सामाजिकलेख

अंधश्रद्धा निर्मुलन – समाज आणि गैरसमज

       २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्वायू, संस्थापक – अध्यक्ष श्री नरेंद्र दाभोळकर यांची निर्घुण हत्या झाली. या घटनेने सारा महाराष्ट्र हादरला. तरीही या घटनेच्या तीन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या असाव्यात. असे मला वाटते. या घटनेने कट्टर सनातनी, धार्मिक भावनांचा बाजार मांडणारे ‘सो कॉल्ड’ – तथाकथीत धार्मिक नेते, धर्मगुरू, बुवा, महाराष्ट्र आणि समाजातील पापभीरू भाविकांची दिशाभूल करून, पाप पुण्याच्या भीतीचे बागुलबुवा उभे करून विविध कर्मकांडांची आणि वस्तूंची दुकाने थाटणारे व्यावसायिक यांना तर आनंदाच्या उकळ्याच फुटल्या असतील. आपल्या बरकतीच्या आड येणारा मोठा ‘अडसर’ कुणाच्या का होईना कृत्याने दूर झाला याचाच त्यांना मनस्वी आनंद झाला असेल. त्याविरुद्ध दुसरी प्रतिक्रिया अंधश्रद्धा निर्मुलन वाल्यांची असेल! आपली चळवळ पोरकी झाल्याची भावना प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात घर करून गेली असेल. तर तिसरी भावना सदैव उदासीनतेने जगणाऱ्या समाजाने व्यक्त केली असेल. “कशाला या उठाठेवी कराव्यात, अशा चळवळी करून कसले (कर्माचे) बदल घडणार आहेत? उगाच आपल्याच पायावर धोंडा पाडून घ्यायचा!” असे असून स्वतःला ‘बुद्धिवादी’ म्हणवून घेणारा समाज घरातल्या घरात पुटपुटणार आणि स्वस्थपणे आपल्या कामाला लागणार! त्यांचेच प्रतिनिधी शासनात. आज दोन महिने उलटून गेल्यावरही दाभोळकरांचे मारेकरी कोण याचा थांगपत्ताही लागत नाही. हे बलिदान व्यर्थ जाणार की काय, अशी भीती वाटू लागली आहे,

       विज्ञानाने एवढी प्रचंड, अभूतपूर्व प्रगती करूनही समाजात अंधश्रद्धांचा भस्मासुर फोफावतोच आहे, हे न उलगडणारे कोडे आहे. हे आपल्याकडीलच नव्हे तर जगभर जागोजागी घडते आहे. धर्माच्या नावाने अनेक देशातून हिंसाचार, हत्याकांड आणि अत्याचार घडवून आणले जात आहेत. विज्ञानाने मानवाचा विकास होताना दिसतो. त्याचवेळी याच विज्ञानाच्या सहाय्याने अनाचाराचा डोंब उसळताना पाहून मन विषन्न होते. असे का व्हावे? याला प्रमुख कारणे मानवी हव्यास, स्वार्थ, इतरांविषयीचा मत्सर आणि सत्तेची राक्षसी महत्त्वाकांक्षा हीच दिसून येतील. यामुळे फक्त आपल्या कल्याणाचा विचार करून प्रत्येकजण स्वतःला असुरक्षित मानू लागला आहे. कोणत्याही मार्गाने आपलेच कल्याण व्हावे यासाठी अनीतीच्या मार्गाने जाण्यात त्याला दिक्कत वाटेनासी झाली आहे. इथेच अंधश्रद्धेच्या दुकानदारांचे फावते आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भोंदू बुवा, बाबा- महाराजांचे प्रस्थ वाढते आहे. हा धार्मिक भ्रष्टाचार सामाजिक, राजकीय व आर्थिक भ्रष्टाचाराचा आधार बनून प्रतिष्ठा पावतो आहे. या अंधश्रद्धांचा विचार करण्याआधी श्रद्धा म्हणजे काय यावर एकदा नजर टाकावयास हवी.

       ‘श्रद्धा’ हा मानवी जीवनाचा मूलाधार आहे. माता-पित्यांवर, नाते संबधांवर, आपल्या कामावर, आपण जे खातो त्या अन्नावर, आपल्या मातृभूमीवर, सेवकाची धन्यावर तर धन्याची आपल्या सेवकावर, प्रजेची राजावर तर राजाची प्रजेच्या कल्याणावर श्रद्धा असावयास हवी, श्रद्धा म्हणजे पूजा नव्हे तर विश्वास! आपुलकी, आत्मीयता आणि नीतीपूर्ण संबंध! अशी श्रद्धा नसेल तर मानवी जीवनात अराजक माजायला कितीसा वेळ लागेल! अशा श्रद्धा जगाच्या पाठीवर सर्व सुरक्षित, असुरक्षित किंबहुना वन्य जमातीतही रूढ झालेल्या दिसतात. या श्रद्धेचा उगम आदिमानवापासून झाला असावा. आदिमानवाला निसर्गात घडणाऱ्या प्रत्येक घटना चमत्कारासारख्या भासल्या असतील. सूर्योदय-सूर्यास्त, तीन ऋतू, उत्पत्ती, जन्म-मरण या सारख्या गोष्टी घडविणारी कुणीतरी अदृष्य, परमोच्च शक्ती असावी, असे त्याला वाटले असेल. त्यातूनच ईश्वरी संकल्पनेचा जन्म झाला असेल. ‘नरे निर्मिला नारायण’ असे कुण्या कवीने म्हटले आहेच.  मानवी विकासाबरोबर या ईश्वर संकल्पनेतही बदल होत गेले असतील. पुढे त्याला ‘सगुण’ रुपात  कल्पून मूर्तीपूजा अस्तित्वात आली असेल. निसर्गाचे श्रेष्ठत्व आजही मानवास झुगारून टाकता आले नाही. किंवा त्यावर मात करता आलेली नाही. या ईश्वरी संकल्पनेमुळे मानव कितीही श्रेष्ठत्वाला पोहचला तरी ‘ईश्वर’ आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे या जाणीवेने त्याचा अहंकार, गर्व लोप पावतो. आपले पूर्वज ऋषी-मुनी केवळ रानावनात राहून उपासना करणारे नव्हते. ते अभ्यासक, संशोधक वृत्तीचे होते. त्यांनी निसर्गातील प्रत्येक वस्तू-मात्राचे महत्व ओळखले होते. त्याच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी त्यांनी ऋचा-प्रार्थना लिहिल्या. “सर्वे सुखिन = संतू सर्वे संतू निरामय” अशी विश्व कल्याणाची चिंता वाहिली. मानव समाज जिथे जिथे एकत्रित झाला, संघटित झाला तिथे तिथे अनेक वर्षांच्या रूढी परंपरेतून ‘धर्म’ निर्माण झाला. प्रत्येक धर्माने ही ईश्वरी संकल्पना वेगवेगळ्या पद्धतीने समाजावर बिंबवली. जेणेकरून मानव समाज नीतीपूर्ण, सुसंकृत, आचारशील व्हावा. ईश्वराची भिती बाळगून तरी आपल्या अहंकाराला त्याने मुरड घालावी. हाच हेतू सर्व धर्मांच्या तत्वात समानतेने दिसून येतो. येथवर सारे ठीक होते. या नीतीनियमांच्या अंमलबजावणीमुळे काही विशिष्ट व्यक्तींकडे आपोआप समाजाचे नेतृत्व येत गेले. सत्ता लोक, अहंकार आणि स्वार्थ यातून कर्मठ धार्मिक नेतृत्व उभे रहात गेले. त्यांनी त्यांचे प्रस्थ व सत्ता वाढविण्यासाठी आपले बळकट व अबाधित राहण्यासाठी कर्मकांडांची जोड दिली असावी. यातूनच सर्व थरातून वेगवेगळ्या अंधश्रद्धा निर्माण होत गेल्या. यज्ञसंस्था, पशूबळी, नरबळी आणि पूजा – कर्मे यांचा पगडा वाढून पर्यावरणाचे महत्त्व सांगणाऱ्या, विश्वाचे कल्याण चिंतणाऱ्या वैदिक प्रार्थनांचा विसर पडत गेला. दुर्दैवाची गोष्ट अशी की या विज्ञानयुगात जाणूनबुजून पसरविलेला अंधश्रद्धांतील खोटेपणा जाणून त्यांचा अव्हेर करण्याऐवजी समाज अधिकाधिक अंधश्रद्धांकडे झुकतो आहे. कर्मकांडे, पशूबळी, व्रते-वैकल्ये किंवा भाग्य उजळणारी रत्ने अशा खोट्या मार्गांना बळी पडतो आहे. यालाच समाज श्रद्धा माणू लागला आहे. अशा अंधश्रद्धांवर घाव घालणे अत्यंत गरजेचे होते. ते दाभोलकरांनी करण्याचे धाडस दाखविले, अशा प्रयत्नांना अंधश्रद्धांचे दोन्ही बाजूचे लाभार्थी विरोधच करतात हा इतिहास आहे. पृथ्वी गोल आहे. सांगणाऱ्या शास्रज्ञ कोपिर्निकसाला धर्म मार्तंडांनी फासावरच लटकविले.  

       मात्र अंधश्रद्धांच्या मुळावर घाव घालताना श्रद्धांच्याही मुळांवर घाव घालू नये असे वाटते. जगाच्या पाठीवर जिथे जिथे मानव समाज आहे तिथे तिथे शेकडो-हजारो वर्षांपासून ‘ईश्वर’ ही परमोच्च शक्तीची संकल्पना मानवी मनामनातून खोलवर ठसली आहे. त्यातूनच देवालये, प्रार्थना मंदिरे, संत-महाले, संत साहित्य, प्रथा आणि रूढी निर्माण झाल्या आहेत. एकीकडे मानवी मनातून ‘ईश्वर’ ही संकल्पना परंपरेने स्वीकारली आहे. तर दुसरीकडे ‘ईश्वर’ नाही ही अंधश्रद्धा विरोधकांची भूमिका आहे. सामान्यांच्या हे पचनी पडणे हे सर्वथा अशक्य वाटते. ‘जर ईश्वर नाहीच तर ही मंदिरे, अनेक परंपरा, संत आणि त्यांचे साहित्य खोटेच का? तसे सामान्य माणूस स्वीकारणे कुठेही शक्य होणार नाही. मानवी लोभ, हव्यास, मत्सर सोडल्यास सामान्य माणसाला ईश्वरावरील श्रद्धा, भक्ती या मानसिक बळ, आधार देणाऱ्याच ठरतात. सात्कृत्याला प्रेरणा देणाऱ्या, नीती नियमाने वागण्याला, सुसंकृत विचारांना आधार देणाऱ्याच ठरतात. ते ‘सब झूठ’ आहे असे सांगणारे तुम्ही कोण?’ असा प्रश्न पडल्यास त्याचे नवल वाटावयास नको. आणि खरोखरीच समाजाने तसे स्वीकारले तर समाज सैरभैर होईल. बेबंद, अनाचारी होईल. कुणाचा वचक कुणावर राहणार नाही असे वाटते. कारण स्वातंत्र्याचा सदुपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग करण्याकडेच मानवी वृत्तीचा कल दिसून येतो.

       यामुळे विधायक श्रद्धांना धक्का न देता समाजात रुळलेल्या अनिष्ट रूढी, प्रथा, धर्माच्या नावावर चालणारे अनाचार, जात-पात, नवस आणि पशूबळी यासारख्या भ्रामक, विध्वसंक अंधश्रद्धांच्या विरोधातच ही चळवळ उभी आहे. हे समाजमनावर ठसणे आवश्यक आहे. सामान्य माणूस चमत्काराला भुलणारा आहे. ‘ज्ञानेश्वरी’ लिहिणाऱ्या ज्ञानदेवांपेक्षा भिंत चालविणारा ज्ञानदेव अधिक जणांच्या लक्षात राहतो. इंद्रायणीतून वर येणारे अभंग तुकारामांच्या गाथेपेक्षा मोलाचे ठरतात. या भोळसट, भाबड्या वृत्तीचा हे बुवा, बापू आणि बाबा पुरेपूर फायदा उठवितात. मोठमोठे राजकारणी, नट, खेळाडू, उद्योगपती अशी प्रतिष्ठित माणसे त्यांच्या भजनी लागतील असे योजनाबद्ध ‘मार्केटिंग’ केले जाते. या ‘सेलिब्रेटीकडे’ पाहून सामान्यही रांगा लावतात. असे हे दुष्टचक्र थांबविणे सहज आणि सोपे अजिबात नाही. अंधश्रद्धा निर्मुलनकर्त्यांच्या मर्यादा त्यांच्याच चळवळीच्या आड येतात. दुसरीकडे स्वार्थ आणि भ्रष्टाचारी राजकारणी या प्रयत्नांचे बळ कमी कसे होईल याचेच प्रयत्न करतात. म्हणूनच श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील हिणकस  ते बाजूला सारून चांगल्या प्रवृत्ती, रूढी व परंपरा जोपासण्याचा सुवर्णमध्य व धैर्य चळवळकर्त्यांनी दाखविल्याशिवाय तरणोपाय नाही असे राहून, राहून वाटते. अशा समंजसपणाने जे शक्य होईल ते टोकाची भूमिका घेऊन साध्य होणार नाही. असा विचारही निर्मुलन कर्त्यांनी करावा अशी विनंती करावीशी वाटते. वाईट प्रवृत्ती समाजात पसरणे सहज शक्य होते. सहजपणे समाज अंधश्रद्धांकडे वाहवत जातो. पण चांगला विचार समाजात रुजायला अनेक वर्षे जातात. ज्ञानेश्वरांपासून विवेकानंदांपर्यंतच्या संतांचे कार्य आजही पूर्णत्वास जाऊ शकले नाही, ही आपली शोकांतिका आहे. तरीही अंधश्रद्धा निर्मुलानाच्या काठीनप्राप्य ध्येयाशी संघर्ष करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व परीचे बळ लाभो हीच सदिच्छा! समर्थ रामदासांचे शब्द याप्रसंगी जरूर आठवतात.

“समर्थ आहे चळवळीचे | जो जो करील तयाचे |
परंतु तेथे भगवंताचे | अधिष्ठान पाहिजे ||