक वर्षे तिथे उपस्थित असत. या गीताच्या प्रसारामध्ये पं. पलुस्करांचे फार मोठे योगदान आहे. याशिवाय सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. ओंकारनाथ ठाकूर, मा. कृष्णराव अशा अनेक दिग्गजांनी ते गायनाच्या नोंदी आहेत.

      असे हे एका कथेच्या निमित्याने लिहिले-गेलेले गीत कोटी, कोटी मुखांतून गायले गेले. दुर्दैवाने इंग्रजांच्या ‘फोडा आणि झोडा’ कारस्थानांना यश मिळून स्वातंत्र चळवळीत फुट पडून ‘मुस्लीम लीग’ ची स्थापना झाली. त्यांनी धार्मिक भावनेचे कारण पुढे करून या गीताला विरोध केला. तो आजवर टिकून आहे. त्यामुळे एवढे स्फूर्तीदायी ठरलेले गीत ‘राष्ट्रगीत’ म्हणून मान्यता पावू शकले नाही. अखेरीस ‘जन गण मन’ हे रवींद्रनाथ टागोरांचे गीत (न्यशनल सॉंग) म्हणून भारतीय प्रजासत्ताकाने १९५० साली स्वीकारल्याचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जाहीर केले. मात्र या गीताच्या १४० वर्षाच्या प्रवासात या गीताची गोडी कमी झाली नाही की त्याचा अभिमान वाटणे कमी झाले नाही. हे गीत सामान्य गीत नसून भारतीय स्वातंत्र्याचा ‘महामंत्र’ च आहे. म्हणूनच ते अजरामर आहे. हे बंकिमचंद्र चटर्जीचे आपल्या सर्व देशबांधवांवर फार मोठे ऋण आहे. त्यांना वंदन करून आपण त्यांच्या ऋणातच राहू या. कारण ते कधीच फिटू शकणार नाही. चला एक दिलाने बोलू या ‘वंदे मातरम् !”